पुढील महिन्यात पूर्व लडाखमधील भारत-चीन सैन्य माघारीबद्दलच्या सुरू असलेल्या चर्चेला चार वर्षे होतील. लष्करी आणि मुत्सद्दी स्तरावर चर्चा सुरू असताना, सीमेवरील परिस्थिती जोवर सामान्य होत नाही तोपर्यंत द्विपक्षीय संबंधही सामान्य होऊ शकत नाहीत असे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे.
भारताचे चीनबरोबरचे संबंध महत्त्वपूर्ण असून सीमेवरील तणावाच्या दीर्घकालीन परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या द्विपक्षीय संवादातील विसंगती सूधारता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. भारत आणि चीनमधील स्थिर तसेच शांततापूर्ण संबंध केवळ आपल्या दोन्ही देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रदेश आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.
केवळ उत्तरेकडील सीमेवरून संघर्ष आहे असे नाही. तर चीन जेव्हा पूर्वेकडील सीमेबाबत विचार करतो तेव्हा तो भारतावर दबाव आणत असतो. त्यातूनच तो अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेट असल्याचा दावा करतो. ब्रिटिश काळात तिबेट आणि भारत यांच्यातील सीमारेषा मानल्या गेलेल्या मॅकमोहन लाइनकडे चीन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. गेल्या आठवड्यात चीनने अरुणाचल प्रदेशातील 30 ठिकाणांची नावे बदलली, त्यापैकी जवळपास दोन तृतीयांश ठिकाणे ही अरुणाचल प्रदेशची भौगोलिक वैशिष्ट्ये म्हणजे पर्वत आणि नद्या आहेत.
गेल्या सात वर्षांत चीनने अशा कुरापती करण्याची ही चौथी घटना होती, भूतानच्या डोकलाम पठारावर भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षानंतर 2017 मध्ये अशा प्रकारची पहिली घटना घडली होती.
2021 मध्ये, पूर्व लडाखमधील संकट ऐन भरात असताना, चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांची नावे बदलली होती. गेल्या वर्षी भारताने जी-20 शिखर परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन केल्यानंतर या घटनेची पुनरावृत्ती झाली ज्यामध्ये चीनने अरुणाचलमधील 11 ठिकाणांचे पुनर्नामकरण केले.
याशिवाय प्रत्येक वेळी जेव्हा एखादा भारतीय नेता या राज्याला भेट देतो, तेव्हा चीन निषेध नोंदवतो. गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिल्यानंतर चीनने परत एकदा आपला आक्षेप नोंदवला होता, परंतु भारताने हा आक्षेप खोडून काढला.
चीन अशा कुरापती सातत्याने का करत असतो? अरुणाचलवरील तथाकथित मालकीचे दावे पुन्हा मांडण्याचे हे एक साधन असल्याचे चीनच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारतासोबत भविष्य कधी वाटाघाटी झाल्याच, ते या कुरापतींना आपल्या मागणीचे समर्थन म्हणून पुढे करू शकतात. दुसरे संभाव्य कारण म्हणजे 1962 मधील भारताबरोबरच्या युद्धानंतर चीनने ताब्यात घेतलेला अक्साई चीनचा विशाल भूभाग (सुमारे 38 हजार चौरस किमी) राखून ठेवण्यासाठी अरुणाचल प्रदेशावर आपला दावा असल्याचा उपयोग करणे.
प्रत्येक वेळी जेव्हा चीन अरुणाचल प्रदेशवर आपला दावा करतो, तेव्हा भारत त्यावर जोरदार आक्षेप घेतो. यावेळीही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, अरुणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि राहील. जर आज मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते माझे होईल का, असा सवाल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यानिमित्ताने केला.
नितीन अ. गोखले