अरबी समुद्रातील घटना: कर्नाटकच्या किनारपट्टीवर बचावकार्य
दि. २१ मार्च: भारतीय तटरक्षक दलाच्या बचावपथकाने कर्नाटकच्या पश्चिम कुंदापुरा किनारपट्टीपासून २० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात असणाऱ्या मच्छीमारी बोटीतून आठ मच्छीमारांची सुटका केली. या बोटीकडून आलेल्या संदेशानंतर तटरक्षक दलाच्या ‘आयसीजीएस राजदूत’ या जहाजाने तत्परतेने कारवाई करीत या सर्वांची सुटका केल्याचे तटरक्षक दलाच्या ‘एक्स हँडल’वर (पूर्वीचे ट्विटर) म्हटले आहे.
भारतीय तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस राजदूत’ हे तटीय गस्ती जहाज किनारपट्टीवर गस्त घालत असताना त्यांना अजमीर-१ (IND-KA-02-MM-4882) या मच्छीमारी बोटीकडून बचाव करण्याबाबतचा संदेश प्राप्त झाला. कर्नाटकच्या पश्चिम कुंदापुरा किनारपट्टीपासून २० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात असताना या बोटीत पाणी शिरल्यामुळे ती बुडू लागली होती. या बोटीत आठ मच्छीमार होते. हा संदेश प्राप्त झाल्यानंतर तटरक्षक दलाने अतिशय तत्परतेने कारवाई करीत या बोटीचा शोध घेतला व हवेने फुगविता येणाऱ्या बोटीच्या सहायाने बुडणाऱ्या बोटीत प्रवेश केला. आपल्याकडे असलेल्या पंपांच्या माध्यामतून अजमीर-१ या बोटीतील पाणी उपसून काढले व सर्व मच्छीमारांची सुटका केली, असे तटरक्षक दलाने म्हटले आहे.
अजमीर-१ या बोटीची संपूर्ण तपासणी केल्यानंतर ती बोट ‘ तिच्याबरोबर असलेल्या ‘गोल्ड फिश’ या बोटीने ओढून कर्नाटकातील गंगोली या बंदराकडे पाठविण्यात आली.
विनय चाटी