युक्रेनने क्रिमियातील सेवास्तोपोल बंदरावरील रशियन जहाजांवर हल्ला केल्याचे वृत्त युक्रेनकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या हल्ल्यात, काळ्या समुद्रातील ताफ्याला सुविधा देणाऱ्या दळणवळण केंद्रांसह दोन रशियन युद्धनौकांचे नुकसान झाले आहे. 23 – 24 मार्चच्या रात्री करण्यात आलेला सेव्हास्तोपोल बंदरावरील हा सर्वात मोठा हल्ला होता. 2014 मध्ये, मॉस्कोने क्रिमियावर पहिल्यांदा आक्रमण केले तेव्हा सेव्हास्तोपोलवर ताबा मिळवण्यात आला आणि नंतर युक्रेनियन जहाजांसह त्यावर रशियाचा ताबा होता. क्रिमिया हा युक्रेनचा ब्लॅक सी या जागतिक सागरी मार्गांशी जोडणारा मुख्य मार्ग होता. त्यामुळे युक्रेनच्या नौदलाला त्यावेळी मोठा फटका बसला होता, कारण त्याची बहुतेक नौदल शक्ती सेवास्तोपोल येथे तैनात होती.
युक्रेनने दावा केला आहे की, हल्ला करण्यात आलेली ही दोन रशियन लँडिंग जहाजे यमल आणि अझोव्ह होती, जी रशियन ब्लॅक सी फ्लीटचा भाग आहेत. युक्रेनने रडारच्या कक्षेत न येणारी, कमी उंचीवरून उडण्यास सक्षम असलेल्या त्याच्या नवीन स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांसह हा हल्ला केला. ही क्षेपणास्त्रे ब्रिटनने युक्रेनला गेल्याच वर्षी पुरवली होती, ज्यामुळे त्याची क्षेपणास्त्र हल्ला करण्याची क्षमता वाढली आहे.
गेल्या दोन वर्षांत युक्रेनने रशियाच्या ब्लॅक सीच्या ताफ्यातील प्रमुख मोस्कवा सारख्या महत्त्वपूर्ण रशियन नौदल जहाजांवर 14 एप्रिल 2022 रोजी हल्ला केला आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेनच्या सैन्याला रशियन लँडिंग जहाज सीझर कुनिकोव्ह बुडविण्यात यश आले. त्यानंतर मार्चमध्ये, रशियन गस्ती जहाज सर्गेई कोटोव्हचेही असेच झाले. हे दोन्ही हल्ले युक्रेनच्या बहुउद्देशीय यूएव्ही , मगुरा व्ही5 सागरी ड्रोनद्वारे करण्यात आले होते.
युक्रेनला युद्धभूमीवर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असले तरी, रशियन नौदलाच्या क्षमतांवर होणारे त्याचे धोरणात्मक हल्ले ही मॉस्कोसाठी एक गंभीर समस्या बनली आहे. या हल्ल्यांनी युक्रेनची शक्तिशाली रशियन लष्कराला नमवणारी सामरिक ताकद दाखवून दिली. रशियन लष्करासाठी हे मोठे धक्के आहेत. रशियाच्या ब्लॅक सीमधील ताफ्याचा एक तृतीयांश भाग निष्क्रिय करण्यात आल्याचा दावा युक्रेनच्या लष्करी गुप्तहेरांनी केला आहे.
सेवास्तोपोलवरील ताज्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, रशियाने 24 तारखेला पहाटे युक्रेनच्या दिशेने 57 क्षेपणास्त्रे डागली. पश्चिम युक्रेनला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला असला तरी त्यामुळे पोलंडच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन झाल्याचा दावा त्याने केला आहे.
टीम भारतशक्ती