इस्रायल-लेबनॉन सीमेवर त्वरित 21 दिवसांच्या युद्धबंदीची मागणी अमेरिका, फ्रान्स आणि अनेक मित्र राष्ट्रांनी केली. बुधवारी संयुक्त राष्ट्रात झालेल्या सखोल चर्चेनंतर त्यांनी गाझामध्ये शस्त्रसंधीलादेखील पाठिंबा व्यक्त केला.
बायडेन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इस्रायल-लेबनॉन “ब्लू लाइन” या लेबनॉन आणि इस्रायलमधील सीमांकन रेषेवर युद्धविराम लागू होईल. तसेच दोन्ही पक्षांना संघर्षाबाबत संभाव्य राजनैतिक निराकरणासाठी वाटाघाटी करण्यास अनुमती देण्यात येईल.
व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या मित्र राष्ट्रांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही इस्रायल आणि लेबनॉन सरकारांबरोबर सर्वच पक्षांना तात्पुरत्या शस्त्रसंधीला त्वरित मान्यता देण्याचे आवाहन करतो.”
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या मित्र राष्ट्रांमध्ये ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि युरोपियन युनियन यांचा समावेश होता.
आक्रमक इस्रायल
इस्रायलने बुधवारी लेबनॉनमधील आपले हवाई हल्ले अधिक तीव्र केले. त्यामुळे किमान 72 लोक मारले गेले, असे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाने यापूर्वी किमान 223 जण जखमी झाल्याचे सांगितले होते.
इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी सांगितले की जमिनीवरून हल्ले होण्याची शक्यता आहे. या संघर्षामुळे मध्यपूर्वेत युद्धाची व्याप्ती वाढायला चालना मिळू शकते अशी भीती निर्माण झाली आहे.
व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि लेबनॉनमधील शत्रुत्व कमी करण्यासाठी अमेरिका या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधत आहे.
“आम्ही बऱ्याच काळापासून त्या चर्चा केल्या आहेत,” असे अधिकाऱ्याने सांगितले. या 21 दिवसांच्या युद्धबंदी कालावधीत त्या चर्चेचे एका व्यापक करारात रूपांतर करण्याचे अमेरिका आणि त्याचे मित्र देश यांचे उद्दिष्ट आहे.
या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत “जागतिक नेत्यांशी झालेल्या जवळजवळ प्रत्येक संभाषणात” बायडेन यांनी युद्धबंदीच्या शक्यतेवर लक्ष केंद्रित केले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
इस्रायल आणि लेबनॉनशी झालेल्या चर्चेच्या आधारे, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना युद्धबंदीच्या आवाहनासाठी हीच योग्य वेळ असल्याचे वाटले, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
राजनैतिक उपाय
इस्रायलचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत डॅनी डॅनन यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वी पत्रकारांना सांगितले की इस्रायल युद्धविरामाचे स्वागत करेल आणि राजनैतिक तोडगा काढण्यास प्राधान्य देईल. त्यानंतर त्यांनी सुरक्षा परिषदेला सांगितले की इराण हा या प्रदेशातील हिंसाचाराचे मूळ आहे आणि धोका दूर करण्यासाठी शांतता आवश्यक आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांनी परिषदेच्या बैठकीपूर्वी पत्रकारांना सांगितले की आपला देश हिजबुल्लाहला पाठिंबा देतो आणि लेबनॉनमधील संघर्ष वाढला तर आपण तटस्थ राहणार नाही.
लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती यांनी युद्धविरामाच्या आवाहनाचे स्वागत केले आणि म्हटले की त्याच्या अंमलबजावणीची गुरुकिल्ली इस्रायल आंतरराष्ट्रीय ठराव लागू करण्यास वचनबद्ध आहे की नाही यावर अवलंबून आहे.” युद्धविराम लवकरच होईल का असे विचारले असता, मिकाती यांनी रॉयटर्सला सांगितले: “आशा आहे, होय.”
इराण समर्थित असलेल्या पॅलेस्टिनी हमास अतिरेक्यांविरुद्ध इस्रायलच्या गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या समांतर हा संघर्ष सुरू आहे. मात्र लेबनॉनमध्ये मृतांची संख्या वाढल्याने आणि हजारो लोकांनी पलायन केल्यामुळे या संघर्षात वेगाने वाढ होत असल्याची चिंता जागतिक नेत्यांनी व्यक्त केली.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये येणार होते आणि शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार होते.
