नौदलप्रमुखांची भेट: चाचेगिरी विरोधी कारवाईबद्दल सन्मान
दि. ०५ एप्रिल: चाचेगिरी विरोधात यशस्वी मोहीम राबविल्याबद्दल भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस शारदा’ या युद्धनौकेचा ‘ऑन द स्पॉट युनिट सायटेशन’ देऊन गौरव करण्यात आला. नौदलप्रमुख ॲडमिरल आर.हरिकुमार यांनी नुकतीच नौदलाच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय असलेल्या कोची येथे भेट दिली. याप्रसंगी नौदलप्रमुखांच्या हस्ते ‘आयएनएस शारदा’चा गौरव करण्यात आला. ‘आयएनएस शारदा’ने सोमालियाच्या पूर्व किनारपट्टीवर समुद्री चाचांच्या तावडीतून इराणच्या ओमारी या मच्छीमार नौकेची सुटका केली होती व १९ कर्मचाऱ्यांना चाचांच्या तावडीतून सोडविले होते. त्यात ११ इराणी व ८ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता.
नौदलाच्या मानवविरहित स्वयंचलित गस्ती विमानाकडून इराणची ओमारी ही मच्छीमार नौका सोमालियाच्या समुद्रीचाचांनी ताब्यात घेतल्याची माहिती ‘आयएनएस शारदा’ या नौदलाच्या युद्धनौकेला मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी ‘आयएनएस शारदा’ने रात्रीच्या सुमारास गुप्तपणे ओमारीचा मग काढण्यास सुरुवात केली व २ फेब्रुवारी २०२४ रोजी सोमालियाच्या पूर्व किनारपट्टीवर गस्ती सुरू असताना पहाटेच्या या नोकेला गाठले. नौदलाच्या नौकेवरील हेलिकॉप्टर ओमारीकडे झेपावली, तसेच प्रहार कमांडोही तैनात करण्यात आले. भारतीय नौदलच्या नौकेची ही आक्रमकता पाहून सोमाली चाचे शरण आले आणि त्यांनी कोणताही संघर्ष न करता या कर्मचाऱ्यांची सुटका केली. ‘आयएनएस शारदा’ने केलेल्या वेगवान व अचूक कारवाईमुळे इराणी बोट व त्यावरील कर्मचाऱ्यांची सोमाली चाचांच्या तावडीतून सुखरूप सुटका होऊ शकली. हिंदी महासागर क्षेत्रात सागरी व्यापार व नौकानयन सुरक्षितपणे व्हावे, यासाठी भारतीय नौदल कार्यरत आहे. ‘आयएनएस शारदा’ने केलेल्या कारवाईमुळे समुद्री सुरक्षेबाबतची भारतीय नौदलाची प्राथमिकता व वचनबद्धता सिद्ध झाली आहे.
नौदलप्रमुखांनी या वेळी ‘आयएनएस शारदा’ला भेट देऊन त्यावरील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. हिंदी महासागर क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी ‘आयएनएस शारदा’ने केलेल्या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले. ‘कठीण व आव्हानात्मक परिस्थिती असतानाही ‘आयएनएस शारदा’वरील कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक कौशल्य व व्यक्तिगत निष्ठेचे प्रदर्शन करून भारतीय नौदलाची उज्ज्वल परंपरा अधोरेखित केली आहे,’ असे नौदलप्रमुख या वेळी म्हणाले.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी