दि. १४ एप्रिल: ‘डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज’च्या (डीएसएससी) ७९ व्या अभ्यासक्रमाचा पदवीप्रदान समारंभ तामिळनाडूतील वेलिंग्टन येथे शनिवारी पार पडला. ‘डीएसएससी’चे कमांडंट लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांच्याहस्ते अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना पदवी प्रमाणपत्र व पुरस्कार देण्यात आले.
‘डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज’च्या (डीएसएससी) ७९ व्या अभ्यासक्रमात एकूण ४७६ अधिकाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या अधिकाऱ्यांत २६ मित्रदेशांतील ३६ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश होता. या प्रसंगी लेफ्टनंट जनरल वत्स यांनी हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ‘अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांनी आपली ज्ञानलालसा अशीच कायम ठेवावी आणि संरक्षणदलांतील बदलांचे नेतृत्त्व करावे. ‘डीएसएससी’मध्ये तुम्हाला तिन्ही सैन्य दलांतील समन्वय तत्त्वांची शिकवण देण्यात आली आहे. त्यानुसार तुमचा पुढील व्यवहार राहील अशी अपेक्षा आहे,’ असे लेफ्टनंट जनरल वत्स या वेळी म्हणाले.
अभ्यासक्रमात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांना या वेळी जनरल वत्स यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. आपापल्या सेवेत उत्तम यश मिळविल्याबद्दल मेजर बीपीएस मनकोटिया, कमांडर रविकांत तिवारी व विंग कमांडर टी.मोहन यांना अनुक्रमे लष्कर, नौदल व हवाईदलाच्या अभ्यासक्रमात यश मिळवल्याबद्दल माणेकशा पदक देऊन गौरविण्यात आले. तर, मित्रदेशांच्या लष्करातील अधिकाऱ्यांना उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अधिकारी म्हणून देण्यात येणारे ‘सदर्न स्टार’ हे पदक सिंगापूरच्या मेजर तिनेश्वरम यांना देण्यात आले.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी