दि. २६ एप्रिल: ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) संरक्षणमंत्र्यांच्या कझाकस्तानमधील अस्ताना येथे झालेल्या बैठकीत ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेला पाठींबा दर्शविण्यात आला. या बैठकीत सहभागी झालेल्या भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी केले.
शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी झालेल्या सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी या बैठकीच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली. बैठकीनंतर संयुक्त पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. ‘वसुधैव कुटुंबकम’ या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातून उगम पावलेल्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या कल्पनेला सर्व सहभागी देशांनी समर्थन दिले, असे बैठकीनंतर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. शांघाय सहकार्य संघटना क्षेत्रात शांतता,स्थैर्य आणि सुरक्षितता राखण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची भूमिका संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी मांडली. सदस्य देशांच्या समृद्धी आणि विकासासाठी, कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवाद जराही खपवून न घेण्याचा दृष्टिकोन अवलंबण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. संयुक्त राष्ट्रांमध्ये, आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक करारावरील भारताच्या दीर्घकाळापासूनच्या प्रस्तावाचा उल्लेख अरमाने यांनी केला. हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी ‘क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि प्रगती'(सागर) ही भारताची संकल्पनाही त्यांनी अधोरेखित केली.
तत्पूर्वी संरक्षण सचिव अरमाने यांनी किरगिझस्तानचे संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल बेक्बोलोतोव बक्तेबेक असन्कलिएविच यांची भेट घेतली. या बैठकीत परस्पर संरक्षण सहकार्य, संरक्षण सामग्रीची खरेदी, प्रशिक्षण व विभागीय सुरक्षेबाबत चर्चा झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अरमाने यांनी विविध देशांच्या संरक्षणमंत्र्यांशी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबाबत चर्चा केली, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
विनय चाटी