ईशान्य युक्रेनमध्ये बॉम्ब शेल्टरमध्ये भरणाऱ्या एका डान्स स्टुडिओमध्ये, गुलाबी ट्यूटस घातलेल्या लहान मुली हवेच्या झुळकीसारख्या नाजूकपणे नृत्य करत असतात.
अनेकदा संगीताच्या वेळी, नृत्य करायचे सोडून या नऊ वर्षांच्या मुली नुसत्याच उड्या मारत आपसात मस्ती करताना दिसतात. त्यांच्या या गैरवर्तनामुळे अनेकदा मरीना अल्तुखोव्हा या शिक्षिकेकडून ओरडाही पडतो.
द प्रिन्सेस बॅले स्टुडिओ ही एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सखाली असलेली एकही खिडकी नसलेली जागा आहे. बॉम्ब वर्षाव सुरू असताना लपण्यासाठी याचा वापर केला जातो. सध्या मात्र संपूर्ण दिवसातला एकच तास का असेना पण तिथे बॅले डान्सचा वर्ग भरतो. खार्किवच्या ईशान्येकडील शहरात होत असलेल्या युद्ध आणि बॉम्ब वर्षावामुळे रोजच्या रोज जीव मुठीत धरून जगाव्या लागणाऱ्या भयावह वास्तवापासून काही काळ तरी हा क्लास दूर घेऊन जातो.
युक्रेनविरुद्ध सुरू असणारे रशियाचे युद्ध अजूनही संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. सतत होणाऱ्या बॉम्ब वर्षावामुळे इमारतींचे ढिगारे झाले आहेत. बॉम्बची सूचना देणारे सायरन सतत वाजत असतात. अशा परिस्थितीत बॉम्ब शेल्टरमध्ये सराव करणाऱ्या या मुली जवळपास तासभर हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यांवर नाचत राहतात.
अशा तणावग्रस्त वातावरणात या जागेची मालकिणी युलिया वोइटिना हिने मात्र किमान या जागी हलक्याफुलक्या वातावरण निर्मितीसाठी जे जे करणे शक्य आहे ते केले आहे. बॅले क्लास असल्याने तिने गुलाबी बॅलेची चप्पल दारावर टांगली आहे, वाट बघत बसणाऱ्या पालकांसाठी आरामदायक अशा बीन बॅग्ज ठेवल्या आहेत.
शिक्षिका अल्तुखोव्हा तिच्या विद्यार्थिनींना दोन्ही पायांच्या टाचा एकमेकींना जुळवून पाय गुडघ्यातून वाकवायला सांगते आणि लहान मुली त्याप्रमाणे करत असताना समोर लावलेल्या मोठ्या आरशांमध्ये दिसणाऱ्या त्यांच्या प्रतिबिंबाकडे टक लावून त्यांची पोझ परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. जसजसे संगीत पुढे जाते, तसतशी ती मुलींना त्यांच्या पायांच्या बोटांवर संपूर्ण शरीराचा तोल सावरत हात वर करण्याची सूचना देते. मात्र ही पोझ करताना काहीजणी तोल सांभाळू शकत नाहीत आणि त्या पडतात.
“खूप छान,” म्हणत अल्तुखोव्हा विद्यार्थिनींना प्रोत्साहन देते.
रशियाच्या आक्रमणानंतर दोन वर्षांहून अधिक काळ युक्रेनियन आणि रशियन सैन्यात ज्या ठिकाणी भीषण धुमश्चक्री सुरू आहे, तिथून अगदी जवळ खार्कीव प्रदेश आहे.
युद्ध सुरू होण्याआधी वोइटिनाची बॅले स्टुडिओची चेन होती. युद्ध सुरू झाल्यावर पश्चिम युक्रेनमध्ये आश्रय घेण्याआधी तिने हे सगळे स्टुडिओ बंद केले. मात्र मार्च 2023 मध्ये जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्याकडे आता ना पैसा आहे ना स्टुडिओ पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यार्थी. पण तिने कोणताही नफा न घेता एक स्टुडिओ सुरू करण्याचा निर्णय घेतला. युद्धापूर्वी तिच्याकडे 300 विद्यार्थी होते, परंतु आता केवळ 20च विद्यार्थिनी आहेत.
मुलांसाठी आपण काहीतरी करायलाच हवे असे तिला वाटले. “खार्किवमध्ये मुलांसाठी सध्या काहीच नाही. शाळा किंवा बालवाडी नाही, मुले नेहमीच ऑनलाइन असतात,” असे ती म्हणाली. “चांगल्या भावना अनुभवण्यासाठी त्यांना त्यांची ऊर्जा कुठेतरी वापरण्याची गरज आहे. त्यामुळे विशेषतः नृत्यकला त्यांच्यासाठी तारणहारासारखी आहे.”
