त्रिशक्ती कोअर: अतिउंचीवर १७ हजार फुटांवर क्षेपणास्त्र सराव
दि. १२ एप्रिल: लष्कराच्या त्रिशक्ती कोअरने गुरुवारी ईशान्य भारतातील अतिउंचीवरील ठिकाणी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र युद्धाचा सराव केला. सिक्कीममध्ये १७ हजार फुटांवरील विशिष्ट ठिकाणी हा सराव करण्यात आला, अशी माहिती लष्कराच्या गुवाहाटी येथील जनसंपर्क अधिकाऱ्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
त्रिशक्ती कोअरने आयोजित केलेल्या या सरावात लष्कराच्या पूर्व विभाग मुख्यालयाच्या अखत्यारीतील सर्व पायदळ व यांत्रिक तुकड्या सहभागी झाल्या होत्या, असेही या पत्रकात म्हटले आहे. या सरावात लष्करच्या विविध रणगाड्यांचा उपयोग करून हलत्या आणि स्थिर लक्ष्यांवर मारा करण्याचा सराव करण्यात आला. लष्करी तुकड्यांचे सर्वातील सातत्य राखण्याच्या दृष्टीने हा सराव महत्त्वाचा होता. लष्कराच्या रणगाडाविरोधी ‘गायडेड’ क्षेपणास्त्र यंत्रणेने आपल्या समोरील चिलखती वाहनाचा धोका अतिशय परिणामकारकरित्या व आक्रमकतेने नष्ट केला. अतिशय खडतर डोंगराळ भागात मोहिमेतील यशाच्यादृष्टीने हा सराव महत्त्वाचा होता, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
लष्कराच्या रणगाडाविरोधी ‘गायडेड’ क्षेपणास्त्र यंत्रणेने अतिउंचीवरील रणक्षेत्रात ‘एक मिसाईल-एक टॅंक’ हे आपले ब्रीदवाक्य अतिशय परिणामकारकरित्या सिद्ध केले व आपली अचूकता, कार्यक्षमता व परिणामकारकता प्रदर्शित केली. त्यामुळे भारतीय लष्कराच्या ‘एक मिसाईल-एक टॅंक’ धोरणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या सरावामुळे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची केवळ अचूकताच सिध्द झाली नाही, तर अतिउंचीवर त तैनात करण्यास सक्षम आहे, या वरही मोहोर उठली आहे. या सरावामुळे लष्कराची अतिउंचीवर व खडतर भौगोलिक परिस्थितीत काम करण्याची क्षमताही वाढणार आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.
विनय चाटी