जपानमधील अमेरिकी लष्करी कमांडमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याच्या अमेरिकेच्या घोषणेचे जपानी लोकांनी स्वागत केले. यामुळे समन्वय अधिक मजबूत होईल याबद्दल दोन्ही देश आशावादी आहेत. या दोन्ही देशांच्या दृष्टीने चीन हा प्रदेशातील सर्वात मोठे धोरणात्मक आव्हान आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन तसेच जपानचे परराष्ट्रमंत्री योको कामिकावा आणि संरक्षणमंत्री मिनोरु किहारा यांच्यात टोकियोमध्ये झालेल्या सुरक्षाविषयक चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.
‘2 + 2’ चर्चेनंतर ऑस्टिन यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘जपानमधील अमेरिकी सैन्याला विस्तारित मोहिमा आणि विविध कामगिऱ्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. याशिवाय संयुक्त दल मुख्यालयात अमेरिका श्रेणीसुधारणा देखील करणार आहे.”
जपानच्या निर्मितीनंतरचा तिथे असणाऱ्या अमेरिकन सैन्यात होणारा हा सर्वात महत्त्वाचा बदल असेल. याशिवाय 70 वर्षांतील जपानबरोबरच्या आपल्या लष्करी संबंधांमधील सर्वात मजबूत सुधारणांपैकी एक असेल,” असेही ऑस्टिन म्हणाले.
मंत्र्यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की मार्च 2025 पर्यंत आपल्या सैन्यासाठी संयुक्त कमांड स्थापन करण्याच्या जपानच्या स्वतःच्या योजनांच्या समांतर अमेरिका नवीन कमांड रचनेची अंमलबजावणी करेल.
महासत्ता चीनकडून येणाऱ्या विविध धोक्यांची दखल घेत, उभय देशांच्या म्हणण्यानुसार ‘विकसित होत चाललेले सुरक्षा वातावरण’ अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने केलेल्या अनेक उपाययोजनांपैकी हा एक उपाय आहे.
दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात चीनचे “प्रक्षोभक” वर्तन, रशियाबरोबर होणारे संयुक्त लष्करी सराव आणि त्याच्या अण्वस्त्र शस्त्रागाराचा वेगाने होणारा विस्तार यावरही या निवेदनात टीका करण्यात आली आहे.
चीनचे “परराष्ट्र धोरण स्वतःच्या फायद्यासाठी इतरांच्या पैशांवर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आकार देण्याचा प्रयत्न करते,” असेही मंत्र्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
“चीनची अशी वागणूक युती आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी एक गंभीर चिंतेची बाब आहे. शिवाय इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि त्याच्यापुढील सर्वात मोठ्या धोरणात्मक आव्हानाचे प्रतिनिधित्व करते.”
ऑस्टिन यांनी पत्रकारांना सांगितले की कमांडचा दर्जा वाढण्यामागे “चीनकडून उद्भवू शकणारा कोणताही धोका कारणीभूत नाही.” तर अधिक जवळून आणि प्रभावीपणे काम करण्याची उभय देशांची इच्छा कारणीभूत आहे.
जपानने आशियामध्ये लष्करी शक्ती प्रक्षेपित करण्यासाठी अमेरिकेला एक तळ उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये 54 हजार अमेरिकन सैनिक, शेकडो अमेरिकी विमाने आणि वॉशिंग्टनचा एकमेव फॉरवर्ड-डिप्लॉयड एअरक्राफ्ट कॅरियर स्ट्राइक ग्रुप, होस्टिंग, यांचा समावेश आहे.
चीनच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याने आणि अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाच्या नियमित क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे प्रेरित होऊन, जपानने अलिकडच्या वर्षांत युद्धानंतरच्या शांततेच्या दशकांपासून आपल्या संरक्षणविषयक धोरणांमध्ये लक्षणीय बदल केले आहेत. 2022 मध्ये त्यांनी संरक्षण खर्च दुप्पट करून सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 2 टक्के करण्याची योजना जाहीर केली.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जपानमधील नवीन अमेरिकी कमांडचे नेतृत्व थ्री-स्टार जनरल करतील. मात्र अमेरिका भविष्यात दक्षिण कोरियाप्रमाणे जपानमध्ये चार-स्टार कमांडरची नियुक्ती करण्याचा देखील विचार करू शकते.
याशिवाय प्रथमच, मंत्र्यांनी “विस्तारित प्रतिबंध” या शब्दाबाबतही चर्चा केली. हा शब्द मित्रराष्ट्रांवरील हल्ले रोखण्यासाठी आपल्याकडील आण्विक शक्तींचा वापर करण्याच्या हेतूने अमेरिकेच्या वचनबद्धतेचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
जपानमध्ये हा संवेदनशील विषय आहे, ज्याने अण्वस्त्रांच्या वापरावर बंदी घालण्यावर जोर दिला आहे कारण अणुबॉम्ब हल्ल्यांचा सामना करणारा तो एकमेव देश आहे.
