पाकिस्तानची विनंती: पूर्वसुचनेबाबतच्या कराराचे पालन व्हावे
दि. १५ मार्च: ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्रांच्या चाचणीबाबतची पूर्वसूचना भारताने पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार द्यावी व त्याबाबत करण्यात आलेल्या उभयपक्षी करारांचे पालन करावे, अशी विनंती पाकिस्तानने भारताकडे केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झाहरा बलोच यांनी ही माहिती दिली.
भारताने ‘मिशन दिव्यास्त्र’ अंतर्गत देशांतर्गत विकसित करण्यात आलेल्या व एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या आंतरखंडीय ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्राची (आयसीबीएम) ११ मार्च रोजी ओडिशातील डॉ.एपीजे अब्दुल कलम बेटांवरून चाचणी घेतली होती. या संबंधात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बलोच म्हणाल्या, ‘भारताने आंतरखंडीय ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्राच्या चाचणीबाबत पाकिस्तानला माहिती दिली होती. मात्र, आंतरखंडीय ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्राची चाचणी घ्यायची झाल्यास या बाबत उभय देशांत झालेल्या करारातील कलम दोन नुसार किमान तीन दिवस आधी माहिती देणे गरजेचे आहे. भारताकडून याचे पालन झाले नाही. त्यामुळे करारातील या तरतुदीचे पालन भारताने या पुढे करावे.’
अग्नी-५ क्षेपणास्त्राच्य ‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टारगेटेबल रि-एंट्री व्हेईकल’ (एमआयआरव्ही) तंत्रद्यानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून दोन किलोटन वजनाची दोन ते दहा अण्वस्त्रे एकाच वेळी विविध लक्ष्यांवर डागता येवू शकतात. या मुळे प्रथम प्रहार करण्याच्या भारताच्या क्षमतेत वृद्धी होणार आहे. अशी क्षमता असलेल्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताचा या मुळे समावेश झाला आहे. पाच हजार किलोमीटरचा पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे चीनसह संपूर्ण आशिया व युरोपचा काही भाग भारताच्या माऱ्याच्या टप्प्यात येणार आहे.
विनय चाटी
स्त्रोत: पीटीआय