इराणमधील चबाहारनंतर दुसरे आंतरराष्ट्रीय बंदर ताब्यात
दि. १० एप्रिल: म्यानमारमधील सितवे या महत्त्वाच्या बंदराचे कामकाज पाहण्याचा हक्क भारताकडे आला आहे. इराणमधील चबाहार या बंदरानंतर सितवे हे भारताला कामकाज चालविण्याचा हक्क मिळालेले दुसरे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. चीनच्या सागरी विस्तारवादाला आळा घालण्यासाठी ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या वर्षी केंद्रीय जहाजबांधणी व जलवाहतूकमंत्री सर्वानंद सोनोवाल व म्यानमारचे उपपंतप्रधान ॲडमिरल तीन ऑंग सान यांनी या बंदराचे उद्घाटन केले होते.
म्यानमारमधील कालादन नदीवर असलेले सितवे या बंदराचे कामकाज पाहण्याबाबत इंडिया पोर्ट ग्लोबल लिमिटेड (आयपीजीएल) या कंपनीने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती. मंत्रालयाने या कंपनीला ही परवानगी दिली असल्याचे वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. ‘आयपीजीएल’ ही ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’ व दीनदयाल पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त भागीदारीतून उभारण्यात आलेली कंपनी आहे. परदेशातील बंदरांच्या विकासासाठी २०१५मध्ये जहाज वाहतूक मंत्रालयाच्या निर्देशांनुसार ‘कंपनी कायदा-२०१३ नुसार ही कंपनी सुरु करण्यात आली होती. सध्या इराणमधील चबाहार या बंदरातील सुविधांची उभारणी व कंटेनर व बहुउद्देशीय टर्मिनलवरील कामकाजाचे नियंत्रण करण्याची जबाबदारी जहाज वाहतूक मंत्रालयाने ‘आयपीजीएल’ला दिली आहे.
भारतातील कोलकाता येथील बंदर समुद्रीमार्गे म्यानमारमधील कालादन नदीवरील सितवे बंदराला जोडण्याचा महत्त्वाकांक्षी बहुआयामी प्रकल्पाचा हे बंदर एक भाग आहे. पुढे हे बंदर कालादन नदीमार्गे म्यानमारमधीलच पालेत्वा या बंदराला जोडण्यात येणार आहे व पालेत्वा बंदर रस्तामार्गे मिझोरममधील झोरीनपुई या बंदराला जोडण्यात येईल. या जोडणीमुळे ईशान्य भारतातील उत्पादनासाठी पर्यायी जहाज वाहतूक मार्ग तयार होणार असून, कोलकाता ते मिझोरम या प्रवासाचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे. त्याचबरोबर भारताचे सिलीगुडी कॉरिडोरवरील अवलंबित्वही कमी होणार आहे. भारत आणि बांगलादेशमधील चिंचोळ्या पट्टीला सिलीगुडी कॉरिडोर म्हटले जाते.
विनय चाटी
स्रोत: वृत्तसंस्था