बायडेन, हॅरिस यांच्यावरील दबाव वाढला
गाझामध्ये युद्धबंदी करण्यासाठी अमेरिकी प्रशासनाचे जवळजवळ वर्षभर सुरू असणारे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी हा संघर्ष राजकीयदृष्ट्या महागडा ठरला आहे. लेबनॉनमधील हिंसाचारामुळे त्यांच्या प्रशासनावर राजनैतिक तोडगा काढण्यासाठी दबाव वाढत असल्याने उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या अध्यक्षीय मोहिमेवरही त्याचा प्रभाव पडला आहे.
याआधी बुधवारी इराण समर्थित हिजबुल्लाहने इस्रायलचे सर्वात मोठे शहर तेल अवीव जवळील मोसाद गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाला लक्ष्य करत डागलेले एक क्षेपणास्त्र इस्रायलने पाडले.
इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाडण्यात आलेले एक जड क्षेपणास्त्र मोसाद मुख्यालयाकडे नव्हे तर तेल अवीवमधील नागरी भागाकडे जात होते.
“तुम्ही वरच्या बाजूला विमानांचा आवाज ऐकला असेल; आम्ही दिवसभर हल्ला करत होतो,” असे जनरल हर्झी हलेवी यांनी लेबनॉनच्या सीमेवरील इस्रायली सैनिकांना सांगितले.
“तुम्ही लवकरच लेबनॉनमध्ये करणार असल्याच्या प्रवेशासाठी आणि हिजबुल्लाहचा अपमान करणे सुरू ठेवण्यासाठी हे हल्ले आहेत.” पेंटागॉनच्या प्रवक्त्याच्या मते इस्रायल जमिनीवरून इतक्यात घुसखोरी करणार नाही.
लेबनॉनमध्ये सुमारे पाच लाख लोक विस्थापित झाले असावेत, असे त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. दक्षिण लेबनॉनमधून विस्थापित झालेल्या हजारो लोकांनी बैरूतमधील शाळा आणि इतर इमारतींमध्ये आश्रय घेतला आहे.
आता लक्ष्य हिजबुल्लाहचे नेते
इस्रायलने हवाई मार्गाने या आठवड्यात हिजबुल्लाहच्या नेत्यांना लक्ष्य करत लेबनॉनच्या अंतर्गत भागात शेकडो ठिकाणी हल्ले केले आहेत. त्यामुळे हजारो लोक सीमावर्ती भागातून पळून गेले आहेत. दुसरीकडे हिजबुल्लाहने इस्रायलमध्ये रॉकेटचे बॅरेजेस सोडले आहेत.
बैरूतच्या उपनगरात बुधवारी इस्रायली हल्ल्यात ठार झालेल्या हिजबुल्लाच्या दोन वरिष्ठ कमांडरांच्या अंत्यविधीसाठी मोठी गर्दी झाली होती. झेंड्याने झाकलेल्या शवपेट्या बँडच्या तालावर घेऊन जात असत हिजबुल्लाहचे थकलेले अतिरेकी बघायला मिळाले. जमावाने हिजबुल्लाहच्या नावे घोषणा दिल्या तर काहीजण शोक व्यक्त करत होते.
सीमांची सुरक्षितता
इस्रायलची लढाऊ विमाने दक्षिण लेबनॉन आणि उत्तरेकडे हिजबुल्लाहचा बालेकिल्ला असलेल्या बेका खोऱ्यावर सातत्याने हल्ला करत आहेत. तर इस्रायलच्या उत्तर सीमेवरील कारवायांसाठी आणखी दोन राखीव तुकड्या मागवण्यात आल्या आहेत.
युद्धविराम करण्याच्या मुत्सद्दी प्रयत्नांवर कोणतीही टिप्पणी न करणाऱ्या एका व्हिडिओ संदेशात नेतान्याहू म्हणाले की, हिजबुल्लाहला कल्पनेपेक्षा जास्त फटका बसत आहे.
इस्रायलच्या दक्षिणेकडील सीमेवरील गाझामध्ये ऑक्टोबरमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने आपली उत्तरेकडील सीमा सुरक्षित ठेवण्यास आणि दैनंदिन गोळीबारामुळे विस्थापित झालेल्या सुमारे 70 हजार रहिवाशांना तेथे परत येऊ देण्यास प्राधान्य दिले आहे.
1990 मध्ये गृहयुद्ध संपल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या प्राणघातक बॉम्बस्फोटात 550 हून अधिक हिजबुल्लाहचे लोक मारले गेल्यापासून लेबनॉनची रुग्णालये जखमींनी सतत भरलेली आहेत.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)