सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) 97 LCA मार्क 1A या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारतीय संरक्षण दलाने निविदा काढली आहे. याची किंमत 65 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असून सरकारकडून देण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर आहे.
LCA मार्क 1A ही तेजस विमानाची प्रगत आवृत्ती आहे.
संरक्षण मंत्रालयाने नुकतीच या संदर्भातील निविदा काढली असून एचएएलला त्यावर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
यामुळे भारतीय हवाई दलाला त्यांच्या MiG-21, MiG-23 आणि MiG-27 चा ताफा बदलण्यासाठी मदत होणार आहे.
स्वदेशीकरणाला चालना देणे तसेच देशभरातील संरक्षण व्यवसायात गुंतलेल्या लहान आणि मध्यम उद्योगांना मोठा व्यवसाय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एचएएलच्या पुनरुज्जीवनावर जोर देत असून सर्व प्रकारची स्वदेशी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि त्यांच्यासाठी आवश्यक इंजिने तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोदींनी स्वतः स्वदेशी लढाऊ विमानात बसून उड्डाण केले-कोणत्याही लढाऊ विमानात बसून पंतप्रधानांनी केलेले ते पहिलेच उड्डाण होते.
97 LCA मार्क 1A लढाऊ विमाने घेण्याच्या योजनेची घोषणा हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी स्पेनमध्ये केली तेव्हा त्यांनी स्वदेशी लढाऊ विमानांच्या ऑर्डरला चालना देण्याच्या मेगा योजनांबद्दल सांगितले होते.
LCA Mark1A ची शेवटची ऑर्डर ८३ विमानांसाठी होती आणि पहिले विमान पुढच्या काही आठवड्यांमध्ये वितरित केले जाणार आहे.
LCA मार्क 1A मध्ये हवाई दलाला पुरवल्या जाणाऱ्या सुरुवातीच्या 40 LCA विमानांपेक्षा अधिक प्रगत एव्हीओनिक्स आणि रडार आहेत. याशिवाय नवीन LCA Mark1As मध्ये ६५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री वापरली जाणार आहे.
याशिवाय एचएएल, 200 LCA मार्क 2s आणि त्यासारख्या पाचव्या पिढीच्या प्रगत मध्यम लढाऊ विमानांच्या खरेदी सौद्यांसाठी देखील सज्ज आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एचएएलच्या समभागांमध्ये 12 एप्रिल रोजी लक्षणीय वाढ झाली आणि ते 3643 रुपयांवर बंद झाले.
आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)