मायक्रोसॉफ्ट ची कबुली
दि. ०९ मार्च: आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘ई-मेल’वर रशियाच्या सरकारपुरस्कृत ‘हॅकर’कडून होत असलेले हल्ले रोखण्यास असमर्थ असल्याची कबुली मायक्रोसॉफ्ट या संगणक क्षेत्रातील मातबर संस्थेने दिली आहे.
‘मायक्रोसॉफ्ट’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ‘ई-मेल’ यंत्रणेत शिरकाव करून त्यामधील ग्राहकांचा तपशील चोरी करण्याचा प्रयत्न गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून रशियाच्या ‘हॅकर’कडून सुरु आहेत. या ‘हॅकर’ना रशियाच्या सरकारचा पाठींबा आहे, असे कंपनीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’कडून प्रथम ब्लॉगद्वारे ही माहिती प्रसृत करण्यात आली. त्यानंतर जानेवारीच्या मध्यात अमेरिकेच्या ‘सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन’कडेही ‘मायक्रोसॉफ्ट’च्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली. ‘अधिकाऱ्यांच्या ई-मेल यंत्रणेवर होत असणारे हल्ले रशियाची परदेशात हेरगिरी करणारी ‘एसव्हीआर’ ही संस्था घडवून आणत असावी, असा ‘मायक्रोसॉफ्ट’ला संशय आहे. अमेरिकेच्या ‘सायबर डिफेन्स एजन्सी’नेही ‘एसव्हीआर’ वर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते ‘एसव्हीआर’ ही रशियाच्या परदेशी गुप्तचार विभागाची सायबर शाखा आहे.
‘एसव्हीआर’च्या ‘सायबर ऑपरेशन्स’मुळे अमेरिकेला धोका निर्माण झाला आहे. सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील अनेक खासगी कंपन्यांनी २०१८ पूर्वीपासून सायबर चोरीच्या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केल्याचे ‘एपीटी-२९’च्या अहवालात स्पष्ट झाले आहे,’ असे ‘सायबर डिफेन्स एजन्सी’ने म्हटले आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’कडून ‘सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन’कडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमुळे रशियाच्या ‘हॅकर’नी ‘मायक्रोसॉफ्ट’च्या कॉर्पोरेट ई-मेल यंत्रणेमध्ये शिरकाव करून त्यांचे काही सोर्सकोड चोरण्याचा प्रयत्न केला व हे चोरलेले कोड पुन्हा मायक्रोसॉफ्ट’च्या अंतर्गत यंत्रणेत शिरण्यासाठी वापरले, असे ‘सीएनएन’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट’च्या यंत्रणेचा वापर करूनच त्याच्या ग्राहकांच्या ई-मेल व इतर सायबर बाबींवर हल्ला करणे ‘हॅकर’ना शक्य होणार आहे, असे सायबर तज्ज्ञांचे मत आहे.
‘ह्युलेट पेकार्ट’नेही ‘एसव्हीआर’कडून होत असलेल्या सायबर हल्ल्याची माहिती जानेवारीत उघड केली होती. रशियाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, अश्या बाबींमुळे सायबर युध्द छेडले जाण्याची शक्यता आहे, असे मतही रशियाकडून व्यक्त करण्यात आले आहे.
अश्विन अहमद