एरोस्पेस सर्व्हिसेस इंडिया: देखभाल, दुरुस्ती केंद्रही उभारणार
दि. २८ मार्च: हवाई संरक्षणासाठी उपयुक्त मध्यम पल्याची क्षेपणास्त्र यंत्रणा (एमआरएसएएम) भारताला पुरविणाऱ्या ‘इस्त्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीजने’ (आयएआय) भारतात ‘एरोस्पेस सर्व्हिसेस इंडिया’ (एएसआय) या नावाने आपली शाखा उघडली असून, हरियाणातील गुरुग्राम येथे या हवाई संरक्षण यंत्रणेच्या दुरुस्ती व देखभालीचे केंद्रही सुरू केले आहे.
भारताने ‘आयएआय’कडून मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम असलेली हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा (एमआरएसएएम) खरेदी केली आहे. त्याचबरोबर भारत-इस्त्राईल यांच्यातील संरक्षण सहकार्यही वृद्धिंगत होत आहे. इस्त्राईल हा भारताचा संरक्षण सामग्रीच्या व्यवहारातील एक प्रमुख भागीदार आहे. त्यामुळे उभय देशांतील संरक्षण उत्पादन व शस्त्रास्त्र खरेदी व्यवहाराचे परस्पर सहकार्य जुनेच आहे. त्यामुळेच इस्त्राईलने ‘एएसआय’अंतर्गत भारतात आपला प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात ‘एएसआय’च्या माध्यमातून काम करण्यास आम्ही सुरुवात करणार आहोत. भारत सरकारबरोबर आमचे पूर्वापार सहकार्य आहे. या निर्णयामुळे ते अधिक मजबूत होईल. भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘मेक इन इंडिया’ धोरणांनाही याचा मोठा लाभ होईल, असे ‘आयएआय’ने म्हटले आहे. त्याचबरोबर येत्या काळात ‘आयएआय’ आणि भारताची संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) यांच्यात असलेले सहकार्य अधिक दृढ करण्यात येईल व त्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी संरक्षण सामग्री पुरविण्यात येईल, असेही ‘आयएआय’ने म्हटले आहे. गेल्या तीस वर्षांपासून आम्ही आमच्या भारतीय भागीदारांबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करत आहोत. ‘एएसआय’च्या स्थापनेमुळे आम्हाला ते सहकार्य अधिक पुढे नेता येईल, असे ‘एएसआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनी लौबेर यांनी सांगितले.
‘भारतात उपकंपनी स्थापन करण्याबरोबरच ‘आयएआय’ येथे या क्षेपणास्त्र यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी मोठा प्रकल्प उभा करणार आहे. त्यातून भारतीय संरक्षण उत्पादन उद्योगांशी असलेली आमची भागीदारी व वचनबद्धता दिसून येते. हा प्रकल्प २०२४च्या अखेरीस पूर्णत्वास जाईल, असे ‘एअर अँड मिसाईल सिस्टीम’चे अतिरिक्त सरव्यवस्थापक व ‘एएसआय’चे अध्यक्ष ओडेड जाकोबोवीच यांनी सांगितले. हवाई संरक्षण यंत्रणेबरोबरच भारतीय संरक्षण क्षेत्राला आवश्यक अशा इतर उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतही आम्ही विचार करीत आहोत व त्या दृष्टीने वाटचाल करण्यासही आम्ही सुरुवात केली आहे, असेही ते म्हणाले. या नव्या प्रकल्पात सुरुवातीला ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक होणार आहे. त्यातील ९७ टक्के कर्मचारी भारतीय आहेत. याचे मुख्यालय दिल्लीत राहणार असून, देशात महत्त्वाच्या ठिकाणी शाखा उघडण्यात येतील. त्यामुळे दुरुस्ती व देखभालीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘आयएआय’ने २०२२मध्ये प्रवासी विमानाचे रुपांतर ‘मल्टी मिशन ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट’मध्ये करण्याबाबत ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) बरोबर करार केला होता. तर कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या निर्मितीबाबतच्या संधी पडताळून पाहण्यासठी २०२३मध्ये त्यांनी ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’बरोबर परस्पर सहकार्य करार केला होता.
‘एमआरएसएएम’ म्हणजे काय?
मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम असलेली हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा (एमआरएसएएम) ही ‘व्हर्टिकल लॉन्चड’ हवाई संरक्षण यंत्रणा असून, कोणत्याही हवाई धोक्याला ती अतिशय कमी वेळेत प्रतिसाद देऊ शकते. ही यंत्रणा जमीन, सागर आणि आकाशातून मारा करण्यास सक्षम आहे. या यंत्रणेच्या वेवेगळ्या आवृत्त्या लष्कर, नौदल व हवाईदलासाठी विकसित करण्यात आल्या आहेत. या यंत्रणेला ‘अभ्र’ असेही म्हटले जाते. ‘डीआरडीओ’ आणि ‘आयएआय’ यांच्या संयुक्त सहकार्याने ती विकसित करण्यात आली आहे. तर, ‘भारत डायनामिक्स लिमिटेड’ने इतर सरकारी आणि खासगी क्षेत्रातील उत्पादकांच्या मदतीने त्याचे उत्पादन केले आहे.
रविशंकर