‘आकाशतीर’ हवाई संरक्षण यंत्रणा लष्करात तैनात
दि. ०५ एप्रिल: हवाई संरक्षण क्षमता अधिक मजबूत व सक्षम करण्याच्या उद्देशाने देशांतर्गत निर्मित ‘आकाशतीर’ ही हवाई संरक्षण यंत्रणा सीमेवर तैनात करण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. या स्वयंचलित यंत्रणेमुळे लष्कराच्या विविध ठिकाणी तैनात असलेल्या हवाई संरक्षण तुकड्यांना अधिक समन्वयाने काम करता येणे शक्य आहे. त्या दृष्टीने ही यंत्रणा सीमाभागात तैनात करण्याची सुरुवात लष्कराने केल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
‘आकाशतीर कंट्रोल अँड रिपोर्टिंग सिस्टीम,’ या हवाई संरक्षण यंत्रणेमुळे लष्कराच्या हवाई संरक्षण तुकड्यांना कमी उंचीवरील व युद्धक्षेत्रात कमी उंचीवर असलेले हवाईक्षेत्र रक्षण करणे सोपे जाणार आहे व त्यांच्या कार्यक्षमतेतही वाढ होणार आहे. आकाशतीर यंत्रणेच्या पहिल्या तुकडीचे अनावरण गाजियाबाद येथील ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’च्या परिसरात करण्यात आले. भारतीय लष्कर अधिक तंत्रज्ञानक्षम करणे व त्या माध्यमातून संरक्षण क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने ही यंत्रणा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या यंत्रणेमध्ये डिजिटल कार्यप्रणाली बसविण्यात आल्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढली आहे. त्यामुळे लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेशी त्याचे एकत्रीकरण व समन्वय अधिक सोपा जाणार असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.
‘आकाशतीर कंट्रोल अँड रिपोर्टिंग सिस्टीम,’ या हवाई संरक्षण यंत्रणेची निर्मिती करण्याबाबत संरक्षण मंत्रालयाने ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’शी एक हजार ९८२ कोटींचा करार केला होता. त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर ही यंत्रणा तयार होऊन हवाई संरक्षणासाठी सज्ज झाली आहे. भारताचे लष्कर सध्या एका बदलातून जात आहे. हा कायापालट होत असताना हवाई संरक्षणाची विद्यमान स्थिती व भविष्यातील गरजा लक्षात घेता, ही हवाई संरक्षण यंत्रणा भारताच्या लष्करासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
आत्मनिर्भरतेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी विशेष ‘आर्मी डिझाईन ब्युरो’ स्थापन करण्याचा विचार लष्करांकडून सुरू आहे. त्याचबरोबर लष्कराच्या विविध विभाग मुख्यालायांनाही आत्मनिर्भरतेच्या दिशेने अग्रेसर होण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. विशेष तंत्रज्ञानाबरोबरच लष्कराच्या संस्थात्मक कायापालट करण्याबाबतही ‘आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स’मध्ये चर्चा करण्यात आली होती. त्याला अनुसरूनच या हवाई संरक्षण यंत्रणेकडे पाहिले जात आहे. आकाशतीर यंत्रणा लष्कराच्या एकत्रित संचार व रडार यंत्रणेशी जोडली जाणार आहे. त्यामुळे हवाई संरक्षणाच्या क्षमतेत व हवाई नियंत्रणात कमालीची वाढ होणार आहे. या यंत्रणेमुळे धोकादायक लक्ष्यांवर अधिक तत्परतेने मारा करता येणे शक्य आहे त्यामुळे हवाई संरक्षणाच्या उल्लंघनाचा धोका अतिशय कमी होतो व मित्र देशाच्या विमानांना संरक्षण पुरवणे ही शक्य होते, असेही अधिकाऱ्यांने स्पष्ट केले.
आकाशतीर ही हवाई संरक्षण यंत्रणा आव्हानात्मक पृष्ठभागावरही अतिशय तत्परतेने हालचाल करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर संचार साधनांची कमतरता असलेल्या परिसरातही ही यंत्रणा काम करू शकते. लष्करी वाहनावर ही यंत्रणा उभी करण्यात आल्यामुळे त्याची हालचाल व वाहतूक सोपी होऊन परिणामी त्याची कार्यक्षमता वृद्धी होते. ही यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित असल्यामुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. लष्कराकडून २०२४ हे वर्ष ‘तंत्रज्ञान ग्रहण वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याच कालावधीत उच्चतंत्रज्ञानावर आधारित विविध सामग्री लष्कराच्या ताफ्यात तैनात होत आहे.
रविशंकर