‘आयआयटी’ करणार जवानांच्या आरोग्यविषयक समस्यांवर संशोधन

0
लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीतसिंग व ‘आयआयटी-कानपूर’चे प्रभारी संचालक प्रा. एस. गणेश यांनी या परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीतसिंग व ‘आयआयटी-कानपूर’चे प्रभारी संचालक प्रा. एस. गणेश यांनी या परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. छायाचित्र: वृत्तसंस्था

लष्करी वैद्यकीय सेवेबरोबर ‘आयआयटी-कानपूर’चा परस्पर सामंजस्य करार

दि. १९ एप्रिल: अत्यंत खडतर हवामानात व दुर्गम भागात तैनात असलेल्या लष्करी जवानांच्या आरोग्यविषयक समस्यांवर कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी-कानपूर) संशोधन करणार आहे. याबाबत ‘आयआयटी-कानपूर’ व लष्करी वैद्यकीय सेवा (एएफएमएस) यांच्यात नुकताच परस्पर सामंजस्य करार करण्यात आला. लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीतसिंग व आयआयटी कानपूरचे प्रभारी संचालक प्रा. एस. गणेश यांनी या परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

आव्हानात्मक परिस्थिती व खडतर भौगोलिक भागात तैनात असलेल्या जवानांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निदर्शनास आल्या आहेत. या समस्यांवर संशोधन करून तोडगा काढण्यासाठी, या परस्पर सामंजस्य कराराच्या माध्यमातून ‘आयआयटी-कानपूर’ व लष्करी वैद्यकीय सेवा संयुक्तपणे काम करणार आहेत. ‘आयआयटी-कानपूर’कडून जवानांच्या आरोग्य विषयक समस्यांचे  कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निदान करण्यासाठी तांत्रिक सहकार्य पुरविण्यात येणार आहे. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘कम्प्युटेशनल मेडिसिन सेंटर’च्या माध्यमातून हा प्रकल्प चालवण्यात येणार आहे. हे अशा प्रकारचे देशातील एकमेव केंद्र आहे. या कराराअंतर्गत वेगवेगळ्या सुविधांची  देवाणघेवाण, संयुक्त शैक्षणिक प्रकल्प, प्रशिक्षण कार्यक्रम विकास याबाबतही काम करण्यात येणार आहे.

‘लष्करी जवानांना अतिशय उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा पुरविण्यास लष्करी वैद्यकीय सेवा वचनबद्ध आहे. ‘आयआयटी-कानपूर’सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेबरोबर भागीदारी करणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. ही भागीदारी आमच्या वचनबद्धतेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे,’ असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल दलजीतसिंग यांनी केले. तर, व्यवसायिक समन्वय आणि ‘कम्प्युटेशनल मेडिसिन’ व कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आजाराच्या निदानात होणे गरजेचे असल्याचे मत प्रा.एस. गणेश यांनी व्यक्त केले.

विनय चाटी

स्रोत: पीआयबी  


Spread the love
Previous articleव्हाइस ॲडमिरल त्रिपाठी नवे नौदलप्रमुख
Next article‘एएमसीए’ प्रकल्पावर भारताबरोबर काम करण्यास इच्छुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here