बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानच्या ग्वादर बंदर प्रशासनाच्या कार्यालयावर 20 मार्च रोजी अनेक सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला. ग्वादर बंदर प्राधिकरण वसाहतीमध्ये हल्लेखोर आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात यावेळी जोरदार चकमक झाली, परिणामी दोन सैनिक ठार झाले आणि आठ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. विविध सरकारी आणि निमलष्करी कार्यालये असलेल्या या संकुलावरील हल्ल्यादरम्यान अनेक स्फोट आणि सतत गोळीबार झाल्याची कबुली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि सुरक्षा विभागाने दिली आहे. चीनद्वारे चालवल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी चीन – पाकिस्तान आर्थिक मार्गिकेच्या (सीपीईसी) योजनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ग्वादर बंदराची ओळख आहे.
इंटर – सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) दिलेल्या माहितीनुसार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मशी (BLA) संबंधित असलेल्या माजीद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी अशांत बलुचिस्तान प्रदेशातील हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. या घटनेनंतर, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे , दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली. दहशतवादी तहरीक – ए – तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि सरकार यांच्यातील शस्त्रसंधी संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तानमध्ये, विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवाया वाढत असताना हा हल्ला झाला आहे.
अफगाण तालिबानच्या विचारसरणीचा स्वीकार केलेल्या आणि पाकिस्तान तालिबान म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या टी . टी . पी . ची स्थापना 2007 मध्ये अनेक दहशतवादी संघटनांचा अम्ब्रेला ग्रुप म्हणून करण्यात आली होती. संपूर्ण पाकिस्तानात इस्लामचे कठोरपणे पालन व्हावे याकडे लक्ष ठेवणे हा टीटीपीचा मुख्य उद्देश आहे. पाकिस्तानी तालिबानने पाकिस्तानच्या दक्षिण वझिरिस्तान जिल्ह्याजवळील पाक्तिका प्रांतात आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे, तर खोस्त उत्तर वझिरिस्तानजवळ आहे. 2022 मध्ये काबूलमध्ये सत्तेवर आल्यानंतर अफगाण तालिबान टीटीपीच्या कार्यकर्त्यांना हद्दपार करून पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या भूमीचा वापर थांबवेल अशी पाकिस्तानला आशा होती. मात्र, काबूलने टीटीपीवर नियंत्रण ठेवण्यास नकार दिल्याचे इस्लामाबादचे म्हणणे आहे.
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला
पाकिस्तानने अलीकडेच अफगाणिस्तानात “दहशतवादविरोधी मोहिमा” राबवल्या, ज्यामुळे उभय देशांमधील तणाव वाढला. त्यातच अफगाणिस्तानात झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये आपल्या झालेल्या आठ नागरिकांच्या मृत्यूस पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप अफगाणिस्तानने केल्यानंतर हा तणाव अधिकच वाढला. प्रत्युत्तरादाखल, तालिबान सरकारने सीमेवरील पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. अफगाणिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा पाकिस्तानने केलेला आरोप तालिबानने जोरदारपणे फेटाळला आहे.
उत्तर वझिरिस्तानमधील मीर अली येथील सुरक्षा चौकीवर झालेल्या हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी प्रत्युत्तर देण्याचे वचन दिले. त्यानुसार अलीकडेच एअर स्ट्राईक करण्यात आला ज्यामध्ये हाफीज गुल बहादूर समूहाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. हे दहशतवादी तहरीक – ए – तालिबान पाकिस्तानसह (टीटीपी) शेकडो नागरिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मृत्यूस जबाबदार होते.
तालिबाननं अफगाणिस्तानमधील सत्ता पुन्हा आपल्या हातात घेतल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले आहेत. तालिबान अफगाणिस्तानमधील टीटीपीसह आणखी इतर दहशतवादी गटांना आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे. विशेष म्हणजे टीटीपीसारख्या (तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान) दहशतवादी संघटनांच्या निर्मितीला पाकिस्तान जबाबदार आहे. १९७० च्या दशकात पश्तून राष्ट्रवादाचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्ताननं उत्तर आणि पश्चिम पाकिस्तानात इस्लामिक कट्टरतेला पाठिंबा दिला. त्याचा परिणाम म्हणजे १९८० च्या दशकात अफगाणिस्तानात तालिबानचा उदय झाला.
दरम्यानच्या काळात अमेरिकेचा पाकिस्तानमधील हस्तक्षेप वाढत असल्याचा दावा करीत पाकिस्तानातील कट्टरतावादी गटांनी टीटीपी या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. अफगाणिस्तानमधील टीटीपी गटानं आपण पाकिस्तानमधील संघटनेचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे अफगाण स्थलांतरीतांना पाकिस्तानमधून हद्दपार करण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळेच आम्ही अफगाण स्थलांतरीतांना पाकिस्तानातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे, असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं आहे. दोन्ही देशांतील संबंध बिघडण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे.
बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा (केपी) ही हिंसाचाराची प्रमुख केंद्रे आहेत, जी पाकिस्तानमधील एकूण मृत्यूंपैकी 90 टक्क्यांहून अधिक आणि 84 टक्के हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत. या भागातील सुरक्षा दले आणि नागरिकांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अफगाणिस्तानात नुकत्याच झालेल्या हवाई हल्ल्यांवरून पाकिस्तान आणि त्याच्या शेजारी देशामधील तणावात वाढ झाल्याचे संकेत मिळतात.दोन्ही देशांमध्ये होत असलेले आरोप – प्रत्यारोप आणि त्यातून दिसणारी भडक भाषा यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळत चालली आहे. या संपूर्ण परिस्थितीवर जागतिक राजकारणाचे बारकाईने लक्ष आहे.
पुनीत गोरे