बांगलादेश : सध्याच्या परिस्थितीत मुक्तीसंग्रामाचे महत्त्व संपले आहे का?

0
बांगलादेश
बांगलादेशातील ढाका येथील मुक्ती युद्ध संग्रहालयातील 1971 च्या नरसंहारातील मानवी अवशेष आणि युद्ध सामग्रीचा फाइल फोटो

एकीकडे 1971 च्या युद्धाचा 52 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी भारत सज्ज होत आहे, तर दुसरीकडे ज्यामुळे बांगलादेशचा जन्म झाला त्या पाकिस्तानला आपल्याकडे वळवून घेण्यासाठी मोहम्मद युनुस प्रशासन सध्या व्यस्त आहे. तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील लाखो बंगाली लोकांच्या कत्तलीसाठी पश्चिम पाकिस्तान जबाबदार होते.
यंदाचा बांगलादेश विजय दिवस वेगळा ठरणार आहे.

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त आपण तयारी करत आहोत. मात्र 16 डिसेंबर रोजी बांगलादेशचा जन्म झाला त्याचे विडंबन टाळणे आपल्यासाठी कठीण आहे.

युद्धापूर्वी पूर्व पाकिस्तानमधील बंगाली नागरिकांचा पाकिस्तानी सैन्याने नरसंहार केला होता.

पश्चिम पाकिस्तानमधून पाठवलेल्या सैनिकांना स्थानिक पाकिस्तान समर्थक रझाकारांनी (देशद्रोही) मदत केली होती. हे रझाकार पाकिस्तानी सैन्याने चालवलेल्या संहारात, लुटमारीत आणि विनाशात सहभागी झाले होते. त्यावेळी विद्यार्थी, शिक्षक, स्त्रिया, मुलं या सगळ्यांना लक्ष्य करण्यात आले होते.

त्यांचा गुन्हा काय होता? तर डिसेंबर 1970 ची निवडणूक जिंकलेल्या अवामी लीगच्या शेख मुजीबुर रहमान यांना पाकिस्तानचे पंतप्रधानपद नाकारण्याच्या पंजाबी वर्चस्व असलेल्या पश्चिम पाकिस्तानी प्रयत्नांचा आणि पूर्वेकडे उर्दू ही अधिकृत भाषा म्हणून लादण्याच्या योजनेचा केलेला निषेध.

काही टोकाच्या पुराणमतवाद्यांच्या अंदाजानुसार, पश्चिम पाकिस्तानच्या सैन्याने किमान 3 लाख बंगालींची हत्या केली होती. इतर काहींनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 30 लाख नागरिकांची त्यावेळी हत्या करण्यात आली.

पूर्व पाकिस्तानातून लाखो बंगाली लोक या सगळ्यातून जीव वाचण्यासाठी भारतात आले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने यापैकी काही निर्वासितांना भरती, प्रशिक्षण आणि शस्त्रे देण्याचे ठरवले, ज्यात मुजीब यांच्यावर निष्ठा ठेवणारे पाकिस्तानी सैन्य दलातील काही सैनिकांचाही समावेश होता. त्यांना मुक्तीवाहिनी म्हणत.

स्वातंत्र्यासाठी युद्ध

पश्चिम पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हवाई तळांवर आणि रडार आस्थापनांवर हल्ला करण्यासाठी  सीमा ओलांडल्यामुळे 3 डिसेंबर 1971 रोजी भारताने स्वातंत्र्यासाठीच्या युद्धाची औपचारिकपणे घोषणा केली. पश्चिम पाकिस्तानी सैन्याला भारतीय नौदल आणि हवाई दलाने अडवले, तर भारतीय लष्कर आणि मुक्ती वाहिनीने बांगलादेशात प्रवेश केला.

पंधरा दिवसांपेक्षा कमी कालावधीत म्हणजे 16 डिसेंबर 1971 रोजी, लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी (आणि रझाकार) यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याने, ज्यांनी पूर्वेकडील त्यांच्याच लाखो नागरिकांची इतक्या निष्ठूरपणे कत्तल केली होती भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे सार्वजनिक आत्मसमर्पण असे त्याचे वर्णन केले जाते.

