अमेरिकी पत्रकाराविरुद्धचा हेरगिरीचा खटला बंद दाराआड चालणार

0
US-Russia Tensions:

रशियाकडून माहिती, सुनावणीस २६ जूनपासून प्रारंभ होणार

दि. १७ जून: हेरगिरीच्या आरोपांखाली रशियाची गुप्तचर संस्था ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’कडून (एफएसबी) अटक आकरण्यात आलेल्या अमेरिकी पत्रकाराविरुद्धचा खटला बंद दाराआड चालविण्यात येणार असल्याची माहिती रशियाकडून देण्यात आली आहे. या खटल्याच्या सुनावणीस २६ जूनपासून प्रारंभ होणार आहे.

अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राचा बातमीदार इवान गेर्श्कोवीच याला लष्करी गुपिते चोरून ती अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सेन्ट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ला (सीआयए)  पाठविल्याच्या आरोपाखाली रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’कडून (एफएसबी) अटक २९ मार्च २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. उरल पर्वतराजीच्या परिसरात असलेल्या येत्करिन्बर्ग या शहरातील एका घरातून त्याला रशियाच्या लष्करी गुपितांसह पकडण्यात आले होते, असा दावा रशियाच्या गुप्तचर संस्थेकडून करण्यात आला होता. त्याच्या विरोधातील खटल्याची सुनावणी २६ जूनपासून येत्करिन्बर्ग येथील न्यायालयात बंद दाराआड सुरु होणार आहे, अशी माहिती रशियाकडून देण्यात आली. गेर्श्कोवीच याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याला वीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

US-Russia Tensions:
अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राचा बातमीदार इवान गेर्श्कोवीच याचे रशियाच्या कोठडीतील छायाचित्र.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या संस्थांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गेर्श्कोवीच याला स्वेर्द्लोव्स्क प्रांतात असलेल्या जेएससी एनपीके उरल्वागोन्झावोड या रशियन संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपनीच्या कार्यालयातून रशियाच्या लष्करी सामग्रीबद्दलची गुप्त माहिती चोरताना २९ मार्च २०२३ रोजी रशियाच्या गुप्तचर संस्थेकडून रंगेहात अटक करण्यात आली होती, असे स्वेर्द्लोव्स्क येथील न्यायालयाने खटला दाखल करून घटना स्पस्ष्ट केले. तर, गेर्श्कोवीचकडून ही माहिती पुढे ‘सीआयए’ला पाठविण्यात येणार होती. ‘सीआयए’च्या सांगण्यावरूनच त्याने हे काम केले होते, असा दावा ‘एफएसबी’कडून करण्यात येत आहे. सोविएत काळातील रशियन गुप्तचर संस्था ‘केजीबी’चे रुपांतर करून ‘एफएसबी’ची स्थापना करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सोविएत रशिया आणि अमेरीकेतील शीतयुद्ध संपल्यानंतर गेल्या तीस वर्षांत हेरगिरीच्या आरोपांवरून अटक करण्यात आलेला गेर्श्कोवीच हा पहिला अमेरिकी पत्रकार आहे. अमेरिकेने मात्र रशियाने गेर्श्कोवीचवर लावलेले आरोप ‘हास्यास्पद’ असल्याचे सांगून ते फेटाळून लावले आहेत. ‘गेर्श्कोवीचला करण्यात आलेली अटक बेकायदा आहे,’ अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली आहे. तर, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’कडून हेरगिरीचे आरोप फेटाळण्यात आले असून गेर्श्कोवीच हा कुटुंबवत्सल माणूस असल्याने त्याची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

विनय चाटी

(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’वरून)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here