कहाणी जीवन-मृत्यूच्या संघर्षाची
संपादकीय टिप्पणी: यंदा १३ एप्रिल रोजी ऑपरेशन मेघदूतचा ४० वा वर्धापनदिन देशभर साजरा होत आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सियाचीन हिमनदीवर (ग्लेशिअर) नियंत्रण मिळवण्यापासून पाकिस्तानला रोखण्यासाठी जगातील सर्वात प्रदीर्घ काळ सुरू असणारी ही मोहीम आहे. चार दशकांपूर्वी म्हणजे १९८४ पासून भारतीय आणि पाकिस्तानी सैन्य जगातील सर्वात उंच आणि सर्वात थंड युद्धभूमीवरील अघोषित युद्धात अडकले आहे. ‘ऑपरेशन मेघदूत’मुळे भारताने सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवले. उभय देशांत २००३मध्ये युद्धबंदी लागू झाली असली, तरी दोन्ही देशांनी या प्रदेशात कायमस्वरूपी आपले लष्कर तैनात केले आहे. या संघर्षामुळे दोन हजारांहून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला असला, तरी त्यामागे प्रामुख्याने तीव्र हवामान हा घटक कारणीभूत आहे.
आपल्या सैन्याच्या त्याग, बलिदान आणि तिथल्या प्रतिकूल वातावरणात पराकोटीच्या धैर्याने मातृभूमीच्या रक्षणासाठी उभ्या असणाऱ्या सैनिकांच्या कथा भारतशक्तीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. सियाचीन ग्लेशिअरच्या अत्युच्च उंचीवर तैनात असलेल्या सैनिकांना अकल्पनीय आव्हानांचा सामना करावा लागतो. ते या ग्रहावरील सर्वात कठीण हवामानाच्या परिस्थितीशी कसे जुळवून घेतात, उणे ५०अंश सेल्सिअस आणि १८ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर आपले सैनिक कसे तग धरून राहतात, अशा आव्हानात्मक परिस्थितीत हेलिकॉप्टर उडवण्यासाठी कशाची गरज असते, मानव आणि यंत्र या दोन्हींसाठी हवामान हे एक मोठे आव्हान आहे, तरीही आपले सैनिक सियाचीनला सर्व अडचणींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी चिकाटीने तिथे तैनात आहेत.
भारतशक्तीचे मुख्य संपादक नितीन ए. गोखले यांनी लिहिलेल्या ‘बियॉन्ड एन. जे. 9842: द सियाचीन सागा’ या पुस्तकातून घेतलेला हा एक उतारा तेथील विपरीत परिस्थितीचे अगदी चपखल वर्णन करतो. सियाचीनच्या भयावह आणि आव्हानात्मक भूभागावर तैनात असलेल्या सैनिकांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य व तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी दाखविलेली लवचिकता याचे चित्तथरारक वर्णन या उताऱ्यात आहे.
शूर भारतीय सैनिक: येथे असामान्य साहस आणि मनोधैर्य हेच निकष आहेत.
सियाचिनमध्ये १९८८च्या हिवाळ्यामध्ये पाचवी कुमाऊँ बटालियन तैनात करण्यात आली होती. गोपाल करुणाकरन हा तरुण कॅप्टन सोनम येथे तैनात करण्यात आलेल्या तुकडीचे नेतृत्व करत होता. (ते आता शिव नादर स्कूल्सचे संचालक आहेत.) सियाचिनवरील सर्वांत उंच चौक्यांपैकी सोनमही एक चौकी आहे. एके दिवशी बेस कॅम्पवरील कमांडर राजन कुलकर्णी यांनी (यांचे संजय कुलकर्णी यांच्याशी काही नाते नाही, मात्र दोघांनीही कुमाऊँ बटालियनमधूनच कारकिर्दीला सुरुवात केली.) रेडिओ सेटवरून गोपाल यांच्याशी संपर्क साधला आणि केरळहून त्यांच्यासाठी तार आल्याचे सांगितले. त्या काळात पत्नी गीता पहिल्यांदाच गर्भवती होती, हे गोपाल यांना माहीत होते आणि त्यासंदर्भातच संदेश असल्याचाअंदाज त्यांना होताच. त्यावेळची आठवण सांगताना गोपाल म्हणाले, ‘राजन यांनी मला सांगितले, की हिवाळ्याच्या ऐन मध्यात आपण आहोत. त्यामुळे ही तार सोनम चौकीपर्यंत पाठवायची ठरवले, तरी त्याची शाश्वती नव्हती. यासाठी एक-दोन दिवस लागले असते. एखाद्या जवानामार्फत चढाई करून वरपर्यंत तार पाठवायचा विचार केला, तर त्यासाठी किमान सहा तास लागले असते. मला तारेत काय लिहिले आहेत, हे जाणून घ्यायची खूपच उत्सुकता होता. त्यामुळे मी राजनला तार वाचायला सांगितली. आम्ही पाचव्या कुमाऊँ बटालियनचे जवान होतो आणि ही बटालियन शिस्त व शिष्टाचारासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आम्हामध्ये अनौपचारिक असे बोलणे फार कमी वेळा होत असते. त्यानंतर राजन यांनी तार वाचली. त्यावेळी त्यांनी मला ‘तुम्हाला मुलगी झाली, अभिनंदन’, अशा शुभेच्छा वगैरे दिल्या नाहीत. ते फक्त म्हणाले, ‘अभिनंदन तुम्ही
खरेखुरे ५ कुमानी आहात.’ त्याचा अर्थ तुम्हाला मुलगी झाला, असा होत होता. ही घटना २५ वर्षांपूर्वीची आहे. त्या वेळी आमच्या तुकडीमध्ये तैनात करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला एक मुलगी होती आणि तुकडीच्या बाहेर नियुक्ती झाल्यानंतरच त्यांना मुलगा झाला, हा योगायोग होता. मला मुलगी झाल्यानंतर चौथ्या दिवशी मला निरोप मिळाला होता.’ त्या काळामध्ये सियाचिनवर तैनात असणाऱ्या जवानांना निरोप देण्यासाठी तार हेच एकमेव माध्यम होते आणि त्याच माध्यमातून दूर केरळमध्ये मुलगी जन्मल्याची आनंदाची वार्ता त्यांच्यापर्यंत आली होती. ‘आम्ही सोनम चौकीवर तैनात असताना, मुलगी झाली. त्यामुळे तिचे नाव सोनम ठेवावे, असे काही जणांचे मत होते,’ गोपाल मुलगी प्रियांकाबरोबर तेव्हाच्या आठवणी सांगताना बोलत होते. प्रियांका आता ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेत आहे. या विषयावर पावभाजी आणि चहा यांचा आस्वाद घेत असताना गोपाल यांना २५ वर्षांपूर्वीच्या सियाचिवरील आठवणी अगदी स्पष्ट आठवत होत्या. प्रियांकाच्या जन्माची वार्ता ही त्यांच्या सियाचिनवरील सर्वांत आनंदाच्या आठवणींपैकी एक असेल, तर एक दु:खद घटनाही त्यांच्या मनामध्ये कायम आहे. सैन्य दलाच्या तुकडीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा प्रमुखाच्या सहाय्यक पदावर गोपाल तैनात होते. एक दिवशी लेफ्टनंट सुनील (आता ते ब्रिगेडिअर आहेत.) गोपाल यांच्याकडे आले आणि म्हणाले, ‘सर राजनसिंह या जवानाला तुम्हाला भेटायचे आहे.’ भेटण्यामागील कारण विचारण्याचा प्रयत्न गोपाल यांनी केला. त्यावर सुनील म्हणाले, ‘सर, तो खूपच लाजाळू आहे आणि तो तुमच्यासमोर यायलाही घाबरतो. तरी पण त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे.’ त्याला घेऊन येण्याची सूचना गोपाल यांनी सुनील यांना केली. राजन हा तरुण १८ वर्षांचा जवान होता. दुर्गम पहाडी भागातून तो आला होता आणि प्रशिक्षणानंतर त्याची पहिलीच नियुक्ती होती. त्याला बोलायला लागताच, त्याने एक वेगळीच विनंती केली. ‘तो म्हणाला, साहिब जब पलटन वापस जायेगी, मुझे एमटी (मोटर ट्रान्स्पोर्ट) प्लाटून में पोस्ट किजिए.’ आतापर्यंत, डोंगराळ भागातून आला असल्यामुळे राजन एखादी कार किंवा अन्य कोणतेही वाहन चालवले नव्हते. मात्र, सियाचिनपर्यंत विमान, ट्रक आणि जीपमधून प्रवासामध्ये तो वाहनांच्या प्रेमामध्ये पडला होता. राजनची ही विनंती नाकारण्याचा प्रश्नच नव्हता आणि सियाचिनवरून परतल्यानंतर ‘एमटी’मध्ये नियुक्ती करण्याचे आश्वासन गोपाल यांनी दिले होते. दुसऱ्याच दिवशी गोपाल आणि त्यांच्या तुकडीतील काही जवानांचा पहिला गट सोनमच्या दिशेने चालू लागला. हा प्रवास २० दिवसांचा होता. राजनचाही या पहिल्या गटामध्ये समावेश होता. चार दिवसांनंतर १७,००० फूट उंचीवरील कुमार तळापर्यंत पोहोचल्यानंतर राजनाला या उंचीवरील आजाराने ग्रासले. त्याला ‘हाय अल्टिट्युड पुलमोनारी ओडेमा’ (एचएपीओ) हा आजार झाला होता. ‘रात्री अडीच वाजता, राजनच्या प्रकृतीविषयी मला वैद्यकीय पथकाकडून निरोप आला. त्यानंतर मी त्याला भेटायला गेलो आणि अर्धातास त्याच्याबरोबर बसलो होतो. त्याची प्रकृती स्थिर असून, ऑक्सिजन दिल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या पथकाने सांगितले. तसेच, सकाळी लवकरात लवकर हेलिकॉप्टर पाठविण्याची सूचनाही करण्यात आली होती. मात्र, पहाटे चार वाजता मला उठविण्यात आले. राजनची प्रकृती वेगाने ढासळत होती आणि त्या तळावर ऑक्सिजनचा खूपच तुटवडा होता. हेलिकॉप्टर येण्यासाठी आणखी ९० मिनिटांचा अवधी होता.’ ‘मात्र, पहाटे चार वाजून १५ मिनिटांनी राजनने अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीपासून एकदम सुदृढ दिसणारा हा जवान उंच डोंगरांमधील आजारांचा बळी ठरला. त्या दिवशी आम्हाला सियाचिनच्या या प्रवासातील ऑक्सिजनची आणि हेलिकॉप्टरची गरज लक्षात आली. सियाचिनवर दाखल होत असतानाच, आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. एका सहकारी जवानाच्या मृत्यूसह समोरील धोक्याचा आम्ही स्वीकार केला होता. आमच्या डोळ्यामध्ये अश्रू नव्हते आणि पुढील सहा महिन्यांच्या आमच्या कर्तव्यासाठी आमचा प्रवास सुरू झाला. शत्रूबरोबरच अत्यंत विपरित असणाऱ्या हवामानाचे आमच्यासमोर आव्हान होते,’ गोपाल यांना त्या घटनाक्रमातील प्रत्येक गोष्टीची आठवण होती. आता, २५ वर्षांनंतर सियाचिनवरील वैद्यकीय आणि मदतीला येणाऱ्या हेलिकॉप्टरच्या सुविधांमध्ये कल्पनेच्या बाहेर बदल झाला आहे. लष्करासाठी परिस्थिती सातत्याने सुधारत आहे. अगदी उंचीवरील प्रत्येक चौक्यांवरही ‘एचएपीओ’च्या बॅग्ज उपलब्ध आहेत. या आजाराची लक्षणे दिसू लागताच, या बॅगेच्या माध्यमातून समुद्रसपाटीवरील हवेचा दाब उपलब्ध होतो. हेलिकॉप्टर येईपर्यंत जवानांना अनेक सुविधा मिळत आहेत. सियाचिनवरील १५० वेगवेगळ्या चौक्यांवर छोट्या आणि मोठ्या आकारांचे ऑक्सिजनचे सिलिंडर मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या काळामध्ये ‘सियाचिन मेडिकल डॉक्ट्रीन’ विकसित झाले आहे आणि त्यामुळेच सियाचिनवरील मृत्यूंची संख्या वेगाने खाली आली आहे. मात्र, सियाचिनवर अपघातच होत नाहीत किंवा जवानांचा आजारामुळे मृत्यू जातच नाही, अशी परिस्थिती नाही. भौगोलिक दृष्टीने अत्यंत खडतर आणि विपरित असणाऱ्या हवामानामध्ये जात असल्यामुळे, जवान किती सुदृढ असला, तरीही आरोग्याच्या काही समस्या निर्माण होतातच. मात्र, आपत्कालिन परिस्थितीमध्ये वैद्यकीय मदत तातडीने उपलब्ध होते आणि या मदतीचा वेग आता खूपच वाढला आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये असी परिस्थिती नव्हती. अनेक वेळा अनपेक्षित समस्याही डोके वर काढत होत्या. दातदुखीने कसे हैराण केले होते, याची आठवण लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अता हस्नैन यांनी सांगितली. ‘सियाचिनकडे जाण्यापूर्वी संपूर्ण तुकडीचे वैद्यकीय तपासणी करण्यात येते. दातांच्या आरोग्यालाही खूपच महत्त्व आहे. सियाचिनवर नियुक्ती करण्यात आल्यानंतर, टेलि-मेडिसिनच्या माध्यमातून सर्वच आजारांवर, अगदी हृदयविकारावरही उपचार केले जाऊ शकतात. मात्र, या सुविधेतून दातांच्या समस्यांवर उपचार केला जाऊ शकत नाही. दात दुखत असणारी व्यक्ती पूर्णपणे पंगू होत असते. त्यामुळेच, एक दातांचा डॉक्टर आणि त्याचा सहाय्यक यांची बेस कॅम्पवर कायमची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे, किमान बेस कॅम्पवर असताना तरी उपचार मिळू शकतात. हे डॉक्टर या कॅम्पवर अनेक जणांचे ‘फिलिंग’ करतात. बेस कॅम्पवर अनेक जणांनी दात गमावले आहेत. मात्र, आता उपचार महत्त्वाचा ठरत आहे. अन्यथा, एखाद्या जवानाचा दात दुखत आहे, म्हणून त्याला हेलिकॉप्टरने खाली आणण्यात आल्याची घटना आणि त्याची किंमत याची कल्पनाच केलेली बरी.’ सियाचिनवर हेलिकॉप्टरचा वापर करण्यासाठी काही संकेत विकसित झाले आहेत आणि तेथे कर्तव्य बजावलेल्या जवानांना या संकेतांची माहिती झाली आहे. गंभीररित्या आजारी किंवा जखमी असणाऱ्या सैनिकासाठी पी-१ हा संकेत वापरण्यात येतो आणि त्याला सर्वोच्च प्राधान्य असते. तुलनेने कमी गंभीर रुग्णासाठी पी-२ हा संकेत आहे. अधिकाऱ्यांना वर किंवा खाली पोहोचविण्यासाठी पी-३ हा संकेत आहे. एखादे पार्थिव खाली आणण्यासाठी पी-४ हा संकेत आहे आणि त्यासाठी सर्वांत शेवटी प्राधान्य असते. ‘एखाद्या जखमी जवानाचा जीव वाचविणेच सर्वांत महत्त्वाचे असते. त्या तुलनेमध्ये पार्थिवासाठी तातडीची निकड नसते. त्यामुळेच, हेलिकॉप्टरचा वापर जखमी जवानाला वाचविण्यासाठी करणे, याला सर्वांत जास्त प्राधान्य असते,’ लेफ्टनंट जनरल अता हस्नैन यांनी संकेताचा प्राधान्यक्रम स्पष्ट केला. मात्र, या प्राधान्यक्रमावर कायम राहण्याच्या सूचनेमुळे काही वेगळे अनुभवही येतात. १९९०च्या मध्यामध्ये गोरखा तुकडीतील एका जवानाचा सोनम येथील चौकीवर ‘एचएपीओ’मुळे मृत्यू झाला होता. या चौकीपर्यंत फक्त हेलिकॉप्टरनेच पोहोचणे शक्य आहे. पहिल्या दिवशी त्याचे पार्थिव हेलिपॅडपर्यंत आणण्यात आले. तेथून ते खाली बेस कॅम्पपर्यंत आणता येणे शक्यत होते. मात्र, त्या दिवशी हेलिकॉप्टरचा चालक अन्य कामांच्या फेऱ्यांमध्ये व्यग्र होता आणि दिवसाच्या शेवटी पार्थिव नेण्याचे आश्वासन त्याने दिले होते. मात्र, दिवस संपत असताना, हेलिकॉप्टरमधील इंधन कमी झाले आणि त्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी येत असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याला दुसरीच कामे लागली. अशा पद्धतीने दोन आठवडे गेली. गोरखा तुकडीतील जवान दररोज हे पार्थिव हेलिपॅडपर्यंत आणत असत. मात्र, ते हेलिकॉप्टरमध्येठेवता येत नसत. सलग दोन आठवडे, मृत सहकाऱ्याचे पार्थिव हेलिपॅडपर्यंत नेण्याच्या या सवयीचा वेगळाच परिणाम झाला. तुकडीतील जवान या पार्थिवाला जिवंत जवानासारखी वागणू केऊ लागले. त्या पार्थिवाशेजारी अन्न ठेऊ लागले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या चौकीवरील परिस्थितीची माहिती झाली आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी हे पार्थिव आणण्यासाठी पी-१चा संकेत दिला. जनरल पी. सी. कटोच यांनीही याविषयी सहमती दर्शविली. ते म्हणाले, ‘या भागातील दृश्यता अत्यंत कमी असते आणि असे कित्येक दिवस सलगपणे घडते. अनेक वेळा सात ते दहा दिवस दाट धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नसते. अशा वेळी हेलिकॉप्टर उडू शकत नाही. तेव्हा, सहकारी जवानाच्या पार्थिवाबरोबर काही दिवस एकाच तंबूमध्ये राहण्याचे प्रसंग येत असतात.’ जवानांचे पार्थिव खाली आणण्यासाठी हेलिकॉप्टर चालकांना वेगवेगळे अनुभव येत असतात. मृतदेहासाठी सर्वांत कमी प्राधान्य असल्यामुळे आणि हेलिकॉप्टरमधील अन्य साहित्यांबरोबर हा मृतदेह खाली आणायचा असतो. अशा परिस्थितीमध्ये चिता हेलिकॉप्टर खूपच लहान असते आणि त्यामध्ये मृतदेह बसू शकत नाही. अनेकदा मृतदेह गुंडाळून, झोपण्याच्या बॅगेमध्ये भरून पाठवावे लागतात. ब्रिगेडिअर (निवृत्त) आर. ई. विल्यम्स यांना आता या गोष्टीचा वेगळाच अनुभव आला. (ते आता जिंदाल ग्रुपमध्ये काम करतात. कारगिल युद्धानंतर लष्कराने संपर्क विभागाची स्थापना केली. त्याची संघटनात्मक उभारणी करण्याचे प्रमुख काम विल्यम्स यांननी केले.) विल्यम्स १९८७मध्ये मेजर होते आणि त्यांना ८ जम्मू अँड काश्मीर लाइट इन्फ्रंट्रीमध्ये नियुक्ती होते. याच बटालियनमधील जवानांनी सियाचिवर दोन वेळा युद्धाचा अनुभव घेतला होता. ब्रिगेडिअर विल्यम्स यांनी कुणाल वर्मा यांच्यासह २०१०मध्ये ‘द लाँग रोड टू सियाचिन : द क्वेश्चन व्हाय’. आपल्याच एका सहकाऱ्याचा अंतिम प्रवास मनासारख्या चांगल्या पद्धतीने होत नाही, हे दु:खदायक असते, असे त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितले आहे. ‘एखाद्या जखमी जवानाला सुरक्षित ठिकाणी नेणे, हे फार कठीण काम नाही. मात्र, मृत जवानाचे पार्थिव नेणे, मनौधैर्य कमी करणारी गोष्ट असते… यातील पहिली गोष्ट म्हणजे, पार्थिव नेण्याची पद्धत खूपच अमानवी आणि अनादर करणारी आहे. एका दोरीला पार्थिव बांधून ते खालच्या दिशेने पार्तिव ओढत न्यावे लागते. त्याला पर्याय नाही. अनेक कारणांमुळे पार्थिव तातडीने खाली नेणे शक्य नसते. त्यामुळे, तुलनेने सोप्या असणाऱ्या प्रदेशापर्यंत हे पार्थिव नेणे गरजेचे असते आणि तेथून स्ट्रेचरचा वापर करता येणे शक्य असते. काही ठिकाणी दोन व्यक्ती चालूही शकणार नाहीत, एवढा खडतर परिसर असतो आणि त्या परिसरातून पुढे जाणे खूपच वेदनादायी असते. ही पद्धती मनाला खूपच वेदना देणारी असते. तसेच, २० हजार फूट उंचीवरून एखादे पार्थिव नेणे, हेही खूपच कठीण काम असते. अशा वेळी पार्थिव खडकासारखे कठीण झालेले असते आणि परिस्थिती कठीण असते. त्यावेळी, हा विचार करणेही नकोसे वाटते, अशा पद्धतीने पार्थिवाचे अवयव ‘एडजस्ट’ करावे लागतात. जगातील सर्वांत उंच असणाऱ्या या युद्धभूमीवरील हे विदारक वास्तव आहे.’ या प्रदेशातील हेलिकॉप्टरच्या उड्डाणांचे नियम खूपच कठोर आहेत. अत्यंत तातडीची निकड असल्याशिवाय, दुपारी बारा वाजल्यानंतर उड्डाण करण्याय येत नाहीत. अगदी कठीण प्रसंगांमध्ये, वैमानिक हेलिकॉप्टर चालविण्यास तयार असतानाही, नियम पाळण्यावरच वरिष्ठांचा भर असतो आणि त्यातून अनेक वेळा निराशा होते. जनरल कटोच यांनी याविषयीची एक आठवण सांगितली, ‘अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी आदेशावर ठाम असतात. किमान आमच्या काळात तरी, दुपारनंतर लष्कराच्या अशा उड्डाणांसाठी थेट मुख्यालयाकडूनच परवानगी काढावी लागत होती. एका घटनेमध्ये, एक जवान अतिउंचीवरील आजारामुळे गंभीर आजारी होता. त्यावेळी परवानगीसाठी मुख्यालयाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, तेथील अधिकारी एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये व्यग्र होते. हवामान खराब होत असल्याची वैमानिकाला जाणीव झाली. त्यामुळे वैमानिकाने मला कल्पना दिली आणि परवानगीशिवायच उड्डाण केले. त्याने त्या जखमी जवानाचे जीव वाचविले. त्या वैमानिकाचे कौतुक करत, मी मुख्यालयाकडे त्याची माहिती दिली. मात्र, लष्कराच्या विभागाने त्याचे उड्डाण थांबविले आणि मी विरोध केल्यानंतरही त्याला माघारी बोलावून घेतले.’ हेलिकॉप्टरचा चालक आमि सैनिकांमधील ऊर्जा हीच गोष्ट सियाचिवरील बचावकार्यामध्ये महत्त्वाची ठरते. गोपाल अशाच एका बचावकार्यातील आठवण आजही सांगतात. बाना येथील चौकीवर तैनात असताना, त्यांच्या तुकडीतील एक जवान पाकिस्तानच्या बाजूला खोलवर पडला. त्यावेळी एका साहसी अधिकाऱ्याने २० हजार फूट खोलवर जात, एकट्यानेच त्या जवानाला बाहेर काढले. हा जवान उणे ४० अंश सेल्सिअस तापमानावर चार तास पडून होता. त्यानंतरही तो बचावला, मात्र त्याला दोन्ही हात गमवावे लागले. त्याला हॉस्पिटलमध्ये पाहायला गेल्यानंतरची आठवण अधिक अभिमानास्पद होती, असे गोपाल सांगतात. ते म्हणाले, ‘त्या जवानाला एक महिन्यानंतर हॉस्पिटलमध्ये भेटल्यानंतर, त्याने सांगितले की, माझा प्रमुख असणारा अधिकारी माझ्या सुटकेसाठी निश्चित येणार, याचा मला विश्वास होता. त्यातून मला विश्वास आणि निष्ठा, नेतृत्व या सर्वांची जाणीव झाली आणि या गोष्टी मी कदीही विसरणार नाही.’ सैनिक त्यांच्या कार्यकाळामध्ये कर्तव्याविषयीची निष्ठा आणि परस्परांविषयीचा जिव्हाळा या गोष्टी आपोआप शिकायला मिळतात. विशेषत: सियाचिनवर तैनात असताना, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) रुस्तुम के. नानावटी यांनी ऑक्टोबर १९८८ ते नोव्हेंबर १९९० या काळामध्ये सियाचिन ब्रिगेडचे नेतृत्व केले होते. त्यांनी लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. ते आटवणी सांगताना म्हणतात, ‘लष्करातील जवानांनी ‘ऑपरेशन मेघदूत’च्या कारवाईमध्ये वेगवेगळ्या तुकड्यांची पार्श्वभूमी असतानाही, त्यांनी असामान्य कामगिरी केली. या जवानांनी निष्ठा, बलिदानाची तयारी, निग्रह आणि चिकाटी यांचे सर्वोच्च प्रदर्शन केले. या वैशिष्ट्यांमुळेच, भारतीय जवान साल्टोरो येथील पाकिस्तानी सैनिकांना सहज नमवू शकले. यातूनच, ‘सियाचिमध्ये तुमचे स्वागत आहे : येथे असामान्य साहस आणि मनोधैर्य हेच निकष आहेत.’ या ब्रीदवाक्याची निर्मिती झाली.’ आज २५ वर्षांनंतरही नानावटी यांच्या या ब्रीदवाक्याला सियाचिनवर तोच मान मिळतो. सातत्याने सियाचिनवर कर्तव्य बजावत असणाऱ्या सैनिकांमध्ये बंधुत्वाचे नाते निर्माण झाले आहे आणि यातूनच अन्य ठिकाणी जाताना ते भावूक होतात. सियाचिनमध्ये कर्तव्य बजावल्यानंतर, त्यांच्या डाव्या खिश्यावर एक करड्या-पांढऱ्या रंगाची पट्टी लावण्यात येते आणि सियाचिनवर कर्तव्य बजावल्याची ही खूण असते. सैनिक, कनिष्ठ अधिकारी, तरुण अधिकारी, वरिष्ठ प्रमुख अशा सर्वांकडेच विजय आणि दु:खाच्या प्रसंगांची मोठी यादीच असते. लेफ्टनंट कर्नल सागर पटवर्धन यांनी त्यांच्या तुकडीसह १९९३-९४मध्ये सियाचिनवर कर्तव्य बजावले आहे. त्यांच्याकडेही काही अविस्मरणीय प्रसंगांच्या आठवणी आहेत. ‘पहिल्यांदाच टेहळणीला सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या प्रवासातच, एका सैनिकाचा अल्सरचा त्रास जाणवू लागला. तो त्याच्याकडील साहित्य उचलण्यास असमर्थ होता. अशा वेळी तुम्हाला कितीही त्रास झाला, तरीही सहकाऱ्याच्या ओझ्यातील भार उचलावाच लागतो. त्याच काळामध्ये सर्वत्र हिम असल्यामुळे ‘व्हाइट आऊट’ होता आणि मार्गापासून आम्ही भरकटलो होतो. गस्तीवर असणाऱ्या एका गटाकडून आम्हाला एका टप्प्यापर्यंत जाण्यास मदत झाली आणि कसेबसे आम्ही एका छोट्या चौकीपर्यंत पोहोचलो. ही चौकी एका छोट्या तंबूमध्ये राहात होती आणि आम्हा सर्वांना सामावून घेण्याएवढी जागा नव्हती. मात्र, आम्ही सर्वांनी तडजोड केली आणि झोपी गेलो.’ दुसऱ्या दिवशीचा अनुभवही असाच महत्त्वाचा होता, असे पटवर्धन सांगतात, ‘प्रात:विधीसाठी बाहेर पडल्यानंतर, एका उतारावर ताज्या बर्फामध्ये कंबरेपर्यंत बुडालो. मी स्वत:चे त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, एका पायातील बुट निसटला. तातडीने तंबूत जाण्याच्या दृष्टीने मी त्या बुटामध्ये पाय घातला, मात्र तो बर्फाने पूर्ण भरला होता. त्यावेळी वारे पूर्ण जोरात होते आणि मी तंबूपासून दहा मीटर अंतरावर होतो. त्यातून मी मदतीसाठी हाका मारल्यानंतरही, त्याचा उपयोग होण्याची शक्यता नव्हतीच. कसेबसे बर्फातून माझी सुटका केली आणि तंबूच्या दिशेने पळत सुटलो. तंबूत आल्यानंतर मी मदतीसाठी दावा सुरू केला. तातडीने झोपण्याच्या पिशवीमध्ये शिरत मी स्वत:ला उब मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सियाचिनच्या खडतर तापमानासमोर उघड्या पडलेल्या पयाला वाचविण्याला माझे सर्वोच्च प्राधान्य होते. त्यासाठी मी पाय घासून, त्याला उब देण्यासाठी प्रयत्न करत होतो. अन्य सहकारी बर्फ वितळविण्यासाठी प्रयत्न करत होते. परिस्थिती सामान्य व्हायला मला तीन तासांचा वेळ द्यावा लागला. पहिल्याच टेहळणीच्या वेळी मला हा अनुभव आला, तर पुढील ९० दिवस कसा जीवंत राहणार?’ हा प्रश्न माझ्या मनाला चाटून गेला. सियाचिनवरील हे कर्तव्य पटवर्धन यांनी यशस्वीपणे पूर्ण केले.
