लिकुड पक्षाची टीका: अमेरिकी सिनेट सदस्याला सुनावले खडे बोल
दि. १५ मार्च: ‘आमच्या देशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सत्तेवर आहे. त्याला सत्ता राबविण्याचा अधिकार येथील जनतेने दिला आहे. कोणत्याही असंसदीय पद्धतीने हे सरकार सत्तेवर आले नाही अथवा आमच्याकडे अराजकताही. त्यामुळे इस्त्राईल ‘बनाना रिपब्लिक’ नाही याची जाण ठेवावी व इस्त्राईलच्या राजकीय व्यवस्थेबद्दल मत प्रदर्शित करण्यापूर्वी विचार करावा,’ असे खडे बोल सत्ताधारी लिकुड पक्षाने अमेरिकी सिनेटरला सुनावले आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे अमेरिकेतील न्यूयॉर्कचे सिनेट सदस्य चक शूमर यांनी गाझामधील युद्धात इस्त्राईलकडून होत असलेल्या अतिरेकाबद्दल चिंता व्यक्त केली. इस्त्राईलने गाझामध्ये अनावश्यक लष्करी बळ वापरल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘नेत्यानाहू यांच्या सरकारने या युद्धात अतिरेकी बळाचा वापर करून इस्त्राईलच्या जनतेचे भवितव्य अंधारात ढकलले आहे. त्यामुळे इस्त्राईलला नेत्यानाहू सरकारची गरज नाही. त्यांना नव्याने निवडणुका घेऊन आपले सरकार निवडता आले पाहिजे. एक लोकशाही म्हणून नवे सरकार निवडण्याचा इस्त्राईलली जनतेला अधिकार आहे. अमेरिकेने त्यांना या प्रक्रियेत शक्य ती सर्व मदत केली पाहिजे,’ असे शूमर यांनी सिनेटमध्ये केलेल्या भाषणात सांगितले. विशेष म्हणजे शूमर ‘ज्यू-अमेरिकन’ आहेत.
इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या कार्यालयाने शूमर यांच्या विधानावर अद्याप प्रतिक्रिया दिली नसली, तरी त्यांच्या लिकुड पक्षाने मात्र या विधानावर टीका केली आहे. इस्त्राईल ‘बनाना रिपब्लिक’ नाही हे शूमर यांनी लक्षात घ्यावे असे, लिकुड पक्षाच्या वतीने ठणकवण्यात आले आहे. ‘हमासविरोधात गाझापट्टीमध्ये सुरू असलेल्या युद्धात संपूर्ण विजय मिळवण्यासाठी इस्त्राईलच्या जनतेने सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनमधील दहशतवादी सरकार पुन्हा प्रस्थापित करण्याचा कोणताही आंतरराष्ट्रीय सल्ला मानणे आम्हाला बंधनकारक नाही. गाझापट्टी पुन्हा पॅलेस्टीन अधिकाराखाली येण्यास आमचा ठाम विरोध आहे. इस्त्राईलच्या लोकनियुक्त सरकारबाबत शूमर यांनी आदर बाळगणे आवश्यक आहे. युद्धकाळात हे अधिकच महत्त्वाचे आहे,’ असे लिकुड पक्षाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
गाझापट्टीमध्ये संघर्षरत असलेल्या दोन्ही पक्षांना शूमर यांनी युद्धबंदीचे आवाहन केले आहे. सर्व ओलिसांची सुटका करावी, गाझापट्टीमध्ये मानवीय मदत पोहोचवण्यास वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पॅलेस्टाईनचे नेते महमूद अब्बास यांनाही त्यांनी पायउतार होण्याचा आग्रह केला आहे. ‘या भागातील शांततेसाठी महमूद अब्बास यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे व नव्या पिढीच्या नेत्यांना सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले आहे. नेत्यानाहू यांनी गाझामध्ये सुरू नागरिकांच्या संहाराकडे दुर्लक्ष चालविले आहे. त्यामुळे जगभरात इस्त्राईलला असलेल्या पाठींब्यात अभूतपूर्व घट झाली आहे. अशा परिस्थितीत इस्त्राईलच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल, असेही शूमर यांनी म्हटले आहे.
विनय चाटी