‘डीआरडीओ’कडून २३ कंपन्यांना तंत्रज्ञान हस्तांतरण
पुणे, दि. २६: लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदलप्रमुख ॲडमिरल हरी कुमार यांची प्रदर्शनाला भेट, हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्यासह त्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद व संरक्षणदल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांची या संवादातील आभासी माध्यमातून उपस्थिती, तसेच संरक्षण संशोधन व विकास संस्थेने २२ कंपन्यांबरोबर केलेले तंत्रज्ञान हस्तांतराचे करार ही ‘एमएसएमई डिफेन्स एक्स्पो-२०२४’च्या समारोपाच्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली.
स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि भविष्यातील संरक्षण तंत्रज्ञानातील देशाच्या क्षमतांचे दर्शनघडविणाऱ्या ‘एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला शेवटच्या दिवशी सुमारे दोन लाख नागरिकांनी भेट दिली. या प्रदर्शनात विविध खासगी उत्पादक व सरकारी उपक्रम यांच्यात परस्पर सामंजस्य करार झाले, तसेच संरक्षण उत्पादनातील स्वयंपूर्णतेकडे जाण्याच्या संधी व आव्हाने, या विषयावर चर्चासत्रेही आयोजित करण्यात आली. संरक्षण उद्योगातील डीआरडीओ, एल अँड टी, भारत फोर्ज,निबे लि. सारख्या कंपन्यांसह सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्रातील ५०० कंपन्यांनी या प्रदर्शनात आपल्या संरक्षण उपकरणांचे प्रदर्शन केले. लहान शस्त्रास्त्रप्रणालीपासून विविध लष्करी वाहने आणि प्रगत हवाई-संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षेपणास्त्र प्रणाली आदींचा यात समावेश होता. प्रगत हलके हेलिकॉप्टर ध्रुव, हलके लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंड, शक्तिशाली धनुष तोफ, अचूक वेध घेणाऱ्या हॉवित्झर ७७ बोफोर्स तोफा, टी-९० भीष्म आणि अर्जुन रणगाडे, बीएमपी-२ सारखी सैन्याच्या वाहतुकीसाठी वापरलीजाणारी सुसज्ज वाहने यासह भारतीय वायुसेनेची मेक इन इंडिया निर्मित जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा अचूक वेध घेणारी समर-२ आणि आकाश ही शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली.
तिन्ही सैन्यदल प्रमुखांचा विद्यार्थ्यांशी संवाद
तिन्ही सैन्यदल प्रमुखांचा विद्यार्थ्यांशी संवाद, हे प्रदर्शनाच्या समारोपाच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. एअर चिफमार्शल व्ही. आर. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे व नौदलप्रमुख ॲडमिरल हरीकुमार व इतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संरक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि संधींबद्दल संवाद साधला. संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान हे या संवादात आभासी माध्यमातून सहभागी झाले होते. या वेळी तिन्ही प्रमुखांनी ‘मेक इन इंडिया’ व आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप्स, नवकल्पना आणि संशोधन या विषयावर भर दिला. तसेच, संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांनाही प्रोत्साहन देण्याची भूमिकाही त्यांनी विषद केली.
तर २०४७ पूर्वीच विकसित भारत
‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांचेही या प्रसंगी भाषण झाले. ते म्हणाले, ‘आपल्या पंतप्रधानांच्या स्वप्नातील प्रगत भारताच्या विकासात संरक्षण क्षेत्रातील प्रगती, आत्मनिर्भरता हे महत्त्वाचे घटक आहेत. वर्ष २०४७ पर्यंत जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी, आपण शैक्षणिक, एमएसएमई आणि स्टार्टअप उद्योगांना एकत्रित करणारी परिसंस्था विकसित केली पाहिजे. तसे झाल्यास२०४७ पूर्वीच आपण आपले ध्येय साध्य करू शकतो.’
‘डीआरडीओ’कडून तंत्रज्ञान हस्तांतरण
या प्रदर्शनाला जोडूनच संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) उद्योजकांबरोबर ‘डीआरडीओ-इंडस्ट्री मीट’चे आयोजन केले होते. या वेळी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील २२ कंपन्यांबरोबर तंत्रज्ञान हस्तांतराचे २३ करार करण्यात आले. ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांच्या उपस्थितीत हे करार झाले.
विनय चाटी