दि. १३ मार्च: स्वदेशी तंत्रज्ञानाने देशांतर्गत विकसित व उत्पादित केलेल्या विविध शस्त्रांची मारकक्षमता प्रदर्शीत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भारतशक्ती” या तिन्ही सैन्यदलांचा समावेश असलेल्या संयुक्त लष्करी कवयातीमुळे आघाडीचा शस्त्र उत्पादक देश म्हणून भारताची ओळख जगापुढे आली असून, या क्षेत्रातील भारताच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
राजस्थानातील पोखरण येथे सोमवारी तिन्ही सैन्यदलांचा समावेश असलेल्या ‘भारतशक्ती’ या संयुक्त लष्करी कवायतींचे आयोजान्कारण्यात आले होते. या कवायतीदरम्यान स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित रणगाडे, तोफा, रॉकेटप्रणाली यांच्या गर्जनेमुळे आसमंत भारून गेला होता. तर तेजससारखी देशातच विकसित व उत्पादित विमाने, ध्रुवसारखी हेलिकॉप्टर आकाशात आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत होती. त्यांची
मारकक्षमता, अचूकता या कवायतीदरम्यान सातत्याने सिद्ध होत होती. या कसरतीदरम्यान भारताने अत्यंत मोठ्याप्रमाणात आपल्या उत्पादन क्षमतेचे प्रदर्शन केले होते. मंगळवारी झालेल्या तेजसच्या अपघाताचे गालबोट याला लागले असले, तरी या क्षेत्रातील आपली क्षमता भारताने सिद्ध केली आहे व ‘भारतशक्ती’मुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ ही भारतासाठी केवळ घोषणा नसून ते ‘मेक इन इंडिया’ला जागतिक स्तरावर मान मिळवून देण्याचे ‘मिशन’ आहे, हेच या कवयातीने सिध्द केले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सुमारे ३० देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्यासमोर भारताने आपले उच्चदर्जाचे संरक्षण तंत्रज्ञान प्रदर्शित केले. त्यामुळे शस्त्र खरेदीसाठी इच्छुक असलेल्या देशांसमोर भारताच्या रूपाने सक्षम पर्याय उभा राहिला आहे.
‘भारतशक्ती’च्या प्रमुख आयोजकाची भूमिका लष्कराकडे होती. ‘आज संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने सिद्ध केलेली क्षमता जगाला दिसणार आहे. देशांतर्गत निर्मित संरक्षण तंत्रज्ञान व शस्त्रे, सामग्रीची मारकक्षमताही जग अनुभवणार आहे. तसेच भारतीय संरक्षण दलांची युद्धसज्जताही या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे,’ असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे या वेळी म्हणाले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह, संरक्षणदल प्रमुख अनिल चौहान, हवाईदलप्रमुख व्ही.आर.चौधरी, नौदलप्रमुख आर. हरीकुमार व वरिष्ठ लष्करी अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. या कवायतीमध्ये हलके लढाऊ विमान तेजस, ध्रुव आणि प्रचंड ही हलकी लढाऊ हेलिकॉप्टर, अर्जुन, के-९ वज्र, ती-९० भीष्म हे रणगाडे, तर धनुष आणि सारंग ही तोफखाना यंत्रणा समाविष्ट करण्यात आली होती. पोखरण येथील ‘फायरिंग रेंज’वर त्यांचे जबरदस्त प्रात्यक्षिक दर्शविण्यात आले. त्याचबरोबर ‘पिनाक’ या देशांतर्गत निर्मित रॉकेटयंत्रणेचेही प्रदर्शन यावेळी करण्यात आले. या प्रदर्शनामुळे भारताच्या लष्करी दलांची वेगवेगळ्या परिस्थितीत समन्वयाने काम करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘मेक इन इंडिया’अंतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्राला अधिक वाव देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ‘स्वदेशीकरण से सशक्तिकरण,’ या बोधवाक्याखाली आयोजित करण्यात आलेली ही कवायत त्याचाच एक भाग होती.
‘गेल्या दशकभरात भारताने स्वदेशी कंपन्यांकडून सुमारे सहा लाख कोटी रुपयांची उत्पादने खरेदी केली आहेत. तर, देशाचे संरक्षण उत्पादन दुप्पट होऊन ते एक लाख कोटी झाले आहे. या कालावधीत देशात संरक्षण क्षेत्रातील दीडशे ‘स्टार्ट-अप’ उदयाला आले. त्यांना संरक्षणदलांनी सुमारे १८०० कोटी रुपयांची कामे दिली,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारतशक्ती’च्या उद्घाटनसत्रात सांगितले. संरक्षण उत्पादनाच्या ‘स्टार्ट-अप’ क्षेत्रात तरुणांनी दिलेला योगदानाची व त्यांच्या उपलब्धींचीही पंतप्रधान मोदी यांनी या वेळी प्रशंसा केली. या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी धोरणाततील बदल, खाजगी क्षेत्राचा समावेश, सूक्ष्म लघु व मध्यम क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन, अशा योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यात संरक्षण उत्पादनासाठी सुरू करण्यात येणाऱ्या ‘डिफेन्स कॉरिडॉर्स’बद्दलही त्यांनी या वेळी माहिती दिली. या कॉरिडॉरमध्ये सुमारे सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे ते म्हणाले. कर्नाटकातील तुमकुर येथे आशियातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्पात हेलिकॉप्टरचे उत्पादन सुरू झाल्याबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला. या क्षेत्रातील स्वयंपूर्णतेमुळे लष्करीदलांत विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विनय चाटी