दि. ०८ मे: संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्राचे योगदानही मोलाचे आहे. खासगी संरक्षण सामग्री उत्पादकांचा ‘मेक इन इंडिया’च्या उद्दिष्टासाठी उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने भारतीय तटरक्षकदलाने पुढाकार घेतला असून, देशांतर्गत ‘मरीन ग्रेड स्टील’च्या पुरवठ्यासाठी तटरक्षकदलाने जिंदाल स्टील्स अँड पॉवर (जेएसपी) या खासगी क्षेत्रातील पोलाद निर्मिती उद्योगसंस्थेशी परस्पर सामंजस्य करार केला आहे. तटरक्षकदलाचे महानिरीक्षक (सामग्री आणि देखभाल) एच. के. शर्मा आणि ‘जिंदाल स्टील्स अँड पॉवर’चे मुख्य विपणन अधिकारी एस. के. प्रधान यांनी या करारवर स्वाक्षरी केली.
भारतीय जहाजबांधणी उद्योगात अधिक प्रमाणात खासगी उद्योगांचा सहभाग वाढावा व त्याचबरोबर तटरक्षकदलाकडून वापरण्यात येत असलेल्या जहाजांमध्येही अधिकप्रमाणात स्वदेशी सामग्रीचा वापर व्हावा, या उद्देशाने देशांतर्गत ‘मरीन ग्रेड स्टील’च्या पुरवठ्यासाठी जिंदाल स्टील्स अँड पॉवर या संस्थेशी करार करण्यात आला. या करारच्या माध्यमातून स्वदेशीकरणाला चालना देण्यात येणार आहे. तसेच, देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामग्रीचे देशांतर्गत उत्पादन शक्य होणार आहे. त्यातून या क्षेत्रातील राष्ट्रहित जपता येणे शक्य होणार आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
देशासमोर असणारी सुरक्षा विषयक आव्हाने पाहता संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सार्वजनिक आणि खासगी संस्थांनी परस्पर सहकार्याने पुढे जाणे अपेक्षित आहे. त्याचदृष्टीने या सामंजस्य कराराकडे पहिले जात आहे. या करारात गुणवत्ता, उत्पादनाचा दर्जा, त्याचे प्रमाणन, मापे व स्वतंत्र पोलाद उत्पादन प्रकल्प आदी बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तटरक्षकदलाला ठराविक मुदतीत या ‘मरीन ग्रेड स्टील’चा पुरवठा करणे शक्य होणार आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी