व्हिएतनामकडून चीनला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यासाठी चीनचीच रणनीतीविषयक धोरणं राबवायला सुरूवात करून दक्षिण चीन समुद्रात ड्रॅगनचा सामना करण्यासाठी व्हिएतनाम सज्ज झाला आहे. व्हिएतनामने आपल्या बेटांचा आकार वाढवून आणि त्यामुळे समुद्रातील आपल्या सीमारेषा आणखी पुढे नेत दक्षिण चीन समुद्रातील आपले दावे बळकट करायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशाने कृत्रिमरीत्या 692 एकर जमीन निर्माण केली आहे, जी व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको या जगातील दोन सर्वात लहान देशांपेक्षा क्षेत्रफळाने मोठी आहे. व्हिएतनाम दक्षिण चीन समुद्रातील आपल्या बेटांचा आकार वाढवत आहे. स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या आशिया मेरीटाईम ट्रान्सपरन्सी इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार, 2023 या वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत त्याने बेटांच्या आकारात 404 एकरांची वाढ केली तर 2022 मध्ये आकारात 347 एकरांची वाढ झाली.
चीन समुद्रातील खडकांवर बेटे तयार करून त्या बेटांचा विस्तार करत आहे. हा प्रकार प्रामुख्याने स्प्राटली आणि पार्सेल बेटांच्या गटांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. व्हिएतनाम आणि चीन हे दोन्ही देश या द्वीपसमूहांवर आपली मालकी असल्याचा दावा करतात. स्प्राटली समूहावर आतापर्यंत व्हिएतनाम, चीन, तैवान, फिलीपिन्स, मलेशिया आणि ब्रुनेईकडून मालकीचे दावे केले गेले आहेत. अलीकडच्या काळात पार्सेल बेटावरूनही संघर्ष झाला आहे. 1974 मध्ये चीन आणि दक्षिण व्हिएतनामच्या सैन्याचे या भागात सागरी युद्ध झाले होते. अर्थातच त्यात चिनी सैन्याची सरशी झाली होती. ही घटना व्हिएतनामच्या एकीकरणाच्या एक वर्ष आधी घडली. 2014 मध्ये चीन आणि व्हिएतनाम यांच्यात या प्रदेशात चिनी तेल-जहाजांच्या आगमनामुळे राजनैतिक वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात चीनला माघार घ्यावी लागली होती.
दक्षिण चीन समुद्रातून दरवर्षी 3 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा व्यापार चालतो, त्यामुळे दिवसेंदिवस तो मोठ्या प्रमाणात जागतिक फ्लॅश पॉईंट बनत चालला आहे. जागतिक सागरी व्यापारापैकी सुमारे एक तृतीयांश भाग याच मार्गातून होतो. याशिवाय चीनच्या ऊर्जा आयातीचा मोठा भाग देखील याच जलमार्गातून जातो. या कारणांमुळे हा प्रदेश सुरक्षित करणे आवश्यक आहे असे चिनी धोरणकर्त्यांना वाटते.
चीनची नजर या प्रदेशातील इतर अनेक बेटे आणि डोंगराळ भागांवर आहे. तैवान, ब्रुनेई, मलेशिया, फिलीपिन्स, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांबरोबर चीनचे अजूनही मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहेत. जपानच्या अधिपत्याखाली असलेल्या रयुकू बेटांच्या दक्षिणेकडील सेनकाकू बेटांवर आपली मालकी असल्याचा चीनचा दावा आहे.
टीम भारतशक्ती