इस्रायलला शस्त्रे देण्यात अमेरिका चालढकल करत असल्याबद्दल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेल्या टीकेवर अमेरिकेने तीव्र निराशा व्यक्त केली आहे.
नेतान्याहू यांनी मंगळवारी इंग्रजी भाषेतील एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात त्यांनी सांगितले की ब्लिंकनला आपण सांगितले आहे की अमेरिका इस्रायलला शस्त्रे आणि दारूगोळा देण्यात चालढकल करत आहे.
नेतान्याहू यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे, “युद्धाच्या सुरुवातीपासून अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या पाठिंब्याचे मी मनापासून कौतुक करतो असे मी याआधीही म्हटले आहे.” ते पुढे म्हणाले, “मी म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांत अमेरिकन प्रशासन इस्रायलला देण्यात येणाऱ्या शस्त्रे आणि दारूगोळ्याबाबत चालढकल करत आहे हे अनाकलनीय आहे. इस्रायल, अमेरिकेचा सर्वात जवळचा सहकारी असून आमच्या अस्तित्वासाठी तो इराण आणि आपल्या इतर समान शत्रूंविरुद्ध लढत आहे.”
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांची नेतान्याहू यांच्या दोन प्रमुख सहाय्यकांसोबत लवकरच होणाऱ्या बैठकांचे नियोजन झाल्यानंतर व्हाईट हाऊसकडून प्रतिक्रिया आली. या बैठकीत गाझा संघर्षावर चर्चा होणार आहे.
व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही टिप्पणी केली. अमेरिकेने इस्रायलकडे थेट नाराजी व्यक्त केली आहे, असे ते म्हणाले.
“इस्रायलला त्यांच्या स्वसंरक्षणाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी लागणारी मदत आम्ही कशीतरी बंद केली आहे ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे.”
इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्झाची हानेगबी आणि इस्रायलचे धोरणात्मक व्यवहार मंत्री रॉन डर्मर सुलिव्हन यांच्याशी चर्चा करतील. एका मोठ्या, अधिक औपचारिक “धोरणात्मक संवाद” बैठकीचे व्हाईट हाऊसकडून पुनर्निर्धारण केले जात आहे.
ब्लिंकन दुपारी 3 वाजता इस्रायलच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.
मोठ्या वजनाच्या बॉम्बचा अपवाद वगळता इतर शस्त्रास्त्रांच्या जहाजांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे ब्लिंकन यांनी सांगितले. याचे कारण असे की इस्रायलला गाझाच्या पलीकडील सुरक्षा धोक्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र त्यांनी नेतान्याहू यांच्याशी झालेल्या त्यांच्या खाजगी चर्चेवर भाष्य करण्यास नकार दिला.
अमेरिकेने मे महिन्यात इस्रायलला देणे असलेल्या 2 हजार पौंड आणि 500 पौंड वजनाच्या बॉम्बची मालवाहतूक थांबवली आहे. दाट लोकवस्तीच्या भागात ते फेकले गेले तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो या चिंतेमुळे हे घडले आहे. पण इस्रायलला अजूनही अब्जावधी डॉलर्सची अमेरिकी शस्त्रे मिळणे बाकी आहे.
अश्विन अहमद
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)