‘टायगर ट्रायम्फ-२०२४’ चा समारोप

0
‘टायगर ट्रायम्फ-२०२४’ या द्विपक्षीय लष्करी सरावातील एक क्षण. छायाचित्र: पीआयबी

द्विपक्षीय लष्करी सराव: भारत व अमेरिकी सैन्यदलांचा सहभाग  

दि. ०१ एप्रिल: भारत आणि अमेरिकेच्या तिन्ही सैन्यदलांचा सहभाग असलेल्या ‘टायगर ट्रायम्फ-२०२४’ या द्विपक्षीय लष्करी सरावाची रविवारी सांगता झाली. मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) तसेच जमीन आणि समुद्रावरील उभयचर सराव  (ॲम्फिबियस एक्सरसाईज) हे या द्विपक्षीय सरावाचे मुख्य उद्दिष्ट होते. अमेरिकि नौदलाच्या ‘यूएसएस सॉमरसेट’ या युद्धनौकेवर हा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा सराव दोन्ही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारीचे निदर्शक मानले जाते. मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) मोहीमा हाती घेण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि मानक कार्यप्रणाली ठरविण्याच्या उद्देशाने या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

‘टायगर ट्रायम्फ-२०२४’ या द्विपक्षीय लष्करी सरावाचा बंदरावर होणारा टप्पा विशाखापट्टणम येथे १८  ते २५ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या टप्प्यात प्री-सेल चर्चा, विषयतज्ञांच्या विचारांची देवाणघेवाण, क्रीडा स्पर्धा, जहाजावरील कवायती आणि क्रॉस डेक भेटींचा समावेश होता.  भारताच्या चैतन्यपूर्ण आणि महान संस्कृतीचे प्रदर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दोन्ही देशांच्या नौदलातील कर्मचाऱ्यांनी २५  मार्च रोजी होळीचा सण एकत्रित साजरा केला.  सरावाचा सागरी टप्पा २६ ते ३०मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या टप्प्यात दोन्ही देशांच्या तुकड्यांनी सागरी सराव केला आणि त्यानंतर संयुक्त कमांड आणि कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यासाठी तसेच मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहीमेअंतर्गत संयुक्त मदत आणि वैद्यकीय शिबिर उभारण्याचा सराव करण्यासाठी काकीनाडा इथे सैन्य उतरवले होते. भारतीय नौदल आणि यूएस नौदलाच्या जहाजांदरम्यान क्रॉस डेक हेलिकॉप्टर सरावात काकीनाडा आणि विशाखापट्टणम येथे यूएच३एच, सीएच५३ आणि एमएच६०आर या हेलिकॉप्टरनी सहभाग नोंदवला.

भारतीय नौदलाच्या सहभागी युनिट्समध्ये लँडिंग प्लॅटफॉर्म डेक, मोठे लँडिंग शिप टँक यांचा समावेश होता. यामध्ये नौदलाच्या इंटेग्रल लँडिंग क्राफ्ट्स आणि हेलिकॉप्टर, मार्गदर्शित मिसाइल फ्रिगेट आणि लांब पल्ल्याच्या सागरी शोध विमानांचाही समावेश होता.  भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व एका इन्फंट्री बटालियन गटाने केले होते, यात  यांत्रिकी सैन्याचा समावेश होता तर भारतीय वायुसेनेने एक मिडीयम लिफ्ट विमान, वाहतूक करणारे हेलिकॉप्टर आणि जलद कृती वैद्यकीय पथक तैनात केले होते. ‘यूएस टास्क फोर्स’मध्ये यूएस नेव्ही लँडिंग प्लॅटफॉर्म डॉकचा समावेश होता. याशिवाय नौदलाचे लँडिंग क्राफ्ट, एअर कुशन आणि हेलिकॉप्टर, एक विनाशक, सागरी टेहळणी विमान, तसेच अमेरिकन पाणबुड्या यांचा समावेश होता. तिन्ही सेवांमधील विशेष मोहीम कृती दलांनीही या सरावात भाग घेतला, तसेच बंदर आणि सागरी टप्प्यात विशाखापट्टणम आणि काकीनाडा येथे संयुक्त सराव केला.

विनय चाटी

स्रोत: पीआयबी

 


Spread the love
Previous articleतुर्कीच्या स्थानिक निवडणुकांमध्ये एर्दोगन यांच्या सत्तेसमोर तगडे आव्हान, महापौर निवडणुकीत विरोधकांचा मोठा विजय
Next articleHAL Records Double Digit Growth, Earns Highest-Ever Revenues

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here