नौदलप्रमुखांची उपस्थिती, कोनशिलेचेही अनावरण
दि. १८ एप्रिल: भारतीय नौदलाच्या इतिहास विभागाचे (नेव्हल हिस्टरी डिव्हिजन) नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांच्या हस्ते बुधवारी गोव्यात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नौदलप्रमुखांच्या हस्ते इतिहास विभागाच्या कोनशिलेचेही अनावरण करण्यात आले. नौदलाच्या प्रवक्त्याच्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
नौदलाच्यावतीने हाती घेण्यात येणाऱ्या विविध मोहिमा आणि युद्धकाळातील घटनांची नोंद ठेवण्यासाठी १९६८ मध्ये नौदलाचा एक ‘नेव्हल हिस्टरी सेल’ सुरु करण्यात आला होता. त्याच्या कामाचा परिघ वाढवून २००६मध्ये त्याला ‘नेव्हल हिस्टरी डिव्हिजन’चे स्वरूप देण्यात आले. या विभागाने आत्तापर्यंत नौदलाच्या इतिहासाबाबत १९६८ ते २०२१ पर्यंतच्या नोंदींचा समावेश असलेल्या सात खंडांचे काम पूर्ण केले आहे. नौदलाच्या इतिहासाच्या नोंदी ठेवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम या विभागाने केले आहे. आजपर्यंत एका अर्थाने अनौपचारिक पद्धतीने सुरु असलेले इतिहास संकलनाचे हे काम आता औपचरिक पद्धतीने सुरु होईल, असेही या ‘ट्विट’मध्ये म्हटले आहे.
‘नेव्हल हिस्टरी सेल’चा दर्जा वाढवून त्याचे ‘नेव्हल हिस्टरी डिव्हिजन’मध्ये रुपांतर करणे आणि प्रत्यक्ष नौदलप्रमुखांच्या हस्ते त्याच्या कोनशिलेचे अनावरण करणे, यातून नौदल आपल्या इतिहासाच्या नोंदी ठेवण्याबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते. भारतीय नौदलाच्या अतिशय समृध्द परंपरा, सागरी मोहिमांची जंत्री, त्यांचा इतिहास, युद्धात गाजविलेला पराक्रम या विषयीची छायाचित्रे, चलचित्रे, लेख, आकडेवारी, स्मृतिचिन्हे, नौदल इतिहासाशी संबंधित विविध वस्तू अशांचा खजिनाच नौदल इतिहास विभागाकडे उपलब्ध आहे. याचा उपयोग इतिहासकार, नौदलविषयक जाणकार व अभ्यासक, संशोधक आदी सर्व घटकांना होऊ शकेल, असे नौदलाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
विनय चाटी