तीन महिन्यांचे कर्तव्य पूर्ण केल्यानंतर, सागर पटवर्धन बेस कॅम्पवर परतले. त्यानंतर त्यांच्याकडे सियाचिन बॅटल स्कूलची जबाबदारी आली. यामध्ये मुलभूत प्रशिक्षण आणि शिष्टाचार शिकवले जातात. या तीन महिन्यांच्या काळामध्ये भीम या चौकीवर हिमस्खलन झाले आणि आठ ते दहा जवान त्यामध्ये गाडले गेले. हेलिकॉप्टरमधून पाहणी करताना, ते वाचले असण्याची शक्यता वाटत नव्हती. मात्र, त्यांचे मृतदेह मिळविणेही आप्यक होते. ब्रिगेडिअर तेज पाठक (ते कालांतराने लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झाले) तेव्हा सियाचिन ब्रिगेडचे प्रमुख होते. त्यांनी पटवर्धन आणि २५ जणांच्या पथकांना ही चौकी नेमकी कोठे आहे, हे शोधण्यासाठी पाठविले. त्याविषयी पटवर्धन सांगतात, ‘आदेश हा आदेश असतो. सामान्यपणे, सियाचिवर दोन वेळा दौरे करणाऱ्यांना पुन्हा त्या भागात पाठविले जात नाही. मात्र, मला पुन्हा पाठविण्यात आले होते. मी ११ दिवसांचे गिर्यारोहण करत, भीम चौकीपर्यंत पोहोचलो. या चौकीला ‘पेट्रोल सागर’ असेही गमतीनेम्हटले जाते. आम्ही या चौकीजवळ पोहोचल्यानंतर, हिमवादळ आले. त्यामुळे सलग तीन दिवस आमचा जगाशी संपर्क तुटला होता. चौथ्या दिवशी आम्हाला त्या जवानांचे मृतदेह शोधण्यामध्ये यशआले. या सर्व पार्थिवांना हेलिकॉप्टरच्या मदतीने परत नेण्याचे कठीण काम आमच्यासमोर होते. आम्ही हे काम पूर्ण केले, यासाठी पुन्हा तीन दिवसांचा कालावदी लागला. आम्ही परतल्यानंतर, आमच्या प्रमुखांनी आम्हाला अभिनंदनाचा संदेश पाठविला आणि पुरस्कारासाठी शिफारस केली. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मात्र, मी या परिस्थितीमध्ये माझे कर्तव्य पूर्ण केले, याचे मला आजही समाधान वाटते.’ जवानांमध्ये कर्तव्याविषयी असणारी सर्वोच्च भावनाच, सियाचिनसारख्या खडतर वातावरणामध्ये भारताला सैनिक तैनात करता येतात. जनरल नानावटी यांनीही अशीच एक दु:खदायक आठवण सांगितली. ‘एका आघाडीच्या चौकीवर हिमस्खलन होत होते, मात्र एका कनिष्ठ अधिकाऱ्याने तेथून चौकी सोडून जाण्यास नकार दिला. अखेरच्या संदेशामध्ये तो म्हणाला, ‘साहिब मैं यहाँ से नही निकल पाउँगा, सब को मेरी राम राम बोल देना.’’ तोफखान्यातील निरीक्षण चौकीवरील एका अधिकाऱ्याचीही अशीच आठवण आहे. तो ६४०० मीटर उंचीवर तैनात होता. तो जखमी झाला होता. मात्र, शत्रकडून रेडिओ संदेशांवर लक्ष ठेवण्यात येते आणि त्यातून चौकीवरील माहिती त्यांना मिळते, याची त्याला जाणीव होती. त्यामुळे त्याने गंभीर जखमी असतानाही संदेश पाठविला नाही. अखेरीस त्याचा मृत्यू झाला. ऑक्टोबर २०१३मध्ये बेस कॅम्पवर गेल्यानंतर, २ बिहार आणि ७ कुमाउँ या बटालियनकडून सियाचिनवर कर्तव्य बजावण्यात येत होते. या वेळी मी सैनिकांबरोबर चर्चा केली. त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. २ बिहार बटालियनमील हवालदार राजीवकुमार यांनी तेथील टोकाच्या थंडीविषयी सांगितले. तेथील अन्न शिजविण्याची त्यांना अडचण होती. ‘वहाँ चावल पकाने के लिए प्रेशन कुकर की २१ सिट्टीयाँ लगानी पडती हैं साहिब.’ तर, या ठिकाणी देण्यात येणारे अन्नपदार्थ उच्चकॅलरी आणि उच्च प्रथिनेयुक्त असले, तरीही खाताना खूप अडचण येते. ‘उपर तो भूकही नहीं लगती है साहिब,’ असे दुसऱ्या एका सैनिकाने सांगितले. त्यामुळे तैनात असताना, मॅगी खीर ते मिल्क शेक असे अनेक प्रकार करण्यात येत असतात.
७ कुमाउँ बटालियनचे कॅप्टन दीपक चौहान यांना अमर या चौकीवरील मुक्कामविसरता येत नाही. ते म्हणतात, ‘अमर चौकीच्या दिशेने जात असता, आमच्या तुकडीसह सर्वच जण सांगत होते, की ही चौकी खूप कठण आहे. मात्र, माझ्या मनात विचार होता, की असं काय कठीण असेल? मी कमांडो प्रशिक्षण पूर्ण केले होते, त्यामुळे मला कठीण जाणार नाही, असे वाटले होते. अमर चौकीसाठी एक हजार फूट उंचींचा भिंतीसारखा कडा चढून जावा लागणार होता. त्यातील २०० मीटर पार केल्यानंतर ६० अंशाचा कोन लागतो. त्यानंतर अखेरच्या ४०० फुटांसाठी अंशांचा कोन होतो. यातील ४०० फुटांचा शेवटचा कडा सर्वांत कठीण होता. अखेरच्या ४०० मीटरचा प्रवास कधीच संपणार नाही, असे वाटते. अखेरीस हा कोन ८० ते ८५ अंशांपर्यंत जाते. हा १००० मीटरचा कडा पार करण्यासाठी दोन ते अडीच तासांचा वेळ लागतो.’ कॅप्टन चौहान यांनी १०० दिवस सियाचिनमध्ये कर्तव्य बजावले आहे. अमर चौकीवर तैनात असताना, कॅप्टन चौहान किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या कमांडरला सैनिकांचे मनोधैर्य कायम ठेवण्याचे आव्हान असते. ती आठवण सांगताना चौहान सांगतात, ‘त्यासाठी, मी सातत्याने जवानांना तंबूमध्ये फेरबदल करण्यास सांगत होतो, त्यानंतर पहाऱ्यांचे काम पाच-सहा तासांनी बदलत होतो, तसेच खाण्यासाठी वेगवेगळ्या डिश तयार करण्याचे आदेशही देत होतो. या चौकीवर आमचे जवान जिलेबीही करत होते.’ या चौक्यांवर अनेक वर्षांपूर्वी स्वयंपाकामध्ये केलेले पदार्थ बहुतेक जण आजही विसरलेले नाहीत. जनरल कटोच सांगतात, ‘मध्य भागातील हिमनदीवर असताना, मला सर्वोत्तम दर्जाचे दही देण्यात आले होते. ‘एचएपीओ’ आजारावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅगमध्ये हे दही तयार करण्यात आले होते.’
बहुतेक सैनिकांना ‘इनसोमनिया’चा आजार उद्भवतो. डॉक्टरांच्या मते, ऑक्सिजनची कमतरता आणि टोकाच्या थंडीमुळे निद्रानाशाचा जारा संभोवतो. सैनिकांना तीन ते चार तास झोपून, सर्व कर्तव्यांची पूर्तता करावी लागते. तसेच, ‘ड्राय बाथ’ही सैनिकांसाठी महत्त्वाची असते. यामध्ये सैनिक दररोज अंतर्वस्त्रे बदलतात. प्रतेयक चौकीवर आता प्रक्रिया केलेले गरम पाणी आणि स्पंज उपलब्ध आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये हा खूप मोठा बदल आहे. मुलभूत सुविधांमध्ये बदल झाले असले, तरीही थंडीपासून बचाव करणारी वस्त्रे योग्य पद्धतीने परिधान करणे, हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. तैनातीपूर्व प्रशिक्षणामध्ये याचे प्रशिक्षण देण्यात येते आणि तैनातीवेळीही त्याविषयी कडक सूचना करण्यात येतात. त्यामुळे आजपर्यंत योग्य गणवेशाअभावी एकही बली गेलेला नाही. वातावरणाशी मिळतेजुळते घेण्याचे वेळापत्रक नीट समजून न घेणाऱ्या आणि न पाळणाऱ्यांना त्रास होतो. साधारणपणे, प्रत्येक सैनिकाला त्याच्या कर्तव्याच्या काळामध्ये नऊ विशेष सुट देण्यात येतात. याविषयीचा एक अनुभव जनरल कटोच यांनी सांगितला, ‘एकदा सियाचिनच्या उत्तरेला तैनात करण्यात आलेल्या कुमाउँ तुकडीतील हिमदंश आणि त्यासारख्या आजाराच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे मी स्वत: त्या ठिकाणी गेलो आणि सैनिकांना विशेष सूटचे सर्व नऊ जोड दाखविण्यास सांगितले. त्यातील अनेकांनी फक्त चार ते पाच जोड्या आणल्या होत्या. त्यांनी हे कपडे मागेच ठेवले होते आणि घरी परतल्यानंतर माजी सैनिक असणाऱ्या वृद्धांना देण्याचे त्यांचे नियोजन होते.’
माय सियाचिन डायरी: ब्रिगेडीअर अभिजित बापट
जुलै २००७मध्ये, मी आणि एनडीटीव्हीतील माझा कॅमेरामन सहकारी मनोज तिवारी सियाचिनच्या बेस कॅम्पपर्यंत गेलो होतो. सियाचिनवर एक माहितीपट तयार करण्याची आमची कल्पना होती. त्यानंतर, एक वर्षाने, सियाचिनवर नागरी गिर्यारोहणाच्या मोहिमेला लष्कराने परवानगी दिली. अनेक वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदा अशा मोहिमेला परवानगी देण्यात आली. आम्ही ५/९ गुरखा रायफल्सच्या तुकडीबरोबर बेस कॅम्पवर चार दिवस घालविले. कर्नल अभिजित बापट या तुकडीचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर जेवण केले, त्यांचा दिनक्रम पाहिला आम्ही सैनिक-अधिकाऱ्यांबरोबर चर्या केली. सियाचिनवरील अनुभव विचारले. हा माहितीपट आपण पाहू शकतो : मात्र, या वीस मिनिटांच्या माहितीपटामध्ये आपण सैनिकांचे सर्वच अनुभव, भावना टिपू शकत नाही. त्यामुळे आम्ही अभिजित (ते आता ब्रिगेडिअर आहेत आणि पुन्हा लडाखमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.) यांना त्यांचे अनुभव लिहिण्याची विनंती केली. त्यांनी लिहिलेले हे अनुभव..
