मॉस्को: -रशियाने गुरुवारी प्रथमच आपल्या अंगारा-ए5 अंतराळ रॉकेटचे चाचणी-प्रक्षेपण पूर्वेकडील व्होस्टोचनी कॉस्मोड्रोममधून केले. नवीन सोव्हिएत प्रक्षेपण वाहन विकसित करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून कमी कक्षेत यशस्वीरित्या चाचणी भार ठेवण्यात आला होता.
सोव्हिएतच्या पतनानंतरचे रशियाचे हे पहिलेच रॉकेट असून अंगारा-ए 5 च्या चाचणी प्रक्षेपणामागे, जगातील एक प्रमुख अंतराळ शक्ती बनण्याची रशियाची महत्वाकांक्षा आणि रशियाच्या अति पूर्वेकडील अमूर प्रदेशातील जंगलांमध्ये वसलेल्या व्होस्टोचनीचे वाढते महत्त्व दाखवून देणे हे उद्देश होते.
त्याआधी दबाव प्रणालीतील बिघाड आणि नंतर इंजिन प्रक्षेपण-नियंत्रण प्रणालीतील समस्येमुळे अंगारा रॉकेटची यापूर्वीची दोन प्रक्षेपणे मंगळवारी आणि बुधवारी अगदी शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आली.
गुरुवारी मात्र रशियन अंतराळ शास्त्रज्ञांना कॉस्मोनॉट डे साजरा करण्याच्या काही तास आधी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. 63 वर्षांपूर्वी सोव्हिएत युनियनचा युरी गागारिन हा अंतराळात जाणारा पहिला माणूस होता. त्याची आठवण म्हणून रशियात कॉस्मोनॉट डे साजरा केला जातो.
“इंजिन व्यवस्थित सुरू आहे, उड्डाण सामान्य आहे,” असे नियंत्रण कक्षाने सांगितले. रॉकेटने उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ते 25हजार किलोमीटर (15,500 मैल) प्रति तासापेक्षा जास्त वेग त्याने पकडला.
“इंधन टाक्या अलग झाल्या असून नंतर मध्यवर्ती भाग विलग झाला आणि एक टेस्ट लोड कक्षेत स्थिरावला आहे,” असे रशियाच्या अंतराळ एजन्सी, रोसकोसमॉसने सांगितले.
“रॉकेटने सामान्यपणे काम सुरू केले,”असे रोसकॉसमॉसकडून सांगण्यात आले. “या प्रक्षेपणासह, व्होस्टोचनीवरील अंगारा हेवी-क्लास प्रक्षेपण वाहनांसह अमूर स्पेस रॉकेट कॉम्प्लेक्सच्या फ्लाइट डिझाइन चाचण्या सुरू झाल्या.”
54.5 मीटर (178.81-फूट) असणाऱ्या या थ्री-स्टेज रॉकेटचे वस्तुमान सुमारे 773 टन असून, साधारणपणे 24.5 टन वजन ते अंतराळात वाहून नेऊ शकते, असे रशियाच्या कॉमर्संट वृत्तपत्राने म्हटले आहे.
या प्रकल्पात संरक्षण मंत्रालयसुद्धा सहभागी झाले असून, या प्रकल्पासाठी केवळ रशियन उत्पादित घटक आणि पर्यावरणास कमी हानीकारक असणारे इंधन वापरले गेले आहे . याशिवाय 1960 च्या दशकाच्या मध्यापासून कार्यरत असणाऱ्या रशियाच्या हेवी-लिफ्ट रॉकेट प्रोटॉन एमची जागा ते घेईल असे रशियाने जाहीर केले आहे.
सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे साधारणपणे 1991 साली रशियाने अंगारा प्रकल्प सुरू केला. हे रशियन निर्मित प्रक्षेपण वाहन असून, कझाकस्तानकडून भाड्याने घेतलेल्या बैकोनूर कॉस्मोड्रोमशिवायही ते अंतराळात प्रक्षेपित होऊ शकेल.
अंगारा स्पेस रॉकेट कॉम्प्लेक्स (केआरके) तयार करणे हे विशेष राष्ट्रीय महत्त्वाचे काम आहे “, असे रॉस्कोस्मोस म्हणाले. “अंगारा अंतराळ यानाच्या कार्यान्वयनामुळे रशियाला त्याच्या प्रदेशातून सर्व प्रकारची अंतराळ याने प्रक्षेपित करता येतील तसेच आपला देश अंतराळ क्षेत्रातही आघाडीवर राहील.”
पहिले अंगारा-A5 चाचणी उड्डाण 2014 मध्ये झाले आणि दुसरे 2020 मध्ये उत्तर रशियामधील प्लेसेत्स्क येथून झाले. 2021 मध्ये एक आंशिक चाचणी घेण्यात आली मात्र ती अयशस्वी ठरली.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)