संरक्षण सहकार्याबाबत भारत अमेरिका चर्चा

0
भारताचे लष्कर उपप्रमुख (सामरिक) लेफ्टनंट जनरल टी. के. ऐच यांना अमेरिकी लष्कराच्या लाईटनिंग अकॅडमी (२५ डिव्हिजन) व एव्हिएशन ब्रिगेडच्या क्षमतेबाबत माहिती देण्यात आली. स्रोत: ‘एडीजी-पीआय’
भारताचे लष्कर उपप्रमुख (सामरिक) लेफ्टनंट जनरल टी. के. ऐच यांना अमेरिकी लष्कराच्या लाईटनिंग अकॅडमी (२५ डिव्हिजन) व एव्हिएशन ब्रिगेडच्या क्षमतेबाबत माहिती देण्यात आली. स्रोत: ‘एडीजी-पीआय’

अमेरिकी लष्कराच्या पॅसिफिक कमांड मुख्यालयात बैठक

दि. ११ एप्रिल: संरक्षण व लष्करी परस्पर सहकार्याबाबत भारत आणि अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांत अमेरिकी लष्कराच्या पॅसिफिक कमांडच्या हवाई येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. भारत अमेरिका कार्यकारी सुकाणू गटाच्या या बैठकीला भारताचे लष्कर उपप्रमुख (सामरिक) लेफ्टनंट जनरल टी. के. ऐच उपस्थित होते. या बैठकीत उभय देशांदरम्यान संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या चर्चेचा मसुदा आणि आराखडा ठरविण्याबाबत चर्चा झाल्याचे भारतीय लष्कराच्या माहिती विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांकडून (एडीजी-पीआय) सांगण्यात आले.

उभय देशांतील या चर्चेबाबत ‘एडीजी-पीआय’च्या ‘फेसबुक’वर माहिती देण्यात आली आहे. भारताचे लष्कर उपप्रमुख (सामरिक) लेफ्टनंट जनरल टी. के. ऐच यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केले. त्यांना अमेरिकी लष्कराच्या लाईटनिंग अकॅडमी (२५ डिव्हिजन) व एव्हिएशन ब्रिगेडच्या क्षमतेबाबत माहिती देण्यात आली. भारत आणि अमेरिकेदरम्यान जागतिक स्तरावर सर्वंकष भागीदारीच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. या भागीदारीच्या माध्यमातून समान लोकशाही मूल्ये, मानवी सहकार्य, उभय देशातील नागरिकांचा परस्पर संवाद व उभय देशांच्या हितांची जपणूक, अशा विविध बाबींवर काम करण्यात येत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

भारत आणि अमेरिकेच्या लष्करादरम्यान नुकतीच तिन्ही सैन्यदलांचा समावेश असलेली द्विपक्षीय लष्करी कवायत करण्यात आली होती. मानवीय सहकार्य व आपत्ती निवारण हे या कवायतीचे मुख्य उद्दिष्ट होते. ‘टायगर ट्रायम्फ-२०२४’ या नावाने ही कवायत करण्यात आली. या कवायतीचा समारोप अमेरिकी नौदलाच्या ‘युएसएस सॉमरसेट’ या युद्धनौकेवर करण्यात आला. तर, या कवायतीचा बंदरावरील टप्पा १८ ते २५मार्च दरम्यान भारतीय नौदलाच्या पूर्व विभागाचे मुख्यालय असलेल्या विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता. नौदल कवायतींबरोबरच उभय देशांच्या लष्करातही अशा कबायतींचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या लष्करात परस्पर सहकार्य वाढण्यास मदत झाली, असेही या पत्रकात म्हटले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी उभय देशातील हे सहकार्य महत्त्वाचे मानले जात आहे.

विनय चाटी  


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here