‘ये लब्ज-ए-मोहब्बत, बस इतना सा फसाना है,
सिमटे तो दिल-ए-आशिक, नही तोह जमाना हैं,’
सियाचिनच्या तैनातीतील अनुभवाचा विचार करताना, या दोन ओळी सहज आठवून गेल्या. प्रत्येक श्वासाचा क्षण या ठिकाणी महत्त्वाचा असतो. दहाही दिशांना पसरलेला शूभ्र रंग, शुन्याखाली असणारे अतिथंड हवामान यामध्ये प्रत्येकातील माणूसपणही खुणावत असते. या ठिकाणी कर्तव्य बजावणारी प्रत्येक व्यक्ती हिमालयातील शुद्ध हवेचे श्वसन करत असते. हा आयुष्यभराचा अनुभव असतो. निसर्गाची अभूतपूर्व शक्ती आणि त्याला ओलांडण्याची इच्छा असणाऱ्या मानवी विचार व शरीराला पार करण्याचे पाहण्याचा हा थरारक अनुभव असतो. मानव आणि यंत्रांसाठी ही सर्वांत कठीणचाचणी असते. माझी ही कथा, एका सैनिकाची आणि त्याच्या साहस, सर्वोच्च बलिदानाची आहे. या एका दौऱ्यातील त्याच्यावरील ताणाचा हा अनुभव आहे. यातून भारतीय सैनिकांमधील क्षमतेची जाणीव होते. एकरुप झालेल्या रेजिमेंटमुळे, देशासाठी लढण्याची, बलिदान देण्याची प्रेरणा यातून मिळत असते. कठीण असते ते योग्य असते आणि सोपे ते चुकीचे असते, असे हे धाडस असते. साहस हीच या सर्व सैनिकांची प्रेरणा असते. सियाचिनला एक वलय आहे, त्यातून त्याची चर्चाही होत असते. हेच वलय टिकविणे आणि त्याच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची प्रेरणा मिळत असते.
हवालदार मनबहादूर यांची कहाणी
मनबहादूर १९९३मध्ये लष्कराच्या सेवेत दाखल झाले. ते एक प्रामाणिक सैनिक होते. सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या दुर्गम डोंगराळ भागामध्ये त्यांचे आयुष्य गेले होते. त्यामुळे निसर्गत:च त्यांच्यामध्ये एक शारीरिक आणि मानसिक कणखरपणा आला होता. अत्यंत कष्टाळू आणि काटेकोर असल्यामुळे, त्यांना सहकाऱ्यांमध्ये, अधिकाऱ्यांमध्येही मान होता. त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही देण्यात आल्या होत्या आणि त्यांनी त्या निष्ठेने पूर्ण केल्या होत्या. लष्कराच्या सेवेत पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर, त्यांच्यासाठी आईने एक मुलगी पसंत केली होती. लग्नानंतर मनबहादूर यांना जुळी मुले झाली. जन्मानंतर लवकरच वडील वारल्यामुळे, मनबहादूर त्यांच्या कुटुंबाविषयी, विशेषत: आईविषयी खूपच हळवे होते. सेवेमध्ये त्यांची प्रगती होत होती आणि २००६मध्ये त्यांना हवालदार म्हणून बढती देण्यात आली. त्यानंतर, सप्टेंबर २००६मध्ये मनबहादूर यांच्या तुकडीची नियुक्ती पूर्व लडाखच्या पर्वतरांगांमध्ये झाली. मनबहादूर यांना काही दिवसांमध्येच तेथील हवामानाशी आणि भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतले. त्यांना काराकोरम पर्वतरांगांचाही अंदाज होता. त्यामुळे, ते त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान होते. जगातील सर्वांत उंचावरील संघर्षमय चौकीपैकी एका बाना चौकीवर तैनातीसाठी त्यांनी स्वत:हून इच्छा व्यक्त केली. यासाठी तैनाती आणि पुन्हा मूळ तुकडीमध्ये येण्याचा कालावधी चार महिन्यांचा होता. या काळासाठी प्रत्येक सैनिकाला काटेकोर नियोजन करावे लागते. यामध्ये अन्नधान्याची रसदही बारकाईने वापरावी लागते. तसेच, वाचन व लिहिण्याचे साहित्य, आवश्यक औषधे यांसह अन्य साहित्यही बरोबर घ्यावे लागते. शेवटच्या स्थानी जाईपर्यंत समतोल साधता येईल, या पद्धतीने हे साहित्य एकत्रित करावे लागते. चौकीपर्यंतची वाटचाल दहा ते बारा दिवसांची असते, त्या काळातील हवामानाची परिस्थिती आणि वाटचालीचाही विचार करावा लागतो.
शोकांतिका
प्रत्यक्ष तैनातीच्या एकदिवस आधी मनबहादूर यांच्यासाठी एक तार आली. त्यांच्या गावामध्ये आजार फैलावला होता. यात त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी व दोन्ही मुले आजारी होती. मुलांची प्रकृती गंभीर होती. या संदेशामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. सर्व वरिष्ठांनी मनबहादूर यांना रजा मंजूर केली आणि गावी जाण्याची परवानगी दिली. ही माहिती मिळाल्यानंतर मनबहादूर यांनी एकही शब्द उच्चारले नाही आणि चेहऱ्यावर भावनाही दिसू दिल्या नाहीत. त्यांच्या मनामध्ये काय चालले आहे, याची कोणालाच कल्पना येत नव्हती. दुसऱ्या दिवशी जाऊ शकतो, असे वरिष्ठांनी सांगिल्यावर, मनबहादूर यांनी घरी जाण्यास नकार दिला. हा सर्वांसाठीच धक्का दिला होता. त्यांना आर्थिक मदत हवी असावी, असा अनेकांचा समज झाला होता.
‘खरा’ मनबहादूर
त्यांना जाण्यासाठी सांगितले जात असतानाही, ते नकार देत होते. मनबहादूर यांनी दिलेले उत्तर ऐकून सर्वच जण अवाक झाले. ते म्हणाले, ‘साहेब, माझी आई तर गेलेलीच आहेत आणि त्याला आता दहा दिवस झाले आहेत. तार आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप काळ जावा लागतो. येथून घरी जाण्यासाठी मला सात दिवस लागतील. घरी पोहोचेपर्यंत सर्व विधी पूर्ण झालेले असतील. पत्नी आणि मुलांचा विचार केला, तर देवानेच ती मला दिली आहेत. देव त्याची जबाबदारी पूर्ण करेल आणि ते सुरक्षित राहतील, असा मला विश्वास आहे. आज माझ्या तुकडीला माझी गरज आहे. त्यामुळे मी माझ्या सीनिअर आणि ज्युनिअरना सोडून कसे जाऊ शकतो? जीवन आणि मरण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या प्रवासामध्ये मी एखाद्या हिमचरामध्ये पडू शकतो, मरू शकतो. आपण यातील एक तरी घटना थांबवू शकतो का? त्यामुळे, आपण नियोजनाप्रमाणे पुढे चलावे, असे मला वाटते. माझ्या कामगिरीवर काहीही परिणाम होणार नाही, याची हमी मी देतो. सियाचिनवरील कामगिरी संपल्यानंतर, मला अधिकृत सुट्टी द्यावी, असी मला विनंती आहे.’ त्या खोलीतील सर्वांना त्याच्या या उत्तराने मोठा धक्का बसला होता. आजच्या या जगामध्ये प्रत्येकालाच कमी वेळेत यश हवे आहे आणि सुखी आयुष्याची आस आहे. मात्र, आपल्या कर्तव्याप्रती कोणताही त्याग करण्याची तयारी असणारा आजच्या जगातील दुर्मिळ माणूस सर्वांसमोर होता. त्यांना ही प्रेरणा बहुतेक त्याच्या तुकडीकडूनच मिळाली असावी. मनबहादूर यांनी त्यांची सियाचिनवरील कर्तव्यपूर्ती निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पूर्ण केली. त्याबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला. सियाचिनवर अशा प्रकारच्या त्यागाच्या घटना नेहमीच घडत असतात. त्यातील काहींना प्रसिद्धी मिळते, तर काही काळाच्या पडद्यावरून पुसून जातात. हे सत्य सांगण्यासाठी माझ्याहून अधिक चांगला कोणताही व्यक्ती असू शकणार नाही. हवालदार मनबहादूर यांच्यासारख्या जवानांबरोबर जगातील सर्वांत उंच, थंड आणि सर्वांत आव्हानात्मक अशा रणभूमीवरील हा अनुभव होता. अशा प्रसंगांनंतर माझा जगण्याविषयीचा दृष्टिकोनही बदलून गेला असून, जवानांच्या सेवेबद्दलचा आदर आणखी वाढला आहे. आज इतक्या वर्षांनंतर मागे पाहताना, माझे मलाच आश्चर्य वाटते. मी आज ज्यांचे नेतृत्व करत आहे, त्या सर्व जवानांना मी खराच ओळखतो का? की त्यांचे नेतृत्व करण्याचा मला अधिकार आहे. या लेखनाचा शेवट मी कवितेच्या प्रसिद्ध दोन ओळींनी करतो.
