‘गाझा’वरून मतभेद: परराष्ट्र मंत्रालयातील मानवाधिकार अधिकाऱ्याचा राजीनामा
दि. २८ मार्च: हमास या दहशतवादी संघटनेच्या विरोधात इस्त्राईलने सुरू केलेल्या युद्धाला पाठिंबा देण्याच्या बायडेन प्रशासनाच्या धोरणाला गुरुवारी आणखीन एक जोरदार धक्का बसला. बायडेन प्रशासनाने गाझापट्टीबाबत अवलंबिलेल्या धोरणाला विरोध करीत अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयातील मानवाधिकार विषयक अधिकारी ॲनले शेलीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गाझापट्टीत सुरू असलेल्या युद्धात इस्त्राईलला शस्त्रपुरवठा करणे अमेरिकेने सुरूच ठेवले आहे. या शस्त्रांचा वापर करून गाझात इस्त्राईलकडून नरसंहार सुरु आहे. इस्त्राईलच्या संरक्षणदलांकडून होत असलेल्या मानवाधिकार उल्लंघनाला अमेरिका ‘हमास’ विरोधातील युद्धाचे स्वरूप देत आहे, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे शेलीन यांनी ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ‘खरे तर मला या प्रशासनाशी कसलाही संबंध ठेवायचा नाही, हे माझ्या राजीनाम्याचे मुख्य कारण आहे. माझी मुलगी आता दोन वर्षाची आहे. ती मोठी होईल तेव्हा तिला गाजापट्टीत इस्राईलकडून सुरू असलेल्या अत्याचाराबाबत कळेल आणि या कालावधीत मी अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचा भाग होते हे ही तिला समजेल. ती मला जेव्हा याबाबत विचारेल; तेव्हा मला जे शक्य होते ते मी केले, असे मला तिला सांगता आले पाहिजे,’ असे शेलीन यांनी पुढे म्हटले आहे.
अमेरिकी सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या इस्त्राईल धोरणाला विरोध करीत बायडेन प्रशासनातून अनेक अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. अमेरिकेच्या राजकीय आणि लष्करी व्यवहार समितीचे संचालक जॉश पॉल यांनी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर, शिक्षण विभागातील अधिकारी आणि बायडेन प्रशासनातील पॅलेस्टिनी वंशाचे अमेरिकी नागरिक तारीक हबाश यांनीही जानेवारीत पदत्याग केला होता. प्रशासनातून काढता पाय घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय नसली, तरी येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनासाठी ही नक्कीच लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले जात आहे. प्रशासनात सुरू असलेले राजीनामा सत्र असंतोषाचेच द्योतक असल्याचे मानले जात आहे. गाझापट्टीत सुरू इस्त्राईलकडून सुरु असलेला नरसंहार रोखण्याबाबत मतप्रदर्शन करणे अत्यंत अवघड बनले आहे, असे काही अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ‘हफिंग्टन पोस्ट’ला सांगितले.
गाझापट्टीत ‘हमास’ने सात ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्राईलने केलेल्या प्रतिहल्ल्यात आत्तापर्यंत ३२ हजार नागरिकांचा बळी गेला आहे. मात्र, याबाबत इस्त्राईलला जाब विचारण्याऐवजी प्रशासनाकडून त्यांना शस्त्रांचा पुरवठा सुरूच आहे, हे अत्यंत निंदनीय असल्याचेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अश्विन अहमद