कोणत्याही व्यावसायिक सैन्याप्रमाणे, काम पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्याने बांगलादेशातून माघार घेतली आणि स्थानिक नागरिकांना देश चालवण्यासाठी सांगितले.

त्यानंतरच्या घडामोडी…

तेव्हापासून अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ लोटला असला तरी भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अजूनही असे नागरिक आहेत ज्यांच्या आठवणींमध्ये त्या काळातील भयावहता आणि शौर्य लक्षात ताजे आहे. पण ढाकाची सध्याची व्यवस्था तशी नाही असे दिसते. कारण मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम प्रशासन पाकिस्तानच्या पायाशी लोळण घेण्यास आणि त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी उत्सुक असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

डॉ. युनुस किंवा जो कोणी देश चालवत आहे, तो ज्याला हवे त्याला आकर्षित करण्यास स्वतंत्र आहे का याबद्दल शंका वाटते. याशिवाय आश्चर्याची गोष्ट अशी की पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपले प्राण दिले ते सर्व बांगलादेशी आता जिवंत असते तर ते काय विचार करतील? ज्या हजारो निष्पाप महिला आणि मुले, विद्यार्थी आणि शिक्षकांची त्यावेळी त्यांच्याच सैन्याने अंदाधुंद कत्तल केली होती, त्यांच्यासारख्या यांच्याही भावना असतील का?

किंवा 3 हजार 843 भारतीय सैनिक जे मरण पावले आणि 9 हजार 851 सैनिक जे  बांगलादेश मुक्त करण्यासाठी मुक्ती वाहिनीला मदत करताना जखमी झाले त्यांच्या त्यागाचे मोल काय?

ते सर्व चुकीचे होते का? त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले का?

जनरल यांचा दृष्टिकोन

दुसऱ्या महायुद्धातील दिग्गज दिवंगत लेफ्टनंट जनरल एम. एल. थापन, ज्यांच्यावर 1971 मध्ये भारताच्या पूर्व कमांडने पूर्व पाकिस्तानचे ज्या तीन क्षेत्रांमध्ये विभाजन केले होते, त्यापैकी एक क्षेत्रातून पाकिस्तानच्या सैन्याचे उच्चाटन करण्याचे काम सोपवण्यात आले होते, ते नेमके या सगळ्या बाबत काय विचार करत होते?

त्यांच्या सहकारी आणि अधिकाऱ्यांनी ‘थिंकिंग मॅन’स जनरल ‘ म्हणून वर्णन केलेल्या जनरल थापन यांना ठामपणे खात्री होती की बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मदत करण्यामागे भारताचा कोणताही छुपा हेतू नाही.

“1947 मध्ये जेव्हा देशाचे विभाजन झाले, तेव्हा पूर्व बांगलादेशच्या नागरिकांनी पूर्व पाकिस्तानची निवड करण्याचा निर्णय घेतला. हा त्यांनी एकमताने घेतलेला निर्णय होता आणि 25 वर्षांनंतर त्यांना आढळले की पश्चिम पाकिस्तानातील अधिकारी पूर्व पाकिस्तानशी आपलेपणाने वागलेले नाहीत,” असे थापन यांनी 2007 च्या सुरुवातीला दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. त्यावेळी ते 89 वर्षांचे होते, मात्र त्यांचे डोळे अजूनही चमकत होते आणि त्यांच्या पाठीचा कणा अजूनही ताठ होता.

“असे असले तरी, ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार पाकिस्तानच्या पश्चिम भागात सामील झाले होते. त्यामुळे त्यांच्या समस्यांमध्ये त्यांनी हस्तक्षेप का केला पाहिजे याचे कोणतेही कारण मला दिसले नाही. त्यांनी ते स्वतः ओढून घेतले होते,” असे थापन म्हणाले. “खरे सांगायचे तर, त्यांनी स्वतःचे प्रश्न स्वतः हाताळायला हवे होते. मुख्यत: स्वातंत्र्यानंतरच्या आणि विशेषतः मुजीब (बांगलादेशचे पहिले अध्यक्ष मुजीबुर रहमान) यांच्या मृत्यूनंतरच्या घटनांमुळे या विचारांना बळकटी मिळाली आहे.”

