विविध पदके देऊन ५१ हवाई योद्ध्यांचा सन्मान
दि. २७ एप्रिल: भारतीय हवाईदलाचा वार्षिक अलंकरण सोहळा शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकातील परम योद्धा स्थळ येथे पार पडला. या सोहळ्यात हवाईदलप्रमुख एअर चिफमार्शल व्ही. आर. चौधरी यांच्या हस्ते ५१ हवाई योद्ध्यांना विविध पदके प्रदान करून गौरविण्यात आले.
संरक्षणदलांतील तिन्ही सैन्यदलातील अधिकारी आणि जवानांना दरवर्षी राष्ट्रपतींकडून शौर्य व उल्लेखनीय सेवेसाठीची पदके देऊन गौरविण्यात येते. हवाईदलाच्या या सोहळ्यात राष्ट्रपतींच्यावतीने हवाईदल प्रमुखांनी हे पुरस्कार प्रदान केले. मुख्य सोहळा सुरु होण्यापूर्वी हवाईदल प्रमुख व पदक विजेत्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि अमर चक्र येथे पुष्पचक्र अर्पण करून वीर जवान व अधिकाऱ्यांना श्रद्धांजली केली. त्यानंतर मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला.
अलंकरण सोहळ्यात हवाईदलातील ५१ अधिकारी व जवानांना तीन युद्ध सेवा पदक, सात वायू सेना पदके (शौर्य), १३ वायू सेवा पदके (उल्लेखनीय सेवा) व २८ विशिष्ट सेवा पदके प्रदान करून गौरविण्यात आले. भारतीय हवाईदालच्या उज्ज्वल परंपरेचे पालन करीत शौर्य व उल्लेखनीय सेवा बजाविल्याबद्दल हवाईदल प्रमुखांनी पदक विजेत्यांची प्रशंसा केली.
राष्ट्रीय युद्ध स्मारकात अशा पद्धतीने प्रथमच सैन्यदलांचा अलंकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला हवाईदलातील वरिष्ठ अधिकारी, पदक विजेत्यांचे कुटुंबीय व युद्ध स्मारकाला भेट देण्यासाठी आलेले नागरिक उपस्थित होते.
विनय चाटी