कॅनडाच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये चीनने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी बुधवारी अधिकृत चौकशीत दिली. मात्र चीनच्या या प्रयत्नांचा निकालांवर कोणताही परिणाम झाला नाही. तसेच चीनने कोणत्या विशिष्ट पक्षासाठी हा हस्तक्षेप केला असेल हे केवळ “अशक्य” आहे.
2019 आणि 2021च्या कॅनडाच्या निवडणुकांमध्ये कथित परदेशी हस्तक्षेपाची सार्वजनिक चौकशी करणाऱ्या आयोगासमोर साक्ष देताना ट्रुडो यांनी त्यांना मिळालेल्या माहिती संदर्भातील प्रश्नांची उत्तरे दिली. या निवडणुका “मुक्त आणि निष्पक्ष” झाल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीत चीनच्या संभाव्य हस्तक्षेपाबद्दल प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांमुळे नाराज झालेल्या विरोधी आमदारांच्या दबावामुळे ट्रुडो यांनी गेल्या वर्षी या चौकशी आयोगाची स्थापना केली.
2021च्या प्रचारादरम्यान मुख्य विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या एरिन ओ ‘टोल यांनी अंदाज वर्तवला की चिनी हस्तक्षेपामुळे त्यांच्या पक्षाला नऊ जागा गमवाव्या लागल्या, परंतु त्याचा निवडणुकीवर फार मोठा फरक पडला नाही. ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाने दोन्ही निवडणुका जिंकल्या.
“हो, परदेशी देशांनी हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न करूनही, त्यांच्या मर्जीनुसार त्या निवडणुका झाल्या असे काही आम्ही पाहिले किंवा ऐकले नाही. निवडणुकांचे निकाल कॅनडाच्या लोकांनीच ठरवले होते,” असे ते म्हणाले.
अल्पसंख्याक सरकार जर सत्तेत आले तर चीनविरोधी धोरणे राबविणे त्यांना काहीसे अवघड जाईल किंवा मर्यादित स्वरुपात ती असतील या समजामुळे कॅनडातील चिनी अधिकाऱ्यांनी 2021 मध्ये उदारमतवादी अल्पसंख्याक सरकार निवडून आणण्याला प्राधान्य दिल्याच्या गुप्तचर अहवालाबद्दल विचारले असता, ट्रुडो म्हणाले की, हा अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही.
ट्रुडो म्हणाले, “जरी वैयक्तिक (चिनी) पातळीवर अधिकाऱ्यांनी एखाद, दुसरे प्राधान्य व्यक्त केले असले, तरी आम्हाला मिळालेला आणि सातत्याने मिळणारा प्रतिसाद असा आहे की चीन सरकारला स्वतःला या निवडणुकीत रस असेल हे अगदी अशक्य वाटते”, असेही ट्रुडो म्हणाले.
कॅनडाच्या अंतर्गत सुरक्षा सेवेने सोमवारी आयोगाला कळवले की चीनने गुप्तपणे आणि फसव्या पद्धतीने दोन्ही निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला आहे. हे विधान कॅनडाच्या राजकीय घडामोडींमध्ये चीनच्या संशयास्पद हस्तक्षेपाचा आतापर्यंतचा सर्वात ठोस पुरावा मानला जाऊ शकतो.
कॅनडातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, चौकशीच्या सुनावणीदरम्यान ट्रुडो यांनी चीनची “बदनामी” केली आणि “चीन याचा तीव्र निषेध करतो आणि ठामपणे विरोध करतो”.
प्रवक्त्याने असेही सांगितले की, काही राजकारण्यांनी सार्वजनिकरीत्या चीनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी चीनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या साक्षीत विशिष्ट शब्दांचा भरणा होता आणि त्या संदर्भातला कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आला नाही.
“कॅनडाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यात चीनला कधीही स्वारस्य नव्हते”, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.
कॅनडातील चिनी कंपनी हुआवेई टेक्नॉलॉजीजच्या कार्यकारी अधिकाऱ्याला झालेली अटक आणि त्यानंतर चीनमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली दोन कॅनेडियन लोकांना केली गेलेली अटक यामुळे या दोन्ही देशांमधील कमालीचा तणाव निर्माण झाला होता. या वातावरणातच निवडणुका पार पडल्या. 2021 मध्ये या तिघांची सुटका करण्यात आली.
आयोग 3 मेपर्यंत प्रारंभिक अहवाल पूर्ण करेल तर 2024च्या अखेरीस अंतिम अहवाल सादर केला जाईल.
रेशम
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)