दुसरा पैलू म्हणजे, “जर आपण गोष्टी त्यांच्यावर सोडून दिल्या असत्या, तर आज पाकिस्तान पुन्हा दोन भागांमध्ये विभागला गेला असता आणि या दोघांच्यामध्ये भारत होता. त्यांच्यासाठी ती एक मोठी प्रशासकीय समस्या ठरली असती. पाकिस्तानी सशस्त्र सेना दोन भागांमध्ये विभागली गेली असती तर धोरणात्मकदृष्ट्या त्यांना दोन आघाड्यांची काळजी घ्यावी लागली असती आपल्यासाठी ही एक मोठी फायदेशीर गोष्ट ठरली असती.”

भविष्यातील परिणाम

“बांगलादेशातील सध्याची परिस्थिती (तीव्र भारतविरोधी खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील आणि इस्लामी पक्षांच्या एका टोळीने पाठिंबा दिलेल्या बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाने, दोन महिन्यांपूर्वीच अंतरिम सरकारकडे सत्ता सोपवली होती, परंतु एक वर्षाहून अधिक काळानंतर डिसेंबर 2008 मध्ये निवडणुका झाल्या होत्या) आमच्यासाठी निःसंशय प्रतिकूल आहे. आजही त्यात फार बदल झालेला नाही. त्यामुळे या सौदेबाजीतून आपल्याला काहीही मिळालेले नाही,” असा युक्तिवाद त्यांनी केला.

याचे उघड कारण असे होते की, बांगलादेशातून मोठ्या संख्येने निर्वासित भारतात आले होते. आता युद्धात सहभागी होण्यासाठी हे कारण पुरेसे समर्थनीय आहे की नाही हे मला माहीत नाही. कारण त्या काळापेक्षा आज बांगलादेशातून आलेले बेकायदेशीर स्थलांतरित जास्त आहेत,” याकडे त्यांनी लक्ष वेधले.

याव्यतिरिक्त, “तुम्ही दुसऱ्या देशातील एखाद्याचा बचाव करण्यासाठी किंवा त्याला किंवा तिला वाईट वागणूक दिली जात आहे म्हणून मुक्त करण्यासाठी जाऊ शकत नाही. ही त्यांची समस्या होती, आपली नाही. आपल्या स्वतःच्या समस्या पुरेशा आहेत. आपल्या स्वतःच्या देशातील मानवतावादी समस्यांचे काय? त्यांना कोण त्रास देत आहे? “.

“ब्रिटनमध्ये आता मोठ्या संख्येने भारतीय राहतात. जर त्यांना वाईट वागणूक दिली गेली तर आम्ही ब्रिटनमध्ये जाणार आहोत का?”

“भारतविरोधी भावनेबद्दल बोलायचे झाले तर, ती बांगलादेशातील सर्व मूलतत्त्ववाद्यांकडून उठवली जात आहे, जे त्यावेळीही तिथे होते, परंतु त्यांच्या नियंत्रणाखाली राहिले. अर्थात, त्यांना आता पाकिस्तानातील आयएसआयद्वारे धमकावले जात आहे,” असे ते म्हणाले.

सध्याच्या बांगलादेशमधील परिस्थितीला हे तितकेच सहज लागू होऊ शकणारे शब्द आहेत.

बांगलादेश मुक्तीच्या 52व्या वर्धापन दिनानिमित्त आपण तयारी करत असताना, कदाचित थोडे कठोरपणे आत्मपरीक्षण करणे योग्य ठरेल.

रामानंद सेनगुप्ता
(ढाका आणि नवी दिल्ली येथून)


Spread the love
Previous articleMoscow Captures More Territories In Eastern Ukraine
Next articleSouth Korea Develops Interceptor To Counter Missiles From North

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here