प्रादेशिक स्थिरतेला चालना देण्यासाठी आणि संघर्षाचा उद्रेक रोखण्यासाठी विस्तारित प्रतिबंध बळकट करण्यावर देशांनी चर्चा केली, असे एका अधिकृत विवरणपत्रात म्हटले आहे.
“जपानच्या आजूबाजूला वाढत असलेल्या तीव्र आण्विक धोक्यांदरम्यान, विस्तारित प्रतिबंध आणखी मजबूत करणे महत्वाचे आहे. या विषयावर सातत्याने होत असलेल्या सखोल चर्चेचे मी स्वागत करतो,” असे जपानच्या कामिकावा यांनी चर्चेच्या सुरुवातीला पत्रकारांना सांगितले.
युक्रेनमधील युद्धाला मदत करण्यासाठी रशियाने उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे खरेदी केल्याबद्दल आणि उत्तर कोरियाला सामूहिक विध्वंसक शस्त्रे किंवा क्षेपणास्त्र-संबंधित तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची रशियामध्ये असणारी क्षमता याबद्दल उभय देशांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
उत्तर कोरियाने युद्ध झाल्यास आपल्या शत्रूंचा “संपूर्णपणे नाश” करण्याची शपथ घेतली आहे, असे उत्तर कोरियातील स्थानिक माध्यम केसीएनएने रविवारी सांगितले.
ऑस्टिन आणि किहारा यांनी दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री शिन वॉन-सिक यांचीही भेट घेतली. त्यानंतर उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चेतावणी डेटाचे रिअल-टाइम सामायिकरण आणि संयुक्त लष्करी सराव यासारख्या प्रयत्नांद्वारे त्रिपक्षीय सहकार्य “संस्थात्मक” करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
बायडेन प्रशासन जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात सखोल सहकार्यासाठी प्रयत्न करत आहे.1910 ते 1945 या काळात जपान कोरियावर राज्य करत होता. तेव्हापासूनच या देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत.
त्रिपक्षीय बैठकीनंतर जपानच्या किहारा यांनी पत्रकारांना सांगितले की, “हा करार जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सहकार्य मजबूत करतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती कितीही बदलली तरी आमच्या भागीदारीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
युक्रेन आणि मध्यपूर्वेतील संघर्षांमुळे शस्त्रास्त्रांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकेच्या शस्त्रास्त्र निर्मात्यांवरील दबाव कमी करण्यासाठी जपानी उद्योगाचा वापर करण्याची अमेरिकेची इच्छा आहे.
टोकियो आणि वॉशिंग्टन या क्षेत्रासाठी विविध प्रकारे सहकार्य करत आहेत, ज्यात क्षेपणास्त्र सह-उत्पादन प्रयत्न पुढे नेणे तसेच पुरवठा साखळीत लवचिकता निर्माण करणे, जहाजे आणि विमान दुरुस्ती सोपी करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
मात्र, एक प्रमुख प्रकल्पाला-पॅट्रियट हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांच्या उत्पादनास चालना देण्यासाठी जपानी कारखान्यांचा वापर करण्याची योजना- बोईंगने तयार केलेल्या महत्त्वपूर्ण घटकाच्या कमतरतेमुळे विलंब होत आहे, असे वृत्त रॉयटर्सने या महिन्यात दिले होते.
टोकियो सोडल्यानंतर, ब्लिंकन आणि ऑस्टिन आणखी एक आशियाई सहकारी फिलिपिन्सशी सुरक्षाविषयक मुद्द्यांवर चर्चा करतील, कारण धाडसी चीनचा प्रतिकार मोडून काढण्याचा बायडेन प्रशासन प्रयत्न करीत आहे.
ब्लिंकन यांनी शनिवारी लाओसमध्ये चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली. अमेरिका आणि त्यांचे भागीदार “मुक्त आणि खुल्या पद्धतीने इंडो-पॅसिफिक भाग” असावा अशी इच्छा बाळगून असल्याचा पुनरुच्चार केला.
ब्लिंकन आणि ऑस्टिन दोघेही इंडो-पॅसिफिक भागाला वारंवार भेटी देत आले आहेत, त्यावरून या क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींमुळे परिणाम किती गंभीर झाले आहे हे दिसून येते. हौती या छोट्या गटाने सागरी वाहतूक विस्कळीत केल्यानंतर काय परिणाम झाले ते जगाने अनुभवले आहेत. त्यामुळे देशांनी इंडो-पॅसिफिक भागात अस्थिरता निर्माण करण्यास सुरुवात केली, तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)