पुण्यातील सहाव्या कमांडंट्स परिषदेत चर्चा
दि. ०८ मे: भारतीय सशस्त्रदलांतील भविष्यातील नेतृत्त्व घडविण्यासाठी धोरण आखण्याबाबत पुण्यातील ‘कमांडंट्स कॉनक्लेव’मध्ये चर्चा करण्यात आली. सशस्त्रदलांच्या एकात्मिक संरक्षण मुख्यालयाच्यावतीने पुण्यातील लष्करी तंत्रज्ञान संस्थेत (एमआयएलआयटी-मिलिट) सहाव्या कमांडंट्स परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत भविष्यातील नेतृत्त्व घडविण्यासाठी अभ्यासक्रम निर्मिती करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची हजेरी
देशातील महत्त्वाच्या लष्करी प्रशिक्षण संस्था आणि युद्ध प्रशिक्षण विद्यालयांतील प्रमुखांसह (कमांडंट्स) सशस्त्रदलांतील इतर वरिष्ठ अधिकारी या परिषदेसाठी उपस्थित होते. भारतीय सशस्त्र दलांतील भविष्यकालीन नेते घडवण्यासाठी भविष्यात स्वीकारण्याच्या संरक्षण धोरणांचे मार्गनिश्चित करण्यासंदर्भात या बैठकीत सखोल विचारमंथन झाले. ‘एमआयएलआयटी-मिलिट’ संस्थेत जमलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी बदलत असलेल्या युद्धाच्या पद्धती, हायब्रीड युद्ध, लष्कर आणि नागरिक संबंध आदी युद्धाला नवीन परिमाण देणाऱ्या विषयांबाबत या परिषदेत चर्चा केली व मौलिक विचार मांडले. तसेच, आपापल्या संस्थांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण पद्धतीची माहितीही दिली. भविष्यासाठी सुसज्ज सैन्यदलांच्या उभारणीसाठी धोरणांची आखणीही केली.
नवोन्मेष व सहकार्य
या महत्त्वाच्या परिषदेत, नव्याने उदयाला येत चाललेल्या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण पद्धतीत सातत्यपूर्ण सुधारणा, नवोन्मेष आणि परस्पर सहयोगाबाबत भारतीय सशस्त्रदलांची वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली. या परिषदेतील विचारविनिमायामुळे लष्करी प्रशिक्षण संस्थांचे (एएफटीआय) कमांडंट्स आणि धोरणकर्त्यांना सशस्त्रदलांतील भविष्यकालीन नेतृत्त्वाला प्रशिक्षित करण्यासाठी कालानुरूप शिक्षणपद्धती व नव्या तंत्रज्ञानांचा स्वीकार, अशा संयुक्तरितीने प्रयत्न करता येतील. त्या संबंधात चर्चा करण्यासाठी ही परिषद एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली आहे.या परिषदेदरम्यान नवोन्मेष, तंत्रज्ञानविषयक प्रगती व त्यांचा उपयोग करणे आणि लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देता यावे, यासाठी सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून घेण्याच्या दृष्टीने धोरणात्मक-लवचिकता, तंत्रज्ञानविषयक प्रगती, मानवी भांडवल विकास, आंतरपरिचालन क्षमता आणि संयुक्तता यांसह इतर अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
महत्त्वाची परिषद
सशत्रदलांच्या दृष्टीने ‘कमांडंट्स कॉनक्लेव’ अतिशय महत्त्वपूर्ण असते. या परिषदेत सशस्त्रदलांच्या विविध प्रशिक्षण संस्थांमधील समादेशक (‘कमांडंट) आणि महत्त्वाचे पदाधिकारी सहभागी होत असतात. विविध संस्थांमध्ये सुरू असलेले प्रशिक्षण, त्याची उपयुक्तता, त्या प्रशिक्षण कार्यक्रमात अपेक्षित असलेले बदल या विषयांवर या परिषदेत चर्चा होत असते. जागतिक स्तरावर युद्धात होत असलेल्या बदलांचाही या परिषदेत आढावा घेतला जातो. या बदलांना अनुरूप अशी प्रशिक्षण पद्धती राबविण्याबाबत या परिषदेत विचारमंथन होत असते. त्यातूनच पुढे विविध लष्करी प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणाचे स्वरूप ठरविण्यात येते.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी