चीन, रशियावर कुरघोडीचा प्रयत्न: जागतिक शस्त्रस्पर्धा आणखी तीव्र
बदलती भूराजकीय-भूसामरिक समीकरणे आणि जागतिक सत्तासंतुलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने घेतलेल्या ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे जागतिक शश्त्रास्त्र स्पर्धा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. प्रशांत (पॅसिफिक) महासागरातील ग्वाम येथील लष्करीतळावरून घेतलेल्या या चाचणीमुळे अमेरिकेने चीन, रशिया व उत्तर कोरिया यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. चीन व रशियाने ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राच्या विकसनात घेतलेली आघाडी आणि उत्तर कोरियाकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत महासागरातील आपल्या सहकाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्नही अमेरिकेने या चाचणीमुळे केला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
चाचणीचे महत्त्व काय?
ग्वाम येथे असलेला अमेरिकेचा लष्करीतळ हा प्रशांत महासागर क्षेत्रातील भूसामारिक हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या तळावरून अमेरिका आपले मित्रदेश असलेल्या तैवान, दक्षिण कोरिया, जपान, फिलिपिन्स यांना लष्करी व इतर महत्त्वाची मदत करीत असते. शांतता व युद्धकाळात त्यामुळेच अमेरिकी हितसंबंधांच्यादृष्टीने ग्वाम व प्रशांत महासागरचे महत्त्व वादातीत आहे. या क्षेत्रात चीनने आपली मजबूत उपस्थिती गेल्या काही काळापासून राखली आहे. त्याचबरोबर चीनचा सहकारी असलेला उत्तर कोरिया व रशियाही प्रशांत महासागर क्षेत्रात अधिक सक्रीय झाल्याचे चित्र दिसत आहे. या युतीकडून अमेरिकेच्या मित्रदेशांना धमकाविले जात असते. विशेषतः जपान आणि दक्षिण कोरियाबरोबर अमेरिकेने केलेल्या द्विपक्षीय कराराचा निषेध म्हणून गेल्या वर्षी उत्तर कोरियाने जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राचा भंग करून त्यावरून ‘बॅलस्टिक’ क्षेपणास्त्रे डागली होती. चीननेही अमेरिकी कॉंग्रेसच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवानदौऱ्याचा विरोध म्हणून तैवानच्या खाडीत लष्करी कवायती केल्या होत्या, तसेच तैवानचे हवाई सुरक्षा क्षेत्राचाही भंग केला होता. चीन आणि उत्तर कोरियाच्या या आक्रमकपणामुळे जपान आणि दक्षिण कोरियानेही आपल्या लष्करी ताकदीत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच, रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धामुळे युरोपातही नवीन समीकरणे आकारास येत आहेत. या युद्धात रशियाकडून युक्रेनविरोधात ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्रांचा (किन्झाल) वापर करण्यात आला होता. चीननेही या क्षेपणास्त्राच्या विकसनात मोठी आघाडी घेतली आहे. त्याची अमेरिकेकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. ‘चीनने घेतलेली ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राची चाचणी अतिशय गंभीर आहे. ही घटना ‘स्पुटनिक घटने’इतकीच गंभीर आहे,’ असे अमेरिकी सेनाप्रमुखांच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष जनरल मार्क मिले यांनी म्हटले होते.
‘हायपरसॉनिक’ म्हणजे काय?
या सर्व भूराजकीय व भूसामारिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ग्वाम येथून ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. अमेरिकी हवाईदलाच्या बी-५२ या बॉम्बफेकी विमानातून ही चाचणी घेण्यात आली. मात्र, अमेरिकेने चाचणी घेतलेल्या या क्षेपणास्त्राचा अधिकृत वेग अद्याप जाहीर करण्यात आला नाही. अमेरिकेने गेल्यावर्षी चाचणी घेतलेल्या ‘एअर लॉन्च्ड रॅपिड रिस्पॉन्स वेपन’ने (एआरआरडब्ल्यू) ध्वनीच्या पाचपट वेग नोंदविला होता. ध्वनीच्या पाच ते २५ पट वेग म्हणजे ‘हायपरसॉनिक’ वेग मनाला जातो. ही क्षेपणास्त्रे प्रतिसेकंद एक ते पाचमैल वेगाने प्रवास करतात.अतिशय कमी उंचीवरून उडण्यास सक्षम असल्यामुळे ही क्षेपणास्त्रे शत्रूच्या रडारवर दिसत नाहीत, त्यामुळे याची संहारकक्षमता अधिक वाढते. ही क्षेपणास्त्रे एका अर्थाने ‘गेम-चेंजर’ मानली जातात. या क्षेपणास्त्राचा वापर पारंपरिक अस्त्रे व अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी केला जातो. मात्र, अण्वस्त्रे हे सामरिक शस्त्रे मानली जातात व त्याच्या मुळे होणाऱ्या सर्वंकष विनाशामुळे ही अस्त्रे वापरली जात नाहीत. आपली प्रतिकारक्षमता किंवा प्रतिहल्ला करण्याची क्षमता दर्शविण्यासाठीच यांचा उपयोग होतो. त्यामुळे प्रामुख्याने पारंपरिक अस्त्रे वाहून नेण्यासाठीच या क्षेपणास्त्राचा वापर होणार आहे.
भारताची क्षमता काय?
भारताच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचे जनक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने २००७मध्ये आपल्या ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला सुरुवात केली. सध्या भारत ब्राह्मोस-२ या आपल्या ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्रावर काम करीत आहे. हे क्षेपणास्त्र ‘हायपरसॉनिक स्क्रॅमजेट’ तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे तंत्रज्ञान ‘हायपरसॉनिक’ शस्त्राचे मुख्य अंग मानले जाते. भारताने २०२०मध्ये ‘स्क्रॅमजेट’ तंत्रज्ञानावर आधारित ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. या चाचणीदरम्यान २२ ते २३ सेकंद या क्षेपणास्त्राने ध्वनीच्या वेगाच्या सहापट वेगाने प्रवास केला होता. देशांतर्गत ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्याच्या भारताच्या प्रयत्नातील ही एक मोठी उपलब्धी मानली जाते.
विनय चाटी