सैन्यदलांच्या एकात्मिकरणाबाबत बैठक
दि. ०८ एप्रिल: भारतीय सैन्यदलांच्या समन्वय, सुसूत्रीकरण व एकात्मिकरणाबाबत चर्चा करण्यासाठी व यासाठी नवनवीन कल्पना समोर याव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन चिंतन या बैठकीला नवी दिल्ली येथे सुरुवात झाली. संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. सैन्यदलाच्या एकात्मिकरणाबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित अशा प्रकारची ही पहिलीच बैठक आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात देण्यात आली आहे.
भारतासमोर असलेली सुरक्षा विषयक आव्हाने, त्याला कारणीभूत असणारी भूराजकीय स्थिती पाहता बदलत्या युद्धाच्या स्वरूपाला सामोरे जाण्यासाठी भारताच्या सैन्य दलांमध्ये मोठ्या प्रमाणात कायापालट घडविण्याचे काम सध्या सुरू आहे. गेल्या काही वर्षापासून भारतीय सुरक्षा दले एकत्रित समन्वयातून मोहिमा राबवित आहेत. सैन्य दलातील समन्वय व एकात्मिकरण वाढावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. भविष्यातील युद्धामध्ये तिन्ही दलांचा समन्वय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.
परिवर्तन चिंतन ही अशा प्रकारची पहिलीच बैठक असून, या बैठकीमध्ये सैन्य दलांच्या विविध संस्थांचे प्रमुख, लष्करी व्यवहार विभाग, संयुक्त सेना मुख्यालयातील अधिकारी, तिन्ही सैन्यदलातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विविध स्तरावर त्यांनी केलेले काम आणि त्याच्या अनुभवातून आलेली समज या मुळे या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचा उपयोग सैन्य दलांचे समन्वय व एकत्रीकरण वाढवण्यावर होईल. आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप पाहता त्याला सामोरे जाण्यासाठी सैन्यदले मोठ्याप्रमाणात बदलाच्या प्रक्रियेतून जात आहेत. या बदलांना अधिक गती देण्यासाठी परिवर्तन चिंतन ही बैठक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
नावोन्मेश व युगानुकुलता ही या बैठकीची दोन प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त बाबी समोर येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
टीम भारतशक्ती