हमने मोहब्बत करना नही सिखा,
अपने मोहब्बत के अलावा कुछ नहीं सिखा,
जिंदगी जीने के सिर्फ दोन पहलू है गालिब
एक आपने नहीं सिखा, एक हमने नहीं सिखा.
जनरल कटोच यांनीही अशाच पद्धतीचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, ‘सियाचिनवर कंपनीसह तैनात असताना, माझाही असाच एक अनुभव आहे. एका चौकीवर मला सकाळी लवकर जायचे होते. त्यावेळी बर्फावरील स्कूटरने सुर्योदयापूर्वी एक तास जाण्याचे ठरले होते. उत्साहात मी योग्य वेष परिधान केला नव्हता. त्या प्रवासात मला माझ्या कानांची जाणीव फारशी होत नव्हती. चौकीला भेट दिल्यानंतर, दुपारी हेलिकॉप्टरने बेस कॅम्पनेखाली आलो. सांयकाळनंतर माझे दोन्ही कान काळेनिळे पडू लागले आणि ही हिमदंशाची लक्षणे होती. त्यानंतर मी महिनाभर मी नीटसा झोपूही शकलो नाही.’ अशा परिस्थितीमध्ये ‘एसओपी’ (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स) हीच काम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची प्रक्रिया असते. कर्नल (निवृत्त) दनवीरसिंग यांनीही अशाच प्रकारची आठवण सांगितली. ते ९ शीख लाइट इन्फंट्री बटालियनमध्ये असताना त्यांना सियाचिनवरील नियुक्तीस जाण्याची सूचना करण्यात आली. त्यावेळी सैनिकांची मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. ‘आमच्या प्रशिक्षणाला एक वर्ष आधीपासून सुरुवात करण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या तुकड्यांची छायाचित्रे आणि चित्रीकरण दाखविण्यात आले. तसेच, सियाचिनवर कर्तव्य बजावलेल्या अधिकारी आणि सैनिकांशीही संवाद साधता आला. या वेळी आमच्या मनातील सर्व शंकांवर, भीतीवर चर्चा करण्यात आली. हिमदंश, हिमचर यांसारख्या सर्व समस्यांचा विचार करण्यात आला. या परिस्थितीमध्ये फक्त प्रशिक्षण आणि फक्त प्रशिक्षणच आपल्याला जिवंत ठेऊ शकते, हे आमच्या मनामध्ये सिद्ध झाले. संपर्क अधिकारी म्हणून मी सर्वांत आधी हिमनदीवर गेलो. त्यामुळे मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टी जवानांना सांगितलया. आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जाणार आहोत, याची सर्वच जवानांना तोपर्यंत पुरती जाणीव झाली होती.’ या सर्व काळामध्ये प्रशिक्षण तुम्हाला संपूर्णपणे सक्षम करते, असे दनवीर सांगतात. त्यांना हिमचरामध्ये पडण्याची भीती होती. मात्र, परिसरातील एका मोठ्या हिमचरावरून जाताना, त्यांच्या चार जणांच्या गटाने ती चर यशस्वीपणे पार केली. या वेळी त्यांनी ‘एसओपी’चा वापर केला आणि सुरक्षितपणे पलिकडे पोहोचले, ती आठवण ते आजही सांगतात. या काळामध्ये सैनिकांना अविस्मरणीय अनुभव येत असतात. ‘२ बिहार’चा कॅप्टन भारत या तरुण अधिकाऱ्याचा अनुभवही भारतीय लष्कराच्या व्यवस्थेविषयी अभिमान निर्माण करणारा आहे. पाकिस्तानी चौकीपासून सर्वांत जवळअसणाऱ्या पेहलवानपर्यंत चालत जाण्याचा अनुभव ते सांगतात. त्यांच्या तुकडीमध्ये २० जवान होते. प्रत्येकाला आपल्या सोयीप्रमाणे चालण्याची मुभा होती. मात्र, परस्परांच्या सहकार्याशिवाय आणि संघभावनेशिवाय, तुम्ही त्या परिस्थितीमध्ये जगूच शकत नाही, याची सर्वांनाच जाणीव होती. एक अनुभव कधीच विसरू शकत नाही, असे सांगताना ते म्हणाले, ‘या काळामध्ये आमच्यापासून ३५० मीटर अंतरावर असणाऱ्या पाकिस्तानच्या चौकीला अचानक आग लागली आणि काही मिनिटांमध्येच या चौकीची राखझाली. आम्ही त्यांच्यापासून सर्वांत जवळ असल्यामुळे, मदत हवी आहे का, असे आम्ही त्यांना ओरडून विचारले. मात्र, त्यांनी मदत घेण्यास नकार दिला. त्यावेळी आम्हाला एक जाणीव झाली. भारताच्या चौक्यांवर लष्कराचे लक्ष असते आणि परिस्थिती तपासण्यासाठी दिवसातून किमान एकदा तरी हेलिकॉप्टर प्रत्येक चौकीवरून घिरट्या घालून जाते. माझ्या ११० दिवसांच्या त्या चौकीवरील मुक्कामामध्ये पाकिस्तानचे हेलिकॉप्टर दोनदाच दिसले. पाचाकिस्तानच्या या सुविधांचा विचार करताना, आम्हाला लष्कराचा आणि आपल्या व्यवस्थेचा खूपच अभिमान वाटला.’ लष्कराकडून कितीही सुविधा देण्यात आल्या, तरीही चौक्यांवरील जागेची मर्यादा आणि अन्य भौगोलिक गोष्टींमुळे समस्या कायमअसतात. जनरल हस्नैन यांनी याविषयीची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘बाना येथील चौकीवर रेल्वेतील ३ टायर बर्थएवढ्या जागेचा बंकर असतो. त्यावेळी झोपताना, जवानांना आणि अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पायावर पाय टाकून झोपावे लागते. स्वाभाविक, पाय वर ठेवण्याची पहिली संधी अधिकाऱ्याला मिळते. पण, काही वेळानंतर तो जवान म्हणतो,साहिब बहुत हो गया, अब ज्यादा वेट हो रहा है, अब थोडी देर के लिये मैं पांव उपर रखता हूँ.’ अशा अनेक गोष्टी परस्परांना सांगण्यासारख्या आहेत. त्यातूनच तीन दशकांपासून हा परिसर आणि जवानांमधील नाते दृढ होत गेले आहे. अतिशय खडतर असणाऱ्या सियाचिनमुळे भारतीय लष्कराविषयीचा अनुभव वाढीस लागला आहे. त्यातून देशाचा सैनिकांवरील विश्वास कायम आहे आणि त्याबद्दल त्यांना आदरही मिळतो.
