महिन्यातील चौथी घटना: भारताकडून चीनच्या दाव्याचे खंडन
दि. २६ मार्च: अरुणाचल प्रदेशावर पुन्हा आपला दावा सांगताना, ‘भारताने चीनचा हा भाग बळजबरीने ताब्यात घेतला आहे,’ असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केला आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशावर दावा करण्यात आल्याची या महिन्यातील ही चौथी घटना आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच ‘हास्यास्पद,’ या शब्दात चीनच्या दाव्याची संभावना केली होती, तरीही पुन्हा चीनकडून हा दावा करण्यात आला आहे.
‘अरुणाचल प्रदेश हा चीनचा अविभाज्य भाग आहे. भारताने १९८७ मध्ये हा भाग बेकायदा बळकावला. त्यापूर्वी हा भाग चीनच्या प्रशासनिक नियंत्रणात होता. भारताच्या या कृतीला चीनने विरोध केला होता. भारताची ही कृती अयोग्य आणि बेकायदा आहे असे,’ चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले आहे. अरुणाचलवरील भारताचा दावा फेटाळताना, ‘भारताच्या या कृतीला असलेला चीनचा विरोध व भूमिका बदललेली नाही. अरुणाचल कायमच चीनचा भाग होता, असेही जियान पत्रकारांशी बोलताना सांगितले. भारताने गेल्या काही वर्षांपासून ईशान्य भारत व विशेषतः चीनच्या लगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्याप्रमाणात रस्ते व इतर पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. तसेच, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरक्षादलांची मोठ्याप्रमाणात तैनात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच चीनलगतच्या सीमेवर भारताने संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) देशांतर्गत विकसित केलेली ड्रोनविरोधी यंत्रणाही तैनात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनकडून ही आदळआपट करण्यात येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सिंगापूर येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीज’ या संस्थेत झालेल्या एका कार्यक्रमानंतर, चीनकडून सातत्याने अरुणाचल प्रदेश वर करण्यात येत असलेल्या दाव्याबद्दल परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पत्रकारपरिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. ‘चीनकडून अरुणाचलवर करण्यात येत असलेला दावा नवा नाही. त्यांनी यापूर्वीही अरुणाचलवर दावा केला होता आणि आजही करत आहेत. त्यांचा दावा पूर्वीही हास्यास्पद होता व आजही आहे,’ असे जयशंकर यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विकास कामांच्या उद्घाटनाकरिता ११ मार्च रोजी अरुणाचलला भेट दिली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते व्यांग वेनबीन यांनी मोदी यांच्या या भेटीला विरोध करीत; ईशान्य भारतातील या राज्यावर चीनचा दावा सांगितला होता. भारत आणि चीन दरम्यान सुमारे साडेचार हजार किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून वाद आहे. यावरून उभय देशांत सशस्त्र संघर्षही झाला आहे. चार वर्षांपूर्वी एप्रिल २०२० मध्ये पूर्व लडाखमधील गलवान येथे उभय देशांतील लष्करात संघर्ष झाला होता. त्यानंतरही सातत्याने चीनकडून अरुणाचल प्रदेश वर दावा सांगितला जात आहे.
विनय चाटी
स्रोत: वृत्तसंस्था