चीनने 2024 मध्ये, आजवरचे सर्वाधिक उष्ण हवामान अनुभवल्याचा डेटा, हवामानशास्त्रीय विभागाने प्रसिद्ध केला आहे. या डेटावरून स्पष्ट झाले आहे, की सहा दशकांपूर्वीपासून सुरू झालेल्या तुलनात्मक हवामान नोंदीनुसार, 2o24 हे सलग ‘सर्वात उष्ण वर्ष ठरले’ असून, त्याने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
उष्णतेची वाढती लाट
2024 मध्ये चीनमधील राष्ट्रीय सरासरी तापमान 10.92 डिग्री सेल्सियस (51.66 फॅरेनहाइट) असल्याची नोंद झाली, जे 2023 च्या तुलनेत 1 डिग्री पेक्षा जास्त आहे. हा डेटा weather.com.cn या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला असून, हे वेब पोर्टल चीनच्या हवामान प्रशासद्वारे चालवले जाते.
चीनमध्ये 1961 पासून तुलनात्मक हवामान नोंदीना सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत ‘सर्वात उष्ण वर्ष’ म्हणून नोंद झालेली 10 वर्ष, ही सर्व 21व्या शतकातील होती, असे सदर वेबसाईटने म्हटले आहे.
सर्वाधिक लोकसंख्या असलेले शांघाय शहर, जे चीनचे आर्थिक हब आहे, त्यासाठी 2024 हे वर्ष, किंग वंशाच्या काळापासून ते आजपर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे, असे शांघाय हवामान कार्यालयाने बुधवारी जाहीर केले. शहराचे सरासरी तापमान 18.8 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले, जे शांघायमधील 1873 पासूनच्या हवामान नोंदींच्या तुलनेत सर्वाधिक उष्ठ ठरले.
येथील गेल्यावर्षीचे हवामान उबदार आणि सोबतच अधिक पाऊस व शक्तीशाली वादळांनी प्रभावित झालेले होते. ज्यामुळे जगाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या वीज वापरात लक्षणीय वाढ झाली होती.
शेतीवर परिणाम
वाढत्या उष्णतेचा परिणाम दक्षिणेकडील तांदूळ पिकांसह अन्य कृषी क्षेत्रांवरही झाला.
तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर आपली अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, चीनने मुख्य अन्नधान्य पिकांना अधिक उष्णता सहन करण्यासाठी अनुकूल करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू केले आहे.
जर त्यांना पर्यायी उपाय सापडले नाहीत, तर परिणामत: पिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
बीजिंगमधील एका संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी सांगितले की, चीन हा जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश आहे, परंतु बटाटा 3 डिग्री सेल्सियस तापमान अधिक असलेल्या एका कक्षेत वाढविल्यास त्याचे वजन सामान्य जातींच्या 50% पेक्षा कमी होते.
हवामान बदल
चीनसह भारतातही 2024 या वर्षात, विक्रमी हवामान बदल अनुभवायला मिळाला. AFP च्या अहवालानुसार, IMD ने बुधवारी सांगितले की 2024 हे सन 1901 नंतरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे.
भारताने गतवर्षी सर्वात प्रदीर्घ उष्णतेची लाट सहन केली असून, ४५ डिग्री अंश सेल्सिअस (११३ अंश फॅरेनहाइट) पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
युनायटेड नेशन्सने ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार, सध्याच्या हवामान धोरणांनुसार, 2100 सालापर्यंत जगातील तापमान हे पूर्व औद्योगिक स्तरांच्या तुलनेत, 3.1 डिग्री सेल्सियसपर्यंत वाढू शकते. ज्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकतात आणि त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची हानी होऊ शकते. सोबतच यामुळे जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसानही उद्भवू शकते.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)