सेमीकंडक्टर आणि चिप पुरविणाऱ्या चिनी कंपन्याही निशाण्यावर
दि. १३ जुन: युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या रशियाच्या लष्करी यंत्रणेला चाप बसविण्याच्या उद्देशाने अमेरिकेकडून गुरुवारी नाट्यमयरित्या रशियावरील निर्बंधांच्या व्याप्तीत वाढ करण्यात आली. त्यामध्ये रशियाला सेमीकंडक्टर आणि चिप पुरविणाऱ्या चिनी कंपन्यांचाही समावेश आहे. रशियाला मदत करणाऱ्या आर्थिक संस्थांनाही अमेरिकेने परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाने रशियाविरोधात अधिक कठोर निर्बंध लादण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यानुसार रशियाशी व्यवहार करणाऱ्या आर्थिक संस्थानावर कारवाई करण्यात येणार आहे. या संस्थाना अमेरिकेच्या आर्थिक यंत्रणेचा लाभ त्या स्थितीत घेता येणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. रशियाच्या लष्करी औद्योगिक यंत्रणेच्या माध्यमातून अमेरिकेतील सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान संस्थांना लक्ष्य करण्यात येते. ते रोखण्यासाठी अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून रशियातील त्याचबरोबर आशिया, आफ्रिका आणि युरोपातील तीनशे संस्था व व्यक्तींवर नजर त्ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर वाणिज्य मंत्रालयाकडून रशियाला सेमीकंडक्टर आणि चिप पुरविणाऱ्या बनावट कंपन्यांची छाननी सुरु करण्यात आली आहे. या सर्व चिनी कंपन्या हॉंगकॉंग येथील आहेत, असे वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या कंपन्यांकडून वर्षाला सुमारे १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर किमतीची आणि अति प्राधान्याची उपकरणे रशियाला पुरविण्यात येतात, असा अमेरिकेचा दावा आहे. त्याचबरोबरीने रशियाला या वस्तू इतर देशांकडूनही आयात करता येऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिली आहे.
रशियाच्या शस्त्रे आणि प्रणालींमध्ये अमेरिकी तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादित केलेल्या चिप वापरल्याचे आढळून आले आहे. त्यात ड्रोन, रेडीओ, क्षेपणास्त्रे, चिलखती वाहने आदींचा समावेश आहे. युद्धभूमीवरून हस्तगत केलेल्या या शस्त्रांची तपासणी केली असता, त्यात अमेरिकी चिप आढळून आल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते. मात्र, अमेरिका आणि इतर देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे युक्रेनबाबतचे धोरण बदलेल, असे सामरिक तज्ज्ञांना वाटत नाही. परंतु, या निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत होऊन, त्याचा त्यांच्या युद्ध लढण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल, असे त्यांचे मत आहे. आज वाढविण्यात आलेल्या निर्बंधांच्या व्याप्तीमुळे आंतरराष्ट्रीय माध्यमातून शस्त्रे आणि उपकरणे घेण्याचा आणि त्याच्या पुरवठ्यासाठी तिसऱ्या देशावर अवलंबून राहण्याचा रशियाचा मार्ग रोखला जाईल, असे अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जेनेट येलेन यांनी म्हटले आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)