चीन, जपान आणि भारताच्या आर्थिक संकटामागे ‘स्थलांतरितांबद्दलची भीती’ : बायडेन यांचा युक्तिवाद

0
जो बायडेन (संग्रहित छायाचित्र)

चीनपासून जपान आणि भारतापर्यंत पसरलेला “परदेशी लोकांबद्दलचा द्वेष (xenophobia)” त्या देशांच्या प्रगतीत अडथळा बनत असल्याचा युक्तीवाद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी केला. त्यांच्या मते स्थलांतरित व्यक्तींमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.

“आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचे एक कारण म्हणजे तुम्ही आणि इतर अनेकजण. का? कारण आम्ही स्थलांतरितांचे स्वागत करतो “, असे बायडेन यांनी त्यांच्या 2024च्या पुनर्निवडणुकीच्या मोहिमेसाठी आयोजित वॉशिंग्टनमधील निधी उभारणी कार्यक्रमात सांगितले.

“चीन आर्थिकदृष्ट्या इतका मागे का पडत आहे? जपानला समस्या का आहेत, रशिया आणि भारताला का समस्या आहेत, कारण ते परदेशी लोकांबद्दल भीती बाळगतात. त्यांना स्थलांतरित नको आहेत. उलट स्थलांतरित तेच आहेत जे आपल्याला मजबूत बनवतात,” असा दावा बायडेन यांनी केला.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) गेल्या महिन्यात वर्तवलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांचे हे विधान आले आहे. आयएमएफच्या मते, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये प्रत्येक देशाच्या विकासात घट दिसून येईल. जपानमध्ये 0.9 टक्क्यांपासून ते भारतात 6.8 टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते. अमेरिकेची वाढ 2.7 टक्के इतकी होईल, जी 2023 मधील 2.5 टक्क्यांपेक्षा थोडी जास्त असेल.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार अमेरिकेचा विकास 2.7 टक्के दराने वाढेल, जो गेल्या वर्षीच्या 2.5 टक्के दरापेक्षा किंचित जास्त असेल. अनेक अर्थशास्त्रज्ञ अमेरिकन अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा चांगल्या दिसून आलेल्या कामगिरीचे श्रेय काही अंशी स्थलांतरितांनी देशाच्या श्रमशक्तीत दिलेल्या योगदानाला देतात.

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी अनेक अमेरिकन मतदारांमध्ये स्थलांतरितांचा मुद्दा ही एक मोठी चिंता असल्याचे अनेक जनमत चाचण्यांनी दाखवून दिले आहे. बायडेन प्रशासन जपान आणि भारतासह इतर देशांशी व्यापक आर्थिक आणि राजकीय संबंधांवर लक्ष केंद्रित करत असल्याने, बायडेन यांनी त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितांबद्दलच्या भूमिकेवर टीका केली आहे.

अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची टक्कर आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हे दोन्ही नेते सतत दुसऱ्यावर टीका करताना दिसतात.

आराधना जोशी
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)


Spread the love
Previous articleभारत-ओमान हवाईदलाची संयुक्त सरावाची योजना
Next articleSouth China Sea Flare-Up: Philippines Summons Chinese Diplomat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here