प्राथमिक करार: दिवाळखोरीतून वाचविण्यासाठी तीन अब्ज डॉलरची खिरापत
दि. २० मार्च: आर्थिक गैरव्यवस्थापन, राजकीय व लष्करी भ्रष्टाचार आणि मूलतत्त्ववाद्यांच्या कारवायांमुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला १.१ अब्ज डॉलरची मदत देण्यास मंजुरी दिली आहे. नाणेनिधीने मंजूर केलेल्या तीन अब्ज डॉलर्सच्या मदतीपैकी हा पहिला हप्ता आहे. या मदतीबाबत पाकिस्तान सरकार व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यात नुकताच प्राथमिक करार करण्यात आला.
पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व पाकिस्तान सरकार यांच्यात गेल्या आठवड्यापासून वाटाघाटी सुरू होत्या. पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पाकिस्तानातील प्रतिनिधी नॅथन पोर्टर यांनी या वाटाघाटीत सहभाग नोंदविला. अखेर, एकूण मंजूर करण्यात आलेल्या तीन अब्ज डॉलर्स पैकी १.१ अब्ज डॉलरचा पहिला हप्ता पाकिस्तानला देण्याचे तत्वतः मंजूर करण्यात आले. ‘पाकिस्तानशी तूर्त प्राथमिक स्तरावर समझोता झाला असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल,’ असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तानात गेल्या महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लष्कराच्या अदृश्य पाठिंब्याने पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) व ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ या दोन पक्षांचे कडबोळे सरकार शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आले आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आरोप पाकिस्तानातील विरोधी पक्ष व आंतरराष्ट्रीय समुदायाकडून होत आहेत. त्यामुळे ही मदत देण्यापूर्वी निवडणुकीतील गैरप्रकाराची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती गेल्या काही महिन्यापासून सुधारली आहे. रोकड पुरवठाही सुधारत आहे. मात्र, अर्थव्यवस्थेची वाढ अद्याप अपेक्षेनुसार नाही. महागाईही सरासरीपेक्षा अधिक आहे. पाकिस्तानला या दिवाळखोरी व आर्थिक अरिष्टातून बाहेर यायचे असेल, तर आर्थिक आणि धोरणात्मक सुधारणा व फेरबदल वेगाने राबवावे लागतील. शरीफ सरकारने या सुधारणा राबविण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
आर्थिक गैरवस्थापन व भ्रष्टाचारामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. विविध आर्थिक संस्थांकडून व आंतरराष्ट्रीय कर्जदारांकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते फेडण्यासाठीही पाकिस्तानकडे सध्या पैसे नाहीत. त्या कर्जाच्या परतफेडीचे वेळापत्रक चुकण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला सहकार्याचा हात दिला आहे. ‘सध्या देण्यात आलेल्या तीन अब्ज डॉलरच्या मदतीव्यतिरिक्त आठ अब्ज डॉलरची अतिरिक्त मदतही पाकिस्तानने मागितली आहे,’ असेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
स्रोत: असोसिएटेड प्रेस