लाल समुद्रातील कारवाई: मुक्त व सुरक्षित सागरी क्षेत्राला प्राधान्य
दि. ०१ एप्रिल: अमेरिकी आणि मित्रादेशांची नौदल जहाजे व व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याच्या तयारीत असलेली हौती बंडखोरांची ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्कराच्या मध्य विभाग मुख्यालयाने रविवारी केला आहे. ही कारवाई हौती बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या येमेनच्या भागात व लाल समुद्रातील व्यापारी मार्गांवर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यातही बंडखोरांची चार ड्रोन पाडण्यात आली होती.
‘आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्रात सुरक्षित नौकानयन करण्यासाठी, हे क्षेत्र दहशवाद मुक्त करण्यासाठी, या भागात असलेल्या अमेरिकी व मित्रदेशांच्या नौदलाच्या सुरक्षेसाठी व आंतरराष्ट्रीय व्यापारीमार्ग जोखीममुक्त करण्यासाठी ही कारवाई गरजेची होती,’ असे अमेरिकी लष्कराच्या मध्य विभागाने म्हटले आहे. हौती बंडखोर व अरब देशांचा पाठींबा असलेल्या येमेनच्या सरकारी फौजांमध्ये २०१४ पासून संघर्ष सुरु आहे. या बंडखोरांना लष्कराने डोंगराळ भागातून हुसकावून लावले होते. मात्र, राजधानी सनासह येमेनच्या उत्तर आणि पश्चिम भागावर अद्यापही त्यांचे वर्चस्व आहे. या बंडखोरांना इराणची फूस असल्याचे म्हटले जाते. इस्त्राईलने गाझापट्टीमध्ये हमास या दहशतवादी संघटनेच्या विरोधात सुरु केलेले युद्ध थांबविण्यासाठी हौती बंडखोरांनी लाल समुद्रात जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येतो. मात्र,या परिसरात होत असेलेले हल्ले आणि हौती बंडखोराचा दावा यांच्यातील विपर्यास अनेकदा समोर आला आहे. हौती बंडखोरांनी इस्त्राईलवरही क्षेपणास्त्र मारा केला होता. मात्र, ही क्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत पोहोचली नाहीत, तर काही इस्त्राईलच्या हवाई संरक्षण यंत्रणेकडून पाडण्यात आली.
चिघळत चाललेले इस्त्राईल-हमास युद्ध आणि लाल समुद्रातील युद्धजन्य परिस्थिती या मुळे येमेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येमेनमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सुरु असलेल्या गृहयुद्धात आत्तापर्यंत सुमारे दीडलाख नागरिकांचा बळी गेला असून, तीस लाखांपेक्षा जास्त नागरिक बेघर झाले आहेत. पवित्र रमजान महिन्याच्या काळात येमेनमध्ये दोन्ही संघर्षरत बाजूंत शस्त्रसंधी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे प्रतिनिधी हान्स ग्रुंदबर्ग यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी शस्त्रसंधी झाल्यानंतर येमेनमध्ये बऱ्याच प्रमाणात परिस्थिती सुधारली आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी हौतींचे वर्चस्व आहे.