खार्किव प्रदेशात, नागरिक आपले जीवन शक्य तितके रुळावर आणण्याचा पुन्हा प्रयत्न करत आहेत.
तिथून जवळच असणाऱ्या इझियम भागात, रशियन हल्ल्यानंतर काही महिन्यांनी आयुष्य परत एकदा सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. तिथल्या रहिवासी असणाऱ्या हन्ना तेर्तिश्ना आता बागकामात रमताना दिसतात. युद्धभूमी इथून फारशी दूर नाही, पण एकदा रशियन सैन्याच्या हल्ल्यामुळे तिला विस्थापित व्हावे लागले. “हे सगळेच अनपेक्षित आहे,” असे तिचे मत असले तरी “पण घरी असणे चांगले आहे, पक्षी किलबिलाट करत आहेत आणि मुले खेळत आहेत.”
तिथून थोड्याच अंतरावर, एव्हगेनी नेपोचाटोव्हने मात्र एकेकाळी त्याच्या कुटुंबाचे घर असलेल्या ढिगाऱ्याकडे पाहिले. “हे खूप दुःखद आहे,” एवढेच तो बोलू शकला.
युरी सेवास्तियानोव्ह हे 80 वर्षीय माजी सोव्हिएत कृषी संचालक नेपोचाटोव्हच्या घराच्या अवशेषांमधून जाळण्यासाठी उपयोगी पडणारे लाकूड गोळा करण्यासाठी सायकलवरून आले होते. “हा एकमेव मार्ग आहे ज्यावर आम्ही जगू शकतो,” चिडक्या स्वरात सेव्हास्तियानोव्ह म्हणाले आणि वेगाने निघून गेले.
परत एकदा येऊ या बॅले वर्गात. अल्तुखोव्हा मुलींना एक गुंतागुंतीची स्टेप सांगते ज्यासाठी त्यांना एका पायावर शरीराचे संपूर्ण वजन पेलत गिरकी घ्यायची आहे. (एक पायरोएट) नऊ वर्षांची मायरोस्लावा पोनोमारेन्को यासाठी पुढे होते, तिचे हावभाव एकाग्रतेच्या मुखवट्यात बंदिस्त होतात, जणू संपूर्ण जग धोक्यात आहे.
दारापासून छोट्याशा वेटिंग रूमपर्यंत होणाऱ्या तिच्या हालचाली आई हन्ना अभिमानाने बघत असते. “ही तिची आवडती गोष्ट आहे, ती 3 वर्षांची असल्यापासून या वर्गांना जात आहे,” असे आई गर्वाने सांगते.
तिचे पती राज्य आपत्कालीन सेवेमध्ये काम करतात आणि क्वचितच घरी असतात. अनेकदा, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर नागरिकांची सुटका करण्यासाठी, ढिगारा हटवण्यासाठी आणि झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांना बोलावले जाते.
वोइटिनाप्रमाणेच, पोनोमारेन्को युद्ध सुरू झाल्यानंतर कुटुंबासह काही दिवसांनी तिथून पळून गेली होती. ती गेल्या वर्षी परत आली. स्टुडिओ पुन्हा उघडल्यानंतर तिच्या मुलीला बॅलेच्या वर्गांत घालणाऱ्यांपैकी ती पहिली होती. मात्र सुरुवातीला, लहान मायरोस्लावा या क्लासमुळे फारशी प्रभावित झालेली नव्हती.
“जेव्हा माझी मुलगी पहिल्यांदा येथे आली तेव्हा ती म्हणाली, ‘ हे देवा, आई, हे तर तळघर आहे, इथे खिडक्याही नाहीत.”
तिला खार्किवच्या उत्कृष्ट बॅले कन्झर्व्हेटरीची सवय होती. तिथे सरावाच्या दरम्यान पियानोवादक लाइव्ह वाजवायचे आणि ती व्यावसायिक नर्तकांचा सरावही पाहू शकत असे.
आता मात्र ती नव्या वास्तव परिस्थितीशी जुळवून घेत आहे. तिने तिच्या आईला सांगितले, ” ठीक आहे, ते तसे आहे, तसे असू द्या,” पोनोमारेन्को सांगत होत्या . “मी आता सगळं काही मान्य करेन.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(स्रोतः एपी )