लेफ्टनंट जनरल कुशवाह यांची लष्करी गुप्तचर प्रशिक्षण संस्थेला भेट
दि. २० एप्रिल: आधुनिक युद्धाचे सातत्याने बदलत असणारे स्वरूप व देशासमोर असलेल्या सुरक्षा विषयक आव्हानांचा विचार करता त्याला सामोरे जाण्यासाठी नवीनतम व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. समकालीन युद्धक्षेत्र बदलत असताना गुप्त माहिती संकलनासाठीही नव्या तंत्राचा वापर आवश्यक आहे, असे मत लष्कराच्या प्रशिक्षण विभाग मुख्यालयाचे (आर्मी ट्रेनिंग कमांड) उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. कुशवाह यांनी केले.
पुण्यातील लष्करी गुप्तचर प्रशिक्षण संस्था व केंद्राला (मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अँड डेपो) जनरल कुशवाह यांनी भेट देऊन येथे लष्करी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारी पद्धत आणि तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी घेतली. या भेटीत जनरल कुशवाह यांनी गुप्तचर प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थींना संबोधित केले, अशी माहिती आर्मी ट्रेनिंग कमांडच्या ‘एक्स’ अकाऊंटवर देण्यात आली आहे. लष्करी गुप्तचर प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षणपद्धती व त्यातून या अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जनरल कुशवाह यांना देण्यात आली.
लष्करी गुप्तचर प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, विविध सिम्युलेटरचा वापर करून राबविण्यात येणारे प्रशिक्षण कार्यक्रम, संस्थेत उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान याबाबतची माहितीही त्यांना यावेळी देण्यात आली.
विनय चाटी