व्हिसाच्या कठोर नियमांमुळे ब्रिटनला येणाऱ्यांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली असली, तरी 2023 मध्ये मूळ अंदाजानुसार 9 लाखांपेक्षा जास्त स्थलांतरीत ब्रिटिशमध्ये आल्याची अधिकृत आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली.
ब्रिटनमधील मतदारांनी -ज्यांची एकूण संख्या सुमारे 68 दशलक्ष आहे- चिंता व्यक्त केली आहे की मोठ्या संख्येने येणाऱ्या स्थलांतरितांमुळे घरांचा तुटवडा वाढू शकतो. याशिवाय सार्वजनिक सेवांवर आणखी ताण येऊ शकतो. मात्र आरोग्यसेवेसारख्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मते परदेशी कामगारांशिवाय काम करणे शक्य नाही.
अभूतपूर्व वाढ
गुरुवारी जाहीर झालेल्या ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार जून 2023 पर्यंतच्या 12 महिन्यांत ब्रिटनमध्ये निव्वळ स्थलांतरितांची संख्या 9 लाख 06 हजार होती. मागील वर्षीच्या 7 लाख 40 हजारच्या अंदाजापेक्षा ही संख्या कितीतरी अधिक आहे, ज्याचे वर्णन ओएनएसने 2021 पासून “अभूतपूर्व वाढ” म्हणून केले आहे.
अर्थात नियम बदलल्यानंतर अभ्यास व्हिसावर आलेल्या विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची (dependents) संख्या घटल्यामुळे जून 2024 पर्यंतची संख्या विक्रमी उच्चांकापासून 20 टक्क्यांनी घसरून 7 लाख 28 हजारांवर आल्याचे ओएनएसने म्हटले आहे.
2016 मधील उच्च पातळीवरील कायदेशीर स्थलांतर हे युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या मतामागील एक प्रेरक शक्ती होती. ब्रेक्सिट मतदानाआधी वर्षभराच्या कालावधीत म्हणजे जून 2016 च्या अखेरीस निव्वळ स्थलांतरितांची संख्या 3 लाख 21 हजार होती.
ब्रेक्सिटनंतर करण्यात आलेल्या व्हिसा बदलांमुळे ब्रिटनमध्ये युरोपियन युनियनच्या स्थलांतरितांच्या संख्येत तीव्र घट झाली. तर दुसरीकडे कामाच्या नवीन व्हिसा नियमांमुळे अनेकदा आरोग्य आणि सामाजिक सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी भारत, नायजेरिया आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येत वाढ झाली,
हुजूर पक्षाची चूक?
2023 मध्ये स्थलांतरितांच्या संख्येत झालेली विक्रमी वाढ ही हुजूर पक्षाच्या सरकारच्या काळात झाली. त्यामुळे स्थलांतरण कमी करण्याचे आश्वासन या पक्षाने दिले होते. त्यानुसार विद्यार्थी आणि केअर वर्कर्स यांच्या कुटुंबातील सदस्यांना ब्रिटनमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या होत्या.
जुलैमध्ये निवडून आलेल्या सध्याच्या मजूर पक्षाच्या सरकारने असेही म्हटले आहे की कौशल्याशी निगडीत कमतरता भरून काढण्यासाठी, सध्या आहेत त्या कामगारांना प्रशिक्षण देऊन निर्वासितांची संख्या कमी करायची आहे. मागील वर्षी झालेल्या निर्वासितांच्या विक्रमी वाढीसाठी हुजूर पक्ष जबाबदार असल्याचा आरोपही मजूर पक्षाने केला आहे.
“मागील चार वर्षांच्या कालावधीत निव्वळ स्थलांतरितांची संख्या चौपट होऊन सुमारे दहा लाख झाली आहे,” असे कामगार स्थलांतरमंत्री सीमा मल्होत्रा यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र त्यांनी विशिष्ट क्षेत्रातील स्थलांतरितांवर भाष्य करण्यास नकार दिला.
ओएनएसने म्हटले आहे की, 2023 च्या संख्येत झालेली मोठी वाढ ही उपलब्ध झालेली अचूक माहिती, युक्रेनियन लोकांसाठी जारी करण्यात आलेल्या व्हिसाबद्दल अधिक माहिती आणि स्थलांतराची गणना करण्याच्या पद्धतीत झालेल्या सुधारणांमुळे ठळकपणे दिसून आली.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)