युक्रेनसाठी अमेरिकेकडून करण्यात येणाऱ्या मदतीला आपला विरोध नाही, पण ही मदत म्हणजे कोणत्याही प्रकारची भेटवस्तू नसून ते “कर्ज” मानले जावे अशी स्पष्टोक्ती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकन सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प बोलत होते.
“दिली जाणारी ही मदत फुकट स्वरूपाची न वाटता ती कर्ज म्हणून करता येईल का याचा आम्ही विचार करत आहोत. आम्ही कोट्यवधी आणि कोट्यवधी डॉलर्सची मदत देत राहतो पण यावरही कुठेतरी एक नजर टाकण्याची गरज आहे”, असेही ट्रम्प पुढे म्हणाले. “पण माझ्यासाठी त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे युरोपला पुढे घेऊन जायचे आहे आणि त्यासाठी त्यांना पैशांची गरज लागेल. त्यांना अमेरिकेशी बरोबरी साधावी लागेल. जर ते ही बरोबरी करू शकले नाही, तर मी त्याबद्दल खूप अस्वस्थ होईन, कारण त्यांच्यावर आपल्यापेक्षा आर्थिक बाबतीत जास्त परिणाम होत आहे.” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपण राष्ट्राध्यक्ष झालो तर युक्रेनचा संघर्ष एका दिवसात संपवून टाकू, असा दावाही ट्रम्प यांनी यावेळी केला.
युक्रेनसाठी 60 अब्ज डॉलर्सचे प्रस्तावित मदत पॅकेज अमेरिकी काँग्रेसने मंजूर न करण्याचे एक प्रमुख कारण ट्रम्प हे आहेत असे मानले जाते. रशियाला त्यांचे पैसे परत न करणाऱ्या कोणत्याही नाटो सदस्य देशावर हल्ला करण्यास आपण रशियाला “प्रोत्साहन” देऊ असे वक्तव्य करून माजी राष्ट्राध्यक्षांनी फेब्रुवारीमध्ये वाद निर्माण केला होता. परंतु आता प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अध्यक्ष जॉन्सन यांची व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांसोबत सुधारित मदत पॅकेजच्या मंजूरीबाबत चर्चा सुरू आहे.
बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेची घसरण सुरू झाली आहे. “आपण घसरणीला लागलेले राष्ट्र आहोत,” असा आरोपही ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी उघडपणे कबूल केले आहे की अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेनचा रशियाबरोबर सुरू असलेल्या युद्धात पराजय होऊ शकेल. अमेरिकेच्या मित्र देशांनीही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सूरात सूर मिसळला आहे. अलीकडेच जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी अमेरिकी काँग्रेसला संबोधित केले होते. आपल्या भाषणात, किशिदा म्हणाले की अमेरिकेने “इतर देशांच्या कारभारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे” सुरू ठेवण्याची गरज आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय युक्रेनच्या हे युद्ध जिंकण्याच्या आशा “रशियाच्या हल्ल्यासमोर कोसळतील” असेही किशिदा यांनी सांगितले होते.
अश्विन अहमद
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)