मालदीवच्या माजी मंत्र्यांकडून भारताची माफी

0
मालदीवच्या माजी मंत्री मरियम शिउना यांचे संग्रहित छायाचित्र.

समाजमाध्यमांवर केला होता भारतीय ध्वजाचा अवमान

दि. ०८ एप्रिल: भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबद्दल मालदीवच्या माजी मंत्री मरियम शिउना यांनी भारताची माफी मागितली आहे. मालदीवमधील विरोधी पक्षावर टीका करताना त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रासारख्या  चिन्हाचा वापर केला होता. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

मालदीवच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात विरोधी पक्ष असलेल्या ‘मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी’वर टीका करताना मरियम यांनी भारताच्या ध्वजावरील अशोकचक्र या राष्ट्रीय चिन्हाचा होकायंत्रासारखा वापर केला होता व भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केला होता. त्याबद्दल त्यांनी भारताची माफी मागितली आहे. आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर त्यांनी म्हटले आहे, की माझ्याकडून भारताचा अपमान करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. हे माझ्याकडून नजरचुकीने घडले आहे. त्यामुळे मी अत्यंत नम्रपणाने भारताची माफी मागते. माझ्या अकाउंटवरील पोस्टमुळे काही गोंधळ उडाला असेल, तर त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करते. मालदीवच्या विरोधी पक्षाबद्दल लिहिताना मी भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रसारख्या चिन्हाचा वापर केला आहे, हे माझ्या लक्षात आणून दिले गेले. त्यानंतर तातडीने मी ती पोस्ट काढून टाकली आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता हे नजरचुकीमुळे घडले आहे. गैरसमजातून घडलेल्या या घटनेमुळे सर्वांना त्रास झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, असे मरियम यांनी म्हटले आहे.

मरियम या मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोईझू यांच्या पक्षाच्या नेत्या असून, त्या मालदीवच्या संसदेत निवडून गेल्या आहेत. भारतावर टीका केल्याप्रकरणी त्यांना मोईझू यांच्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. मालदीव आणि भारत यांची भागीदारी व संबंध अतिशय जुने आहेत या संबंधांचा मी कायमच आदर करते व भविष्यातही करीत राहीन, असे मरियम यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी मरियम यांच्याकडून हे पहिल्यांदाच घडलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या समाजमाध्यमावर लक्षद्वीप येथील छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतर मरियम यांनी मोदी यांची कठपुतली या शब्दांत संभावना केली होती. त्यावरून त्यांच्यावर मोठी टीका झाल्यानंतर त्यांनी ही पोस्ट काढून टाकली होती. भारत आणि मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मरियम यांच्यासह तीन मंत्र्यांना मोईझू यांनी मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविला होता.

पिनाकी चक्रवर्ती


Spread the love
Previous articleसंरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राचा टक्का वाढला
Next articleCDS Urges Armed Forces to Develop Joint Culture

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here