‘आयएमटी ट्रायलेट-२४’ नौदल कवायतीचा समारोप

0
सागरी सहकार्य व नौदलातील परस्पर कार्यान्वयन वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयएमटी ट्रायलेट-२४’ या त्रिपक्षीय नौदल कवायतीतील एक क्षण . छायाचित्र: पीआयबी

भारत, मोझांबिक व टांझानियाच्या नौदलांचा सहभाग 

दि. २९ मार्च: सागरी सहकार्य व नौदलातील परस्पर कार्यान्वयन वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयएमटी ट्रायलेट-२४’ या त्रिपक्षीय नौदल कवायतीचा आज मोझांबिकमधील नाकाला नौदलतळावर समारोप झाला. या त्रिपक्षीय नौदल कवायतीत भारतासह मोझांबिक आणि टांझानियाच्या नौदलांनी सहभाग नोंदविला होता. भारताच्या ‘आयएनएस तीर’ व ‘आयएनएस सुजाता’ या दोन युद्धनौका या कवायतीत सहभागी झाल्या होत्या. आफ्रिकी देशांबरोबरचे नौदल सहकार्य वाढविण्यासाठी या त्रिपक्षीय कवायतीला २०२२मध्ये सुरुवात झाली होती. भारताच्या ‘आयएनएस तर्कश’ या युद्धनौकेने २०२२मध्ये या कवायतीत सहभाग नोंदविला होता.

‘आयएमटी ट्रायलॅट-२०२४’च्या या वेळच्या कवायतींचे दोन सत्रांत नियोजन करण्यात आले होते. पहिले किनारपट्टी आणि बंदराला भेट देण्याचे सत्र २१-२४ मार्च दरम्यान झाले. या काळात भारताच्या ‘आयएनएस तीर’ व ‘आयएनएस सुजाता’ या दोन युद्धनौकांनी टांझानियामधील झांझिबार व मोझांबिकमधील मापुतो या बंदरांना भेट दिली. या सत्राची सुरुवात नौदल नियोजन विषयक परिषदेने झाली. त्याचबरोबर आपत्ती व हानी नियंत्रण, अग्निशमन, जहाजावर ताबा मिळवून शोधकार्य राबविणे, वैद्यकीय मार्गदर्शन, आपत्कालीन स्थलांतर, पाणबुडी प्रात्याक्षिके पहिल्या टप्प्यात करण्यात आली. कवायतीचा दुसरा सागरी टप्पा २४ ते २७ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या टप्प्यात भारताच्या युद्धनौकांबरोबर मोझांबिकची नामातीली व टांझानियाची फातुंदू या दोन युद्धनौकाही कवायतीत सहभागी झाल्या. भारताच्या ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन’ (सागर) या धोरणाला अनुसरून या दोन्ही देशांच्या नौदलाबरोबर या कावायातीदरम्यान सहकार्य करण्यात आले. या टप्प्यात अपारंपरिक युद्धाचे प्रकार व त्याचे प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष जहाज हाताळणी, शोध व ताबा घेणे व सागरातील विशेष आर्थिक क्षेत्राचे सर्वेक्षण अशी प्रात्याक्षिके हाती घेण्यात आली होती. त्यानंतर मोझांबिकमधील नाकाला नौदलतळावर तीनही नौदलातील सहभागी नौसैनिक व अधिकाऱ्यांचे संयुक्त सत्र झाले.

या कवायतीदरम्यान ‘आयएनएस तीर’ व ‘आयएनएस सुजाता’ या युद्धनौका भेटीसाठी खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. तीनही सहभागी देशांच्या नौसैनिक व अधिकाऱ्यांसाठी या कालावधीत क्रीडास्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. नौदलाच्या १०६ एकात्मिक अधिकारी प्रशिक्षण अभ्यासक्रमातील प्रशिक्षणार्थीनीही या काळात बंदरांना भेट दिली. समारोपाच्या कार्यक्रमाला लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, शालेय विद्यार्थी व स्थानिक भारतीय वंशाचे नागरिक उपस्थित होते.

विनय चाटी  

स्रोत: पीआयबी


Spread the love
Previous articleदेशांतर्गत निर्मित ‘बार्ज’चे नौदलाकडे हस्तांतर
Next articleTRILAT 2024: India, Mozambique, Tanzania Trilateral Maritime Exercise Concludes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here