ओपी बाबांची कथा
माहितीपटाची निर्मिती करत असताना, माझा सहकारी मनोज सुरुवातीच्या दृश्याविषयी वारंवार विचारणा करत होता. आम्ही अशा पद्धतीचे दृश्य कसे मिळेल, याचा विचार करत होतो. या दृश्यामध्ये सैनिकांमधील माणूसपण दिसावे, याचा आमचा प्रयत्न होता. पहिल्या २४ तासांमध्ये यासाठी आम्हाला काहीच मिळाले नाही. सियाचिनच्या बेस कॅम्पवर सैनिक दिवसभर प्रशिक्षण घेत होते, सायंकाळी बास्केटबॉल खेळत होते, पत्र लिहीत होते आणि कॅम्पवरील दिनचर्या सुरू होती. हेलिकॉप्टर येत जात होते. अतिउंचावरील चौक्यांसाठीचे साहित्य पाठविले जात होते, हेलिकॉप्टर भरत होते, रिकामे होत होते. मनोजला त्या एका दृश्याचे काळजी होती आणि तो मला म्हणाला, ‘सर, एक किलर सिक्वेन्स अभी मिला नहीं हैं.’ मी त्याला उत्तर दिले, ‘तुम ढूंढही लोगे मनोज.’ आमच्या नशिबाचा भाग म्हणा, किंवा ओपी बाबांची कृपा म्हणा, दुसऱ्या दिवशी आमच्या बरोबर असणाऱ्या गुरखा युनिटच्या परतीचा प्रवास सुरू झाला. तीन महिन्यांच्या कर्तव्यपूर्तीनंतर ही तुकडी परतत होती. पांढऱ्या रंगाच्या विशेष गणवेशामध्ये काळसर चेहरे आणि वाढलेली दाढी असणारे जवान एका रांगेमध्ये पुढे जात होते. मनोजने त्यांचे चित्रीकरण घेण्यास सुरुवात केली. प्रचंड आकारातील त्या पर्वतरांगांसमोर ही सैन्याची रांग अगदीच छोटी दिसत होती. आता सैनिकांकडून एक पारंपरिक रिवाज पूर्ण करण्यात येणार असल्याचे या तुकडीचे प्रमुख अभिजित बापट यांनी सांगितले आणि त्यांनी काही अंतरावर असणाऱ्या एका इमारतीकडे बोट दाखविले. ते एका मंदिरासारखे होते. लष्कर आणखी काय करत असते, या विचाराने मला आश्चर्य वाटत होते. त्यामुळे मी आणि मनोज त्या दिशेने निघालो. ते एक मंदिरच होते.
ओपी बाबांचे मंदिर
कॅप्टन तरुण तिवारी यांच्या (आता ते वरिष्ठ पदावर पोहोचले असतील.) नेतृत्वाखाली सैनिकांनी त्या मंदिरामध्ये प्रवेश केला. सर्व जवान तेथे नतमस्तक झाले आणि ‘ओपी बाबा की जय’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर एका मिनिटांची शांतता पसरली. त्यानंतर सर्व सैनिक परतले. हिमनद्यांच्या या प्रदेशातून सुरक्षितपणे परतल्याबद्दल ते ओपी बाबांचे आभार मानत होते.
ओपी बाबा कोण होते?
या मंदिरातील एका फलकावर लिहिले होते, ‘सदैव हिमाच्छादित असणाऱ्या या सियाचिनच्या प्रदेशामध्ये ओपी बाबा कोठून आले, हे स्पष्ट होत नाही. मात्र, उत्तर सियाचिनच्या प्रदेशातील मलाउँ चौकीच्या परिसरात १९८०च्या दशकामध्ये हे मंदिर बांधण्यात आले. ओमप्रकाश या सैनिकाची आठवण सांगण्यात येते. या चौकीवरील सर्व सैनिकांना काही कारणासाठी थोड्या कालावधीसाठी मुख्यालयात परत बोलावण्यात आल्यानंतर, ओमप्रकाश यांनी एकट्याने शत्रूचा हल्ला परतवून लावला होता. ओमप्रकाश कोण होते आणि अन्य माहिती ही दंतकथाच आहे.’ ‘सैनिक संत ओम प्रकाश यांनाच ओपी बाबा असे म्हटले जाते आणि तेच संपूर्ण तुकडीचे संरक्षण करतात, असा ठामविश्वास आहे. निसर्गाच्या आपत्तीबरोबरच शत्रूच्या आक्रमणापासूनही तेच संरक्षण करते, असे मानले जाते. भविष्यातील संकटाची जाणीव सैनिकांना त्यांच्या स्वप्नांमधून करून देण्यात येत असते. प्रत्येक तुकडी कर्तव्यावर जाताना किंवा कर्तव्यावरून परतत असताना, लष्कराचा अहवाल ओपी बाबांसमोर ठेवण्यात येत असतो. या काळामध्ये तंबाखू आणि मद्याचे सेवन करणार नाही, अशी शपथ सैनिक ओपी बाबांसमोर घेतात.’ ओपी बाबांविषयीची ही श्रद्धा खूपच ‘वेडी’ आहे. त्यामुळे प्रत्येक ९० दिवसांची कर्तव्यपूर्ती संपल्यानंतर, येणाऱ्या आणि जाणाऱ्या सैनिकांचे हे श्रद्धास्थान आहे. उणे तापमानामध्ये बर्फ हा जिवघेणा असतो आणि या परिस्थितीमध्ये राहिल्यांनतर एखादा अवयव, दृष्टी गमवावी लागण्याचा धोका असतो. यासाठी खूप काळजी घ्यावी लागते, त्यासाठी प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळेच, कर्तव्य संपविल्यानंतर परत येणे, हा एक उत्साह असतो. या मंदिरामध्ये ओपी बाबांच्या अर्धपुतळ्यांभोवती विविध मूर्ती आहेत. या ठिकाणी एक लाल झेंडा असून, त्यावर जय ओपी बाबा असे लिहिले आहे. मुस्लिम, बौद्ध, हिंदू, शीख अशा सर्व धर्माचे जवान या ठिकाणी येतात आणि या श्रद्धेविषयी कोणालाही गैर वाटत नाही. याविषयी अनेक आख्यायिका आहेत आणि त्या एका तुकडीकडून अन्य तुकडीकडे आहेत. अशा खडतर परिस्थितीमध्ये, एवढ्या उंचीवर सैनिकांना एक विश्वास वाटणे गरजेचे असते आणि ती गरज ओपी बाबा पूर्ण करतात. ओपी बाबांची आज्ञा मानली नाही, तर मृत्यू येतो, अशीही श्रद्धा आहे. ऑक्टोबर २०१३मध्ये बेसकॅम्पला भेट दिल्यानंतर, एक सैनिकाने एका डॉक्टरची गोष्ट सांगितली. हा डॉक्टर हिमचरीमध्ये पडला होता आणि तो बाहेर पडू शकला नव्हता. दोन महिन्यांनंतर त्या डॉक्टरचे आई-वडील बेस कॅम्पवर आले आणि त्याचा शोध घेण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टरचा मृतदेह शोधण्याची तयारी एका स्थानिक मालवाहू तरुणाने दाखविली. तो हिमचराच्या आतमध्ये गेला आणि तेथे त्यालात्या डॉक्टरचा मृतदेह दिसला. त्यावेळी तो मालवाहू डॉक्टरचा मृतदेह बाहेर काढत असताना, अन्य काही मृतदेह जिवंत झाले आणि ते त्या मालवाहूच्या कानामध्ये सांगू लागले, ‘आम्हालाही बाहेर यायचे आहे.’ घाबरलेला तो तरुण वेगानेबाहेर आला, त्याने त्या डॉक्टरचा मृतदेह बाहेर काढला नाही.ओपी बाबांची आज्ञा मानत नाही, त्याला शिक्षा होती, असे मानले जाते. काही वेळा बर्फावरील स्कूटर चालू करणे किंवा जनरेटर चालू करण्यामध्येही अडचणी येतात. ओपी बाबांची प्रार्थना केल्यानंतर, या अडचणी दूर होतात, यावर सैनिकांचा विश्वास कायम आहे. या साध्याभोळ्या सैनिकांच्या या साध्या विश्वासाविषयी लष्कराने कधीही प्रश्न उभा केला नाही.
मूळ लेखक: नितीन गोखले
अनुवाद: विनय चाटी/आराधना जोशी