व्लादिमिर पुतीन: रशियाच्या एफएसबी या गुप्तचर संस्थेला आदेश
दि. २० मार्च: ‘देशद्रोही व गद्दारांचा तातडीने ‘बंदोबस्त’ करा,’ असा आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी रशियाची गुप्तचर संस्था ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हीस’ला (एफएसबी) दिला आहे. रशियात नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतीन यांनी ८७ टक्के इतकी विक्रमी मते मिळवून बाजी मारली होती. त्यानंतर प्रथमच ते ‘एफएसबी’च्या अधिकाऱ्यांसमोर बोलत होते.
‘देशाशी द्रोह करणाऱ्या गद्दारांना हुडकून त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. या गद्दारांना आम्ही नक्कीच धडा शिकवू. त्यांनी केलेली देशविरोधी कृत्ये रशिया कधीही विसरणार नाही. मिळतील तेथे त्यांचा बंदोबस्त केला जाईल. कधीही आणि कोठेही त्यांना धडा शिकविण्यात येईल,’ असे पुतीन यांनी ‘एफएसबी’समोर बोलताना म्हटले आहे. पुतीन यांना सत्तेवरून पायउतार करण्यासाठी युक्रेनमधून कारवाया करणाऱ्या रशियन बंडखोरांवर पुतीन यांचा रोख होता. या बंडखोरांच्या निवडणूकपूर्व हल्ल्यांत युक्रेनसीमेवरील काही रशियन नागरिकांचा मृत्यू झाला होता. ‘या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी ‘एफएसबी’ने इतर गुप्तचर संस्था व लष्करीदलांशी समन्वय वाढविण्याची गरज आहे, असेही पुतीन यांनी या वेळी स्पष्ट केले. ‘आपण एका अत्यंत धोकादायक शत्रूशी लढत आहोत. त्याच्याकडे आपल्याबाबतची इत्यंभूत माहिती आहे. तसेच, त्याला बाहेरून तंत्रज्ञान व आर्थिक पाठिंबाही मिळत आहे. त्यामुळे त्याच्याशी आपल्याला निकराने लढून त्याचा बंदोबस्त करावा लागेल,’ असेही पुतीन यांनी यावेळी सांगितले. ‘एफएसबी’कडे प्रामुख्याने परदेशी हेरगिरी, सीमांची सुरक्षा व इतर सुरक्षा विषयक बाबी सोपविण्यात आले आहेत.
पुतीन यांनी रशियाच्या उद्योगजगतालाही एकत्र येण्याचे आवाहन केले. अमेरिका व इतर युरोपीय देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तो आपण हाणून पाडला पाहिजे, असे पुतीन म्हणाले. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका तसेच पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. त्याचा फटका रशियातील व्यापारी संस्था व कंपन्यांना बसला आहे. त्याच्या परिणामी गेल्या वर्षी रशियाच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग मंदावून तो ३.६ टक्के नोंदविण्यात आला. मात्र, पुतीन यांच्या मते या निर्बंधांचा फटका रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला नाही. युद्धाकाळातही अर्थव्यवस्था उत्तम असल्याचा त्यांचा दावा आहे. पाश्चिमात्य देश व अमेरिका हे धोकादायक शत्रू असून, ते रशियात दुहीची बीजे रोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही पुतीन यांनी केला.
विनय चाटी