निर्णय तातडीने बदलण्याचे अमेरिकेला आवाहन
दि. ०७ जून: तैवानला शस्त्रपरवठा करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला चीनने कडाडून विरोध केला आहे. ‘अमेरिकेकडून तैवानला शस्त्रे विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा,’ असे आवाहन चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडून अमेरिकेला करण्यात आले आहे.
तैवानचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाई चिंग ते यांच्या शपथविधीमुळे आणि लाई यांनी केलेल्या विधानामुळे संतापलेल्या चीनने गेल्या महिन्यात तैवानच्या खाडीच्या परिसरात अत्यंत आक्रमक युद्धसराव केला होता. लाई हे फुटीरतावादी असून, त्यांना धडा शिकविला जाईल, असेही चीनने म्हटले होते. चिनी साम्यवादी पक्षाकडून तैवानला चीनचाच एक भाग मानण्यात येतो. मात्र, लाई यांनी चीन आणि तैवान हे दोन स्वतंत्र देश असल्याचे विधान केले होते. सिंगापूर येथे आयोजित केलेल्या शांग्रीला डायलॉगदरम्यान अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन आणि चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे पहिले जात आहे.
‘अमेरिकेकडून तैवानला करण्यात आलेल्या शस्त्रविक्रीबाबत चीनकडून अमेरिकेकडे विरोध नोंदविण्यात आला आहे. चीनचे लष्कर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असून, आपले सर्वोभौमत्व राखण्यास सक्षम आहे,’ असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तैवानला एफ-१६ या लढाऊ विमानाचे सुटे भाग विकण्याच्या सुमारे ८० दशलक्ष डॉलरच्या व्यवहाराला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, असे ‘पेंटागॉन’च्या संरक्षण सहकार्य संस्थेने बुधवारी म्हटले होते, त्या पार्श्वभूमीवर चीनकडून हे आवाहन करण्यात आले आहे. ‘या मदतीमुळे तैवानला आपली सुरक्षा, राजकीय स्थैर्य, लष्करी समतोल राखण्यात मदत होईल, तसेच त्यांच्या आर्थिक प्रगतीलाही हातभार लागेल,’ असे ‘पेंटागॉन’ने म्हटले होते. तर, ‘हा व्यवहार जुलैपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, या मुले तैवानच्या हवाईदलाची लढाऊ आणि संरक्षण क्षमता वाढणार आहे,’ अशी प्रतिक्रिया तैवानकडून देण्